27 C
Mumbai
Monday, September 30, 2024
Homeमंत्रालयराजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरात म्हणतात, तरुण नेत्याला संधी द्या

राजीनाम्याच्या वृत्तावर बाळासाहेब थोरात म्हणतात, तरुण नेत्याला संधी द्या

टीम लय भारी

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरु असतानाच आपण राजीनामा दिलेला नसल्याचे खुद्द थोरात यांनी सांगितले. तसेच अशाप्रकारच्या बातम्या कुठून आल्या आपल्याला माहिती नाही. पण ‘ही बातमी कुठून आली? त्याचा सोर्स शोधला पाहिजे,’ असे त्यांनी म्हटले आहे.

बाळासाहेब थोरात हे काल दिल्लीला गेल्यानं त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चेला ऊत आला होता. याबाबत त्यांनी स्वत: वृत्तवाहिन्याकडं बोलताना खुलासा केला आहे. ‘माझ्या राजीनाम्याची बातमी चुकीची आहे. ती कुठून आली माहीत नाही. अद्याप तरी मी राजीनामा दिलेला नाही. तशी कुठलीही चर्चा नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, पक्षश्रेष्ठींचा आदेश येताच पद सोडण्याची तयारी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

मंत्रीपदासह आपल्यावर 3 महत्वाच्या जबाबदा-या आहेत. त्यामुळे आपणच पक्षश्रेष्ठींशी बोलून प्रदेशाध्यक्षपद सोडण्याची तयारी दर्शवल्याचेही थोरात यांनी सांगितले. तसेच तरुण नेत्याला संधी द्या, आम्ही त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहू, असेही पक्षश्रेष्ठींना सांगितल्याचे थोरात म्हणाले. दरम्यान, प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणता चेहरा असेल हे आपण सांगू शकत नसल्याचेही थोरातांनी म्हटले आहे.

थोरात यांच्यावर सध्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्याशिवाय महाविकास आघाडी सरकारमध्ये ते महसूलमंत्री आहेत. तसंच, काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्ष नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्यावर आहे. एकाच व्यक्तीकडे इतक्या जबाबदाऱ्या असल्यामुळं अन्य नेत्यांमध्ये नाराजी असल्याचं बोललं जात आहे. थोरात यांनी मात्र अशी काही नाराजी नसल्याचं सांगितलं. ‘माझ्याविषयी पक्षात कुणाला व्यक्तिगत नाराजी असण्याचं कारण नाही. मी सर्वांना बरोबर घेऊन जातोय. माझ्या परीनं प्रत्येक पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. पक्षात कुठलीही गटबाजी नाही. मात्र, एका व्यक्तीकडं इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या आहेत. याची चर्चा निश्चित होऊ शकते. मी ते नाकारत नाही आणि माझ्या बाजूनं जबाबदाऱ्यांचं वाटप करण्यात काहीच अडचण नाही. मी स्वत: याबद्दल आधीही पक्षाच्या नेत्यांशी बोललो आहे. पक्षाला वाटत असेल तर एखाद्या तरुण नेत्याकडं जबाबदारी द्यायला माझी हरकत नाही. आम्ही त्याच्या पाठीशी उभे राहू. नवे नेतृत्व घडवू,’ असं ते म्हणाले.

एच. के. पाटील यांच्याबाबत नाराजी नाही

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्यावर बाळासाहेब थोरात नाराज आहेत. त्या नाराजीतूनच बाळासाहेब थोरात प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याबाबत बोलताना एच. के. पाटील यांच्याविरोधात कुठलीही नाराजी नाही. तसंच आपल्यावर कुणी नाराज होण्याचंही काहीच कारण नसल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे.

प्रदेश काँग्रेसमध्ये बदलाच्या हालचाली

बाळासाहेब थोरात 2 दिवस दिल्ली दौ-यावर होते. दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या काही बड्या नेत्यांची भेट घेऊन चर्चाही केली. त्यानंतर त्यांनी काँग्रेस नेते राजीव सातव यांची भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केली. थोरात यांच्याकडे महसूल मंत्रिपद असल्याने त्यांना पक्षासाठी हवा तसा वेळ देणं जमत नाही. त्यामुळे त्यांच्याकडून प्रदेशाध्यक्षपद काढून घेण्यात येणार असून राज्याला नवा प्रदेशाध्यक्ष देण्यात येणार आहे. त्यासाठी थोरात यांच्याशी चर्चा करण्याकरिता त्यांना दिल्लीत बोलावलं गेल्याचं सूत्रांनी सांगितलं.

प्रदेशाध्यक्षपदासाठी कोणत्या नावांची चर्चा?

सध्या तरी काँग्रेस नेते सुनील केदार, विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर या राज्यातील नेत्यांची नावे प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत. त्याशिवाय नाना पटोले, राजीव सातव आणि पृथ्वीराज चव्हाण या राष्ट्रीय स्तरावरील राज्यातील नेत्यांची नावेही प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चेत असल्याने काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी