34 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeराजकीयहिंदुत्वनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या हायब्रीड हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी धडपड : अनिल गोटे

हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या हायब्रीड हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी धडपड : अनिल गोटे

टीम लय भारी

मुंबई : सध्या राज्याच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपाचा खेळ सुरु आहे. सत्तेत असणारा महाविकास आघाडी सरकार आणि भाजप विरोधी पक्ष एकमेकांवर आरोप करतायत. त्यातच माजी आमदार आणि राष्ट्रवादीचे धुळे, नंदुरबार जिल्हा प्रभारी असलेले अनिल गोटे (Anil Gote) यांनी भाजपचे हिंदुत्व हे हायब्रीड हिंदुत्व असा टोला लगावलाय. हायब्रीड हिंदुत्ववाद्यांची २५ वर्षांची युती तोडल्याबद्दल शिवसेनेचे मनःपूर्वक आभार,हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपाची केविलवाणी धडपड , खा. मेहबुबा मुफ्तीबरोबर जावून केलेले पातक, हिंदुत्वावादी विसरले नाहीत,  अनिल देशमुख यांची मालमत्ता परत करण्याच्या आदेशामुळे भाजपाच्या कंबरेत लाथ,वायफळ व संदर्भहिन वाच्याळता हाच भाजपाचा अजेंडा असल्याचे म्हणत अनिल गोटे यांनी भाजपवर घणाघात केलाय. (Anil Gote slams to BJP)

…ही खरी भाजपाची पोटदुखी

देशद्रोही पाकिस्तान धार्जिणी अतिरेकी म्हणून जम्मू काश्मिरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांना मुख्यमंत्री पदावर बसवून आपल्या बेगडी व संकरीत (हायब्रीड) हिंदुत्वाची ओळख भारतीय नागरिक कधीच विसरू शकत नाहीत. भाजपाच्या नेत्यांना याची पूर्ण जाणीव आहे. आपल्या सर्वोच्च नेत्यांनी काश्मिरमध्ये सत्ता लोभातून सार्वत्रिका निवडणुकीच्या काळात ज्यांचा उल्लेख देशद्रोही व पाकिस्तान धार्जिणे असा करून हिंदु मतांची भिक मागितली त्याच मेहबुबा मुफ्तीनी भाजपाबरोबर युती करावी त्यासाठी त्यांचे पाय चाटले. असे हायब्रीड हिंदुत्ववादी भाजपा नेते शिवसेना महाआघाडीत सहभागी झाली. तसेच शिवसेना नेते उद्धव ठाकरे हे व्यवस्थितपणे शांत चित्ताने कुठलाही आरडाओरडा न करता आपल्या चुकांचा ठपका जवाहरलाल नेहरूसकट कोणावरही न टाकता राज्याचा कारभार यशस्वीरित्या हाकत आहेत. ही खरी भाजपाची पोटदुखी आहे. यावर उपाय म्हणून महाविकास आघाडीचे सरकार पडावे, म्हणून पाण्यात बुडविलेला गणपती सुद्धा बाहेर आला की काय? अशी शंका उपस्थित होत असल्याचे अनिल गोटे (Anil Gote) म्हणाले.

भाजपचे विदुषकी राजकारण राज्यात सुरु

६ मार्च नंतर राज्याचे विद्यमान करमणूक मंत्री चंद्रकांत पाटील हे १० मार्चनंतर शपथ घेणार होते.. १० एप्रिल निघून गेली तरी अजूनही शपथविधीला मुहूर्त सापडेना. राज्यातील सरकार पडत नाही. आणि आपापसात कथीत वाद करूनही फारकत होत नाही आणि आपला मोहतर लागत नाही, या वैधव्याचे दुःख म्हणजे फडणवीस आणि त्यांच्या टोळीचा सुरू असलेला आदळआपट होय. सरकार पडेल तर महाविकास आघाडीच्या आमच्या नेत्यांची चौकशी सुरू झाली, तमका नेता जेलमध्ये जाणार, ग्रामीण भागात हे विषय टिंगलटवाळकीचे झाले आहेत. एवढे विदुषकी राजकारण राज्यात यापूर्वी कधी झाले नाही, असा टोला अनिल गोटे यांनी भाजप पक्षाला लगावलाय.

भाजपाबाबत निर्माण झालेली चिड आता गृहिणीपर्यंत

याच नैराश्यातून महाविकास आघाडीचे नेते शरद पवार यांच्या घरावर हल्ला करून त्यांना दुखापत करण्याचे केलेले कारस्थान आपोआप उघडे पडले आहे. काहीही करून सत्ता मिळवायचीच! या इर्षेने भाजपाचे राज्यपातळीवरील नेते या एकाच कामाला लागले आहेत. आता सर्वच आघाड्यावर अपयश पदरी पडल्यानंतर हिंदुत्वाचा आधार घेणे सर्वसामान्य जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण करणे, हा भाजपाचा उद्देश कधीही यशस्वी होणार नाही. उलट बहुजन समाजाच्या नेत्यांना त्रास देवून त्यांचे अकारण बदनामी होत असल्यामुळे ग्रामीण भागातील बहुजनांमध्ये भाजपाबाबत निर्माण झालेली चिड आता गृहिणीपर्यंत पोहोचली आहे.

निसर्गतः वाकडे असलेले कुत्र्याचे शेपूट सरळ होणे अशक्य

सर्वोच्च न्यायालयाने माजी गृहमंत्री  अनिल देशमुख यांची सर्व संपत्ती कोणत्याही अटी शर्तीशिवाय परत करण्याचे आदेश दिले आहेत. एवढेच नव्हे तर ईडीवर कडक शब्दात ताशेरे ओढून भाजपाच्या उथळ व अतिरेकी नेत्यांच्या कमरेत सनसनीत लाथ घातली आहे. अर्थात निसर्गतः वाकडे असलेले कुत्र्याचे शेपूट सरळ होण्याची शक्यता नाही, असे अनिल गोटे (Anil Gote) म्हणाले.

भले तोंड काळे असले तरीही ते दाखविण्याची हिंमत ठेवावी

महाराष्ट्र भाजपाचे एक कार्यालय राजभवनातून चालविले जाते. असे मी मागे एका पत्रकात म्हटले होते. आता त्याच कार्यालयाची दुसरी शाखा बॅलार्ड पियरमधील ईडीच्या कार्यालयात उघडली की काय ? अशी शंका निर्माण झाली आहे. कुठलाही कार्यालयातील गुप्त बातमी, कार्यालयात चहापाणी झाडलोटचे काम करणाऱ्या शिपायाला पहिली कळते. तशीच अवस्था किरीट सोमैय्याची झाली आहे. शौर्याच्या गप्पा मारायला फारशी अक्कल लागत नाही. पण कुठल्याही कारवाईला सामोरे जायला अनन्यसाधारणा धाडस लागते. भाजपाच्या कथित नेत्यांमध्ये शौर्याचा एक थेंब जरी बाकी असेल तर त्यांनी अटकेपासून संरक्षण मिळावे, यासाठी तोंड लपवत फिरू नये. भले तोंड काळे असले तरीही ते दाखविण्याची हिंमत ठेवावी. तुम्ही जर काहीच केले नाही तर घरदार सोडून अन्य कुणाच्या पदराखाली जाऊन लपण्याचे काहीही कारण नाही, अशी खोचक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी आपल्या पत्रकात व्यक्त केली आहे. (Anil Gote slams to BJP)


हे सुद्धा वाचा : 

भाजप सत्तेसाठी महेबुबा मुफ्ती बरोबर गेले,उद्या तालीबान्यांबरोबर युती केली तरी आश्चर्य नाही : अनिल गोटे

अनिल गोटे यांचा भाजपला ‘वात्सल्य’युक्त टोला !

पडळकरांच्या आडून भाजपने धनगर विरूद्ध मराठा भांडण लावले : अनिल गोटे यांचा आरोप

Politics : सत्ता गेल्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी ताळतंत्र सोडलेय, शरद पवार यांची इच्छा असेल तरच सरकार पडेल : अनिल गोटे

‘Sting operation’: NCP’s Gote lodges police complaint against Fadnavis

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी