29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रआयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे...

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण

टीम लय भारी

मुंबई : घोणस या अती विषारी सापाने एका तरूणाला दंश केला होता. त्याला खासगी रूग्णालयात दाखल केले. पण तिथे लस उपलब्ध नव्हती. मग या तरूणाचा जीव वाचविण्यासाठी एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीने पुढाकार घेतला. त्या सुद्धा हवालदिल झाल्या होत्या. त्यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यापर्यंत हा प्रकार पोचवला. त्यावर टोपे यांनी ‘हातातील कामे सोडा आणि त्या तरूणाचा जीव वाचवा’ अशी सक्त सुचना त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना केली. अधिकाऱ्यांनी तात्काळ लस उपलब्ध करून दिली, अन् २४ तासानंतर तो तरूण आता पूर्ण शुद्धीत आला असून बोलूही लागला आहे.

सातारा जिल्ह्यातील बिजवडी (ता. माण) या गावातील रवी कदम या तरूणाला बुधवारी मध्यरात्री घोणस या जातीच्या सापाने दंश केला होता. बिजवडीपासून सातारा हे जिल्ह्याचे ठिकाण तब्बल ८० किलोमीटर दूर आहे. मध्यरात्री वाहनाची सोय करून त्याला सातारमध्ये आणण्यात आले. परंतु तोपर्यंत त्याची अवस्था फारच दयणीय झाली होती. त्याला सातारामधील ‘मोरे रूग्णालयात’ दाखल करण्यात आले. घोणस जातीच्या सापाचे विष उतरवणारी लस त्या रूग्णालयात पुरेशी उपलब्ध नव्हती. तरीही डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न सुरू केले. साताऱ्यातील अन्य रूग्णालयांतून लस उपलब्ध करून देण्यासाठी रूग्णालयाने प्रयत्न केले. पण लस मिळत नव्हती. तोपर्यंत दुसरा दिवस उजाडला होता.

मी आरोग्य मंत्री आहे. या खात्याची जबाबदारी म्हणून प्रत्येक गरजू रूग्णाला मदत करणे हे माझे कर्तव्यच आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही कामापेक्षा रूग्णाचा जीव वाचविणे माझ्यासाठी महत्वाचे आहे. सापाने दंश केलेल्या त्या तरूणाला लसीची गरज आहे हे मला समजल्यानंतर माझे मन हेलावून गेले. सुदैवाने माझ्या कार्यालयात नुकत्याच एका डॉक्टरना ओएसडी म्हणून रूजू करून घेतले आहे. मी केलेली ही सुचना माझ्या या ओएसडीने अंमलात आणली. कुणाचा तरी जीव वाचवू शकलो याचे मला समाधान वाटते. मी नुकतीच या मंत्रीपदाची सूत्रे हाती घेतली आहेत. माझा विभाग येथून पुढे अशाच सामान्य लोकांचे जीव वाचविण्यासाठी सतत प्रयत्नशील राहील.

राजेश टोपे, आरोग्य मंत्री

निवृत्त आयएएस अधिकारी प्रभाकर देशमुख हे या गावचेच रहिवाशी आहेत. रवी कदम यांच्या नातेवाईकांनी देशमुख यांच्या पत्नी अनुराधा देशमुख यांना संपर्क साधला. अनुराधाताईंनीही आपल्या परिचयातील डॉक्टर्स व इतरांकडे लस उपलब्ध करून देण्यासाठी चौकशी सुरू केली. पण काही केल्या लस उपलब्ध होत नव्हती. इकडे तरूणाने डोळे पांढरे केले होते. त्याची शुद्ध पूर्ण हरपली होती. त्यामुळे नातेवाईकांचे सतत अनुराधाताईंना फोन येत होते. त्यामुळे त्या सुद्धा हवालदील झाल्या. शेवटी ओळखीच्या एका व्यक्तीमार्फत अनुराधाताईंनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना संपर्क साधला.

राजेश टोपे महत्वाच्या बैठकीत व्यस्त होते. नव्यानेच आलेल्या सगळ्याच मंत्र्यांकडे भेटायला येणाऱ्या लोकांची प्रचंड गर्दी आहे. सगळ्याच नव्या मंत्र्यांना श्वास घ्यायलाही वेळ नाही अशी स्थिती आहे. टोपे यांचा सुद्धा असाच व्यस्त कार्यक्रम होता. परंतु एका तरूणाचे प्राण कंठाशी आले आहेत हे समजताच त्यांनी ताबडतोब त्यांच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना बोलविले. ‘हातातील सगळी कामे सोडा अन् कुठूनही त्या खासगी रूग्णालयात ताबडतोब लस पोचेल याची तजवीज करा’ असे सांगितले. टोपे यांच्या कार्यालयात नुकतेच एक डॉक्टर ओएसडी म्हणून रूजू झाले आहेत. ‘लस कशी उपलब्ध करून द्यायची’ याची त्यांना चांगलीच माहिती होती. त्यामुळे या ओएसडींनी आपले वैद्यकीय कौशल्य पणाला लावले. सरकारी रूग्णालयातूनच ‘मोरे खासगी रूग्णालयात’ ती लस पोचविण्याची व्यवस्था त्यांनी केली. काल रात्री उशिरापर्यंत जवळपास १५ बाटल्या लस पोचविण्यात आल्या होत्या. रात्री उशिरा तो पूर्णपणे शुद्धीवर आला होता, अन् बोलूही लागला होता. सध्या त्याची परिस्थिती धोक्याच्या बाहेर आली असल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले.

आयएएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या एका फोनवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वाचविले तरूणाचे प्राण
जाहिरात

 

हे सुद्धा वाचा

मुख्यमंत्र्यांच्या रडावर ६० आयएएस अधिकारी

वाडियाचा वाद सोडविण्यात अजितदादा, राजेश टोपे यांचेही योगदान

VIDEO : तळागाळातील रूग्णांसाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचा धडाकेबाज निर्णय

‘लंडन आय’ सारखं ‘मुंबई आय’, उंचीवरून घ्या मुंबईचं दर्शन!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी