32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeलेखगणपतराव देशमुख म्हणजे साक्षात देवमाणूस !

गणपतराव देशमुख म्हणजे साक्षात देवमाणूस !

टीम लय भारी 

सांगोला विधानसभा मतदारसंघातून तब्बल ११ वेळा निवडून आलेले गणपतराव देशमुख यांची आज पहिली पुण्यतिथी आहे. या चारित्र्यसंपन्न व्यक्तीमत्वाचा चौफेर आढावा घेण्याच्या दृष्टीने आम्ही विशेष लेखमाला सुरू करीत आहोत. या लेखमालेतील हा पहिला लेख.

आम्ही त्यांना आबा म्हणायचो. तालुका एकच त्यामुळे त्यांच्या घरी जाणे येणे लहानपणासूनच होते. तसं पाहिलं तर मी त्यांची मानसकन्याच ! एका लेकीची करावी तशी माझी काळजी त्यांनी वाहिलीच, परंतु लेकीला धाक असावा म्हणून बाप जशी तिच्या मागून तिची चौकशी करतो, तशी माझ्या मागून ते माझी चौकशी करीत. कामात खोट नाही ना ? दिरंगाई, लाचखाऊपणा, कोणत्याही प्रकारची अन्य लफडी नाहीत ना ? कामावर वेळेवर हजार राहतात का ? मी आवर्जून सांगेन, आज जे माझं शुद्ध चरित्र मी बाळगून आहे त्याचं श्रेय आबांना जातं !

मला कळायला लागल्यापासून मी त्यांच्या घरी जात असे. त्या घरी गायी-म्हशींचा गोठा होता. अंगणात गवऱ्या नेहेमी वाळत घातलेल्या असत. त्या आम्ही गोळा करून बाईंकडे देत असे. त्या वेळेपासून त्या घरात माझा वावर होता. तेव्हाचं जे घर डोळ्यात बसलं आहे, ते आजतागायत त्याच अवस्थेत आहे. तोच पसरलेला गालिचा, त्याच खुर्च्या, तशीच मांडणी आणि सतत कामात गुंतलेले आबा. आबांचं ऑफिस बंद दाराआड कधीच नव्हतं, त्यांच्या स्वभावासारखंच ते मदत मागण्यास येणाऱ्यांसाठी खुलं असे. आबा फक्त दोन वेळेस जेवण घेत. सकाळी साडेनऊ दहाच्या सुमारास न्याहारीवजा जेवण झाले की रात्री ८ वाजता जेवण होई. त्यानंतर १० पर्यंत त्यांचं अखंड काम चालू असे. ते सतत शुभ्र पेहरावात असत. पेहरावातून सुद्धा त्यांचं निष्कलंक चरित्र दिसून येई. साधी राहणी, उच्चं विचारसरणी हे ब्रीद त्यांच्या स्वभावाशी चपखल मिळतेजुळते होते. कामासाठी म्हणून आलेला कोणताच गरजू व्यक्ती त्यांच्या दारातून निराश मनाने गेलेला एवढ्या आयुष्यात मी तरी पहिला नाही.

त्यांचे शब्दच फक्त गोड नव्हते तर, त्यांच्या शब्दांतून प्रेम जाणवत असे. माझ्या उभारीच्या काळातली एक गोष्ट सांगते. माझी ‘पीएसआय’ची परीक्षा झाली होती. त्यानंतर तोंडी परीक्षा होती. आमदारांना सांगितले तर निवड होईल म्हणून मी माझ्या वडिलांसोबत त्यांच्याकडे गेले होते. त्यांनी नकार दिला नाही, त्यांनी आश्वासन दिलं, धीर दिला, विश्वास दाखवला. म्हणाले, आबांच्या संगतीत लहानाची मोठी झालीस तू ! अशी कशी निवड होणार नाही ? माझं नाव सांगायची गरज लागणारच नाही, तुझी निवड होईल.. झाली. त्यावेळी त्यांनी दाखवलेला विश्वास मी अजूनही जपते आहे. आबांच्या सावलीत पेरले गेलेले संस्कार आणि कोरले गेलेले विचार आज माझ्या वर्तणुकीतून मी शतपटीने समाजाला देण्याचा प्रयत्न करेन. वेळेच्या बाबतीतील त्यांचा काटेकोरपणा म्हणजे घड्याळाच्या आज्ञेबाहेर नाहीच ! माझ्या लग्नाचाच किस्सा सांगते. लग्नाचा मुहूर्त ठरला आणि वेळ दिली ४ वाजताची. आबांना आमंत्रण होतंच. ते वेळेपूर्वी पोहोचत होते. परंतु आपल्या ड्रायव्हरला त्यांनी सांगितले गाडी चार च्या ठोक्यालाच मंडपात जायला हवी. वेळ पाळायला हवी आणि तिचा आदर करायला हवा. हे त्यांचं धोरण होतं. त्यावेळी त्यांनी दिलेलं शुभेच्छा पत्र मी अजूनही जपून ठेवलं आहे.

माझं लग्न झालं, मुलं लहान होती आणि मला बदलीचा आदेश आला. माझं कशातही लक्ष लागत नव्हतं, मुलांना सोडून कर्तबगार आई सुद्धा कामानिमित्त दुसऱ्या शहरात उजळमाथ्याने जाऊ शकते का ? मी नोकरी सोडायचा विचार करत होते. राजीनामा द्यायचा विचार माझा जवळजवळ पक्का झाला होता. अनेक प्रश्न होते, अनेक अडथळे होते. मुलांना सोडून राहायची सवय नव्हती, इतक्या दूर बदली यापूर्वी झाली नव्हती. आबांकडे गेले, बाईंना सगळं सांगितलं. माझ्या बदल्यांसाठी आबांनी मला बरीच मदत केली. बदली म्हणजे माझ्यासाठी त्या काळात संकट होतं. आणि आबा देवासारखे होते. आठच दिवसांत माझी बदली झाली. बदली झाली त्या ठिकाणचे काही हवालदार आबांच्या ओळखीचे होते. त्यांच्याशी आबांनी बोलून ठेवले होते. त्यांच्याकडून माझ्याबद्दल प्रश्न विचारून घेत. माझ्यामुळे काही समस्या उद्भवत आहेत काय किंवा माझे काम कसे आहे ? कामे वेळेत होतात का, वागणं कायद्याला, नियमांना अनुसरून आहे ना ? अशा चौकशा ते माझ्यामागून करत. आबांचा आदर्श माझ्या कामातून दिसत असे. माझ्या नावाला, कामाला कलंक लागला तर आबांच्या संस्कारांना काळिमा फासल्यासारखे होईल. त्यांचे नाव झाकोळून जाऊ नये म्हणून माझे नेहमीच प्रयत्न राहतील.

आबांचं मुंबईला येणं झालं की आमची भेट ठरलेली असे. केव्हा मी त्यांच्याकडे जाई नाहीतर ते माझ्याकडे येत. मी आबांना आमंत्रण दिले आणि आबा आले नाहीत असे केव्हा झाले नाही. कितीही गडबडीत असोत, सोबत कितीही कार्यकर्ते असोत, आबा १० मिनिटांसाठी का होईना येऊन जात. कधीतरी मी त्यांना जेवणाचा आग्रह केला की जेवायला थांबत. आबांना त्यांची कामे कोणी केलेली आवडत नसत. स्वतःचं ताट ते स्वतः धुवत. इतर कुणी उचललेलंही त्यांना आवडत नसे. मला खूप वाटत असे, मी म्हणे मुलगी मानता न तुम्ही मला, लेकीकडे आल्यावर कुणी आपलं ताट उचलून ठेवतं का ? मला तुमचे आदरातिथ्य करुदेत. पण आबांना काही ते रुचत नसे. मग त्यांच्यापुढे कोण बोलणार ? इतकेच काय तर त्यांचे कपडेही इतरांना धुवायला देणे त्यांना आवडत नसे. ते स्वतःचे स्वतः धूत.

आमच्या अनेक विषयांवर गप्पा होत. कामापासून ते वैयक्तिक आयुष्यापर्यंत सर्वच. घरातील मोठ्या माणसासारखा, जाणत्यासारखा त्यांचा वरदहस्त नेहमीच माझ्यावर राहिला आहे. त्यामुळे मी स्वतःला फार भाग्यवान समजते. कामात येणारे अडथळे विचारून घेत, एके ठिकाणी एक सिनियर ऑफिसर होत्या. त्या मला फार त्रास देत. त्यांचे नाव लिहिणे टाळते. त्यांच्याबद्दल नेहमी चौकशी करीत. काही त्रास आहे का विचारत. माझ्यामुळे कुणाला त्रास होत नाही आणि त्याचबरोबर कुणाहीमुळे मला त्रास होऊ नये याची ते खात्री करून घेत. त्यांच्या चौकशीत आपुलकी असे. सारं मनात साचलेलं मोकळं होई. आणि मी पुन्हा नव्याने कामासाठी तयार होत असे. त्या फक्त चौकशा किंवा विचारपूस नसे, आमच्या गप्पा होत. गप्पांमधून त्यांचे हेतू, अपेक्षा समजून येत. माझीही उत्तरे निखळ असत. प्रश्नांचे पूर्वार्ध आणि उत्तरांनंतरचे उत्तरार्ध स्पष्ट होत. एकमेकांचे एकमेकांना. खऱ्या अर्थाने सुसंवाद होत असे.

माझे त्या घराशी इतके संबंध होते की आबा कॅबिनेट मंत्री असताना सुट्टीच्या दिवशी मी जाऊन बाईंशी गप्पा मारीत असे. असंच एकदा गप्पा मारता मारता त्यांनी मला सिद्धीविनायकाच्या दर्शनाला येण्यासाठी विचारलं. आमचं सारं पूजेचं साहित्य बांधून झालं. बाई कधी मंदिरासमोरून साहित्य विकत घेत नसत. त्यांचं म्हणणं एकदा वाहिलेलं पुन्हा देवाला दाखवू नये. फुलं, श्रीफळ त्या घरूनच घेत. सिद्धिविनायक मंदिरात जाण्यासाठी गाडी नव्हती. त्यावेळी आबा कामानिमित्त दौऱ्यावर होते. वेगळी गाडी घेण्यापेक्षा तीच सरकारी गाडी घेऊन जाऊ असे ठरले आणि ती गाडी घेऊन आम्ही गेलो. सोमवारी आबा आले. त्यांनी त्याच दिवशी ड्रायव्हरला जाब विचारला. हे एवढे किलोमीटर कुठे संपले ? ड्रायव्हर गोंधळला, बाईंचं नाव कसं सांगावं ? तो म्हणाला मी भरून देतो, कुणाला काही विचारू नका. दुसऱ्या दिवशी बाईंना प्रश्न केला, दर्शनाला कोणती गाडी घेऊन गेलात ? आबांनी तेवढे किलोमीटरचे पैसे पी.ए.कडे दिले आणि सांगितले मंत्रालयात जाऊन भर. पण मंत्रालयात हे असे पैसे घेण्याचा विभागच नव्हता. काहीतरी खटपट करून त्यांनी ते पैसे शासनाच्या हवाली केलेच. सरकारच्या पै पै चा हिशोब ते लेखी ठेवत. हे आणि असे कित्येक गुण त्यांच्याकडून शिकून घेण्यासारखे आहेत.

दिवाळी आल्यावर सणाच्या दिवशी बाईंना आणि त्यांच्या लेकींना ते साडी घेत. त्यावेळी त्यांनी बाईंकडे पैसे दिले आणि म्हणाले ह्यांनाही साडी घ्या. सगळ्यांना घ्या. मला त्यांच्या घरातली लेक ते मानत याची पदोपदी जाणीव मला होत होती, त्याचबरोबर आबांची लेक म्हणून माझं चरित्र नेहमीच शुद्ध राहायला हवं ह्या जबाबदारीची लक्ख जाणीव होत होती. ते जेव्हा मी कार्यरत असलेल्या शहरात येत तेव्हा आमची भेट ठरलेली असायची. कधीतरी कामानिमित्त जायचे असल्यास मी कॉन्स्टेबलला घेऊन जात असे. तेव्हा माझी चौकशी केल्यानंतर त्या कॉन्स्टेबलची चौकशी सुद्धा ते आपुलकीने करत. त्यामुळे पुढे पुढे आबा मुंबईला आले असतील आणि त्यांना भेटायला जायचे असल्यास कॉन्स्टेबल स्वतःहून मला विचारत आम्ही येऊ का असे..

त्यांची काम करण्याची पद्धती वेगळी आणि विशेष होती. ते तळागाळात जाऊन काम करत. केलेल्या कामाचा पाठपुरावा करत. संपूर्ण महाराष्ट्रातून लोक त्यांच्याकडे आपली कामे घेऊन येत. कामाला सुरुवात करताना कोणत्याही गोष्टीचे अपडेट ते पहिले लिहून घेत. आणि त्यानंतर त्या गोष्टीची पूर्तता ते करीत. काम पूर्ण झाल्यावर त्या लिहिलेल्या तपशिलातून त्या मुद्यावर काट मारत. अशी शिस्तप्रिय व पद्धतशीर कार्यपद्धती त्यांची होती.

त्यांना एकदा डेंग्यू झाला होता तरीही ते नागपूर अधिवेशनाला उपस्थित होते. त्यावेळेची गोष्ट आहे. मी नागपुरात होते. तेव्हा तेथील जेवण मला रुचत नसे. माझ्या कमी खाण्यामुळे शरीरावर झालेल्या परिणामाची चौकशी केली आणि म्हणाले खात जावं वेळोवेळी. माझ्या जेवणाचा प्रश्न मी सहज त्यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यावर त्यांनी मला रोज जेवणाला येण्याचा आग्रह केला. व तसेच मी येईपर्यंत ते जेवायचे थांबत असत. मला रोज रोज त्यांच्याकडे जेवायला जायचं म्हणजे अवघडल्या सारखं होई. म्हणून मी कामाचे निमित्त करून उशीर होईल सांगून जेवण टाळत असे. तेव्हा त्यांनी तंबी देऊन ठेवली होती की काहीही झाले तरी येऊन जेऊन जावे.

आबांनी शब्द दिला म्हणजे तो पूर्ण करायलाच हवा. याचे एक उदाहरण देताना मी आवर्जून सांगेन, माझ्याही मुलीच्या लग्नाचे आमंत्रणं त्यांना दिले तेव्हा भीत भीतच आग्रह केला, म्हणाले घोड्यावरचे लग्न आटपू नका. त्यांनी सांगितले येईन पण माझी आपली घालमेल चालूच होती.. अचानक काम आले तर काय होईल, काही महत्वाचे बोलावणे आले तर आबा कामासाठी निघून जातील. लग्नाचा दिवस उजाडला आणि साडेनऊच्या सुमारास आबा आले. एकमेकांच्या कुटुंबाचाच घटक असल्याप्रमाणे त्यांनी घरचे लग्न असल्यासारखे जातीने लक्ष घातले. एवढ्यावर न थांबता सकाळी ९.३० वाजता आलेले आबा रात्री ८ वाजेपर्यंत थांबले होते. त्यांचा पूर्ण दिवस त्यांनी मला देऊन टाकला होता.

माझ्या सासरी आबांच्या हस्ते सत्कारसोहळा होता. आबा आले होते. यावेळी त्यांच्यासोबत सरकारी वाहन नव्हते. मलाही त्यादिवशी मुंबईला परत यायचे होते. आबांनी मला विचारले कशी जाणार आहेस. मी खासगी गाडी ठरवली आहे असे सांगताच ते म्हणाले कि मला कराडपर्यंत सोडा त्यानंतर मी रेल्वेने जाईन. म्हंटलं, रेल्वे कशाला तुम्हाला झोपण्यासाठी व्यवस्थित जागा करू, काहीही त्रास होणार नाही. असे सांगून आम्ही आबांना मनोऱ्याला सोडले.

एकदा मंत्रालयात जायचे होते त्यांच्याकडे गप्पा मारत आम्ही बसलो होतो. त्यांनाही जायचे होते. त्यांना विचारले आपण कसे जाणार आहात ? त्यावर ते उत्तरले की मी पायी जाईन किंवा टॅक्सिने जाईन. तेव्हा मी त्यांना माझ्यासोबत येण्याचा आग्रह केला. प्रायव्हेट गाडी केली आहे हे सांगितल्यावर ते येण्यास तयार झाले. गाडीत बसल्या बसल्या त्यांनी चालकाला गाडी थांबवायला सांगितली, म्हणाले मी उतरतो, रिक्षाने जातो. काय झाले होते की वाहतूक कोंडीचा फार त्रास होऊ नये म्हणून मी पोलीस असे लिहिलेली पाटी गाडीत पुढच्या बाजूला लावली होती. तर आबांना वाटले सरकारी गाडी आहे आणि सरकारी वाहन आपल्याकडून वापरले जाऊ नये म्हणून त्यांचा सार्वजनिक वाहतुकीने जाण्याचा अट्टाहास असे.

एक गोष्ट त्यांच्याबाबत मला आवर्जून सांगावीशी वाटते ती म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्राला मदत करणारा माणूस स्वतःच्या नातवंडांसाठी किती काय काय करेल ना? पण नाही ! आबांचे दोन्ही नातू डॉक्टर आहेत. पण दोघांनाही मेरिटवर प्रवेश मिळाले आहेत. तुम्ही बुद्धिवान जन्मला आहात, तुमचे प्रवेश तुम्ही तुमच्या हिमतीवर मिळवा. असे ते म्हणत. त्यांनी तळागाळातील जनतेवर प्रेम केले. गोर गरिबांसाठी काम केले. कायद्याचं त्यांना प्रचंड ज्ञान होतं. त्यांनी कार्यकर्त्यांना कधीच पुढे केले नाही. ते स्वतः लढत. त्यांना नेतृत्व गुण अवगत होते.

त्यांच्या शेवटच्या दिवसांत जेव्हा ते ऍडमिट होते, माझी घालमेल चालूच होती, मुंबईहून फेऱ्या होत होत्या, मी तडक निघून गेले. आबा शुद्धीत नव्हते, मी हाक मारल्यावर त्यांची हालचाल झाल्यासारखे मला भासले, पण सत्यही वाटले… त्यांच्याकडून बरंच काही शिकण्यासारखं आहे. माझ्यावर तर त्यांचा प्रभाव आहेच पण इतरांना सुद्धा त्यांच्याकडून प्रेरणा मिळावी म्हणून हा लेखप्रपंच.

लेखिका – रूक्मिणी गलांडे (ACP, पुणे)

हे सुद्धा वाचा :

शरद पवारांनी गणपतराव देशमुखांच्या सोबतच्या जागवल्या जुन्या आठवणी

‘महाराष्ट्राविना राष्ट्रगाडा न चाले’-अजित पवार

बाळासाहेब ठाकरे असते तर, राज्यपालांना धुतलं असतं

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी