28 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीययावर दुष्मनांचाही विश्वास बसणे कठीण, अमित शाह मोदींबद्दल असं बोलणार नाही :...

यावर दुष्मनांचाही विश्वास बसणे कठीण, अमित शाह मोदींबद्दल असं बोलणार नाही : शिवसेना

टीम लय भारी

मुंबई : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं या वादग्रस्त राज्यपालांच्या टीकेवर पंतप्रधानांवर निशाणा साधलाय. मात्र त्याचवेळी मलिक यांनी अमित शाह यांनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्यासंदर्भातील दाव्यावरुन मात्र शिवसेनेनं अमित शाह यांची बाजू घेतल्याचं चित्र दिसत आहे(Amit Shah’s statement on Modi, enemies can’t believe too).

मोदी स्वतःचेच भक्त आहेत

“मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक हे या ना त्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, प. बंगालचे राज्यपाल जगदीश धनकड यांच्याप्रमाणे राजभवनात बसून ते राजकारण करतात की नाही याबाबत शंका आहे, पण राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेल्या अनेक भूमिका आणि विधाने वाद ओढवून घेणारी ठरली आहेत. जम्मू-कश्मीर, गोवा, मेघालय अशा राज्यांत ते होते. प्रत्येक ठिकाणी त्यांनी वाद ओढवून घेतले. सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत.

अयोध्येत जमीनी घेणं म्हणजे हिंदुत्वाचा चोरबाजार;शिवसेनेचा हल्लाबोल

संजय राऊत यांचे विधानसभेसाठी भाजपला आव्हान

राज्यपाल मलिक यांनी आता असे म्हटले आहे की, “मोदी हे प्रचंड अहंकारी गृहस्थ आहेत.’’ सत्यपाल मलिक यांनी यात नवीन असे काय सांगितले? पण मलिक पुढे सांगतात ते महत्त्वाचे. शेतकरी आंदोलन संपवा, आतापर्यंत ५०० शेतकरी मरण पावले आहेत, असे सांगण्यासाठी आपण मोदींना भेटलो तेव्हा त्यांचा प्रतिसाद बरा नव्हता. ‘‘माझ्यासाठी ते ५०० शेतकरी मेलेत काय?’’ असा उलटा प्रश्न मोदी यांनी केला तेव्हा आपले व त्यांचे भांडण झाल्याचा दावा सत्यपाल मलिक यांनी केला. खरेखोटे मोदीच जाणोत. मोदी यांचे व्यक्तिमत्त्व, स्वभाव, कार्यपद्धती कशी आहे ते काही लपून राहिलेले नाही. मोदींचे भक्त अनेक आहेत, पण मोदी स्वतःचेच भक्त आहेत. स्वभक्ती आली की अहंकार हा आलाच,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

जाट’पण उसळून आले आहे

“मोदी यांनी शेतकऱ्यांचे आंदोलन चिघळू दिले. त्यात पाचशेहून अधिक शेतकऱ्यांचे बळी गेले तरी ते काळे कायदे माघारी घ्यायला तयार नव्हते. हा अहंकारच होता. मलिक यांनी तेच सांगितले,” असंही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे. तसेच लेखामध्ये पुढे, “मेघालयचे राज्यपाल हे मूळचे भाजपाचे किंवा संघ परिवाराचे नाहीत. ते जाट नेते, समाजवादी विचारांचे आहेत. त्यामुळे शिस्त वगैरे गोष्टींशी त्यांचा संबंध नसावा. अशा समाजवादी विचारांच्या नेत्यास मोदी यांनी राज्यपाल केले याचा काय अर्थ घ्यायचा? आता राज्यपाल पदाची मुदत संपताना राज्यपालांच्या मनगटातील ‘जाट’पण उसळून आले आहे,” असं म्हटलंय.

हा अहंकार नाही तर काय?

“शेतकरी सरकारविरोधात जात आहे व उत्तर प्रदेश, पंजाबच्या पोटनिवडणुकीत भाजपास याचा फटका बसेल याची खात्री पटल्यावरच मोदी यांनी शेतकऱ्यांवर दया केली व तीन काळे कृषी कायदे मागे घेतले. लोकरेट्यांपुढे भल्याभल्यांचा अहंकार गळून पडतो हेच या निमित्ताने दिसले. प. बंगाल निवडणुकीत भाजपाचा अहंकार टोकाला पोहोचला होता. विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातही अहंकाराचा उथळ खळखळाट वाढलाच होता. शेवटी तो अहंकार राजभवनामागच्या समुद्रात गटांगळ्या खाताना लोकांनी पाहिला. आजही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावू अशा धमक्या देणे हा अहंकार नाही तर काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची मोदी सरकारची घोषणा होती, त्याचे काय झाले? शिवसेनेचा सवाल

‘Anything can happen if BJP desires’: Shiv Sena minister suggests Bihar formula for Maharashtra

मलिक यांनीच भाजपाची व मोदींची कोंडी केली

लेखामध्ये पुढे, “पण महाराष्ट्राच्या मातीत अहंकार चालत नाही, गर्वाचे घर नेहमीच खाली येते. श्री. सत्यपाल मलिक यांचे बोलणे म्हणून महत्त्वाचे ठरते. मलिक इतके बोलूनही आजही राज्यपाल पदावर कसे? हा प्रश्न आहे. मलिक म्हणतात, ‘‘मी राजीनामा देणार नाही. मला राज्यपाल पदावरून राजीनामा द्यायला लावा. दोन मिनिटांत राजीनामा देतो.’’ पण मलिक यांना काढले जात नाही याचे कारण असे की, हे महाशय ‘जाट’ आहेत. जाट नेत्यास आता पदावरून काढले तर त्यांना राजकीय हौतात्म्य प्राप्त होईल व सत्यपाल मलिक हे ‘जाट’ म्हणून उत्तर प्रदेश, हरयाणाच्या राजकारणात धुमाकूळ घालतील. म्हणजे मलिक यांनीच भाजपाची व मोदींची कोंडी केली आहे,” असं म्हटलंय.

शाह यांनी मोदींबद्दल केलेल्या वक्तव्याचा दावा न पटणारा

“हे मलिक गृहमंत्री अमित शाहांना भेटले. तेथेही शेतकऱ्यांच्या आंदोलनाविषयी चर्चा केली. शाह यांनी पंतप्रधान मोदी यांच्या बाबतीत वेगळ्या भाषेचा वापर केल्याचे मलिक म्हणतात. ते मात्र न पटणारे आहे. अमित शाह मोदींविषयी चुकीचे शब्द व चुकीच्या भावना व्यक्त करतील यावर त्यांच्या दुष्मनांचाही विश्वास बसणे कठीण आहे. मलिक बोलतात ते सगळे सत्यवचन आहे असे मानता येणार नाही. मलिक हे समाजवादी मुशीतून तयार झाल्याने त्यांचे वागणे-बोलणे चौकटीबाहेरचे असते,” असं शिवसेनेनं म्हटलंय.

विशालहृदयी आणि अहंकारी एकाचवेळी कसे?

“मोदी हे अहंकारी व शेतकऱ्यांच्या हिताचे नाहीत हे माहीत असूनही मलिक यांनी राजीनामा दिला नाही व ते राज्यपाल पदास चिकटून राहिले. त्यांना या राज्यातून त्या राज्यात फिरवत ठेवले तरीही मलिक यांनी न कुरकुरता सगळे सहन केले. इतक्या संयमी व संवेदनशील मलिकांच्या रागाचा स्फोट होतो व ते अन्नदाते मोदींवरच घसरतात याचे आश्चर्य वाटते. आता याच मलिक महाशयांनी केलेले एक विधान ते स्वतःच विसरलेले दिसतात. पंतप्रधानांनी तीन कृषी कायदे मागे घेतले तेव्हा राज्यपाल मलिक यांनी जी प्रतिक्रिया दिली होती ती महत्त्वाची वाटते. राज्यपाल मलिक त्यावेळी म्हणाले होते, ‘‘पंतप्रधानांनी मोठय़ा मनाचे दर्शन घडविले आहे. शेतकऱ्यांच्या बाबतीतले तीन काळे कायदे मागे घेऊन मोदी यांनी चांगलेच काम केले, पण हा निर्णय थोडा लवकर झाला असता तर बरे झाले असते.’’ म्हणजे एका बाजूला मलिक मोदींना विशालहृदयी म्हणतात व लगेच ते अहंकारी असल्याचाही साक्षात्कार त्यांना घडतो,” असं म्हणत मलिक यांच्या दुटप्पी भूमिकेवर शिवसेनेनं निशाणा साधलाय.

बेडर आणि परिणामांची पर्वा न करणारे

“सत्यपाल मलिक हे गोव्याचे राज्यपाल होते. तेथील सरकारच्या भ्रष्टाचाराची त्यांनी पोलखोल केली. गोवा सरकार जागोजाग भ्रष्टाचार करीत असल्याचे फटाके त्यांनी फोडले, तेव्हा त्यांची पाठवणी मेघालयात करण्यात आली. जम्मू-कश्मिरात राज्यपाल असताना एक महत्त्वाची फाईल मंजूर करण्यासाठी संघ परिवारातील प्रमुख नेत्याने ३०० कोटींची लाच देण्याचा कसा प्रयत्न चालविला होता याचाही स्फोट मलिक यांनी केला. त्याच फटाक्यांची माळ घेऊन मलिक वावरत असतात. त्यांच्या नावात ‘सत्य’ आहे. मोदींच्या अहंकारावर त्यांनी आता हल्ला केला आहे. तसे ते बेडर दिसतात, परिणामांची पर्वा करताना दिसत नाहीत. सत्यपाल मलिक हे ‘जाट’ आहेत व ‘जाट’ बंडखोर असतो ते या निमित्ताने दिसले,” असं लेखाच्या शेवटी म्हटलंय.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी