28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeराजकीयमुळात हे नववर्ष नेमके कोणाचे? मराठी माणसाचे? बहुजनांचे? हिंदूंचे? की ब्राह्मणांचे?

मुळात हे नववर्ष नेमके कोणाचे? मराठी माणसाचे? बहुजनांचे? हिंदूंचे? की ब्राह्मणांचे?

टीम लय भारी

अॅड. विश्वास काश्यप

मराठी माणसांचे नववर्ष म्हणावे तर मराठी समाजातील मोठा वर्ग गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभदिन मानत नाही. मुस्लिम मराठी, ख्रिश्चन मराठी, बौद्ध मराठी गुढीपाडव्याला नववर्ष मानत नाहीत; मग याला मराठी नववर्ष कसे समजायचे? बहुजनांचे समजायचे तर अठरापगड जातीचे बहुजन त्यांच्या व्यक्तिगत जातीमधील वेगवेगळ्या पद्धतीचे नववर्ष साजरे करीत असतात. article by Vishwas Kashyap

हिंदूंचे म्हणाल तर उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू अशा भारतातील २८ राज्यांमध्ये बहुसंख्य हिंदूच आहेत. आणि ते गुढीपाडव्याला हिंदूंचे नवीन वर्ष समजत नाहीत. प्रत्येक राज्यात त्यांचे नववर्षाचे दिवस वेगवेगळे आहेत. उदाहरणच घ्यायचे झाले तर तमिळनाडूत ‘पोंगल’ हा सण त्यांचा नवीन वर्ष समजला जातो. आता राहिले फक्त ब्राह्मण. अगदी बरोबर ओळखलंत तुम्ही, गुढीपाडवा हा ब्राह्मणांचाच आहे.

या समाजाची जनसंख्या अतिशय कमी म्हणजे तीन टक्के आहे . परंतु हे ९७ टक्क्यांमध्ये असे काय विरघळून जातात की काही विचारू नका. विरघळून जातात म्हणजे ते ९७ टक्के लोकांच्या परंपरा स्वीकारतात का? तर बिलकुल नाही. हे तीन टक्केवाले आपल्या सगळ्या रुढी-परंपरा, पद्धती, देवदेवता ९७ टक्क्यांच्या गळ्यात मारतात.

ही गळ्यात मारण्याची स्टाईल ९७ वाल्यांना कधीच कळत नाही; आणि हीच खरी गंमत आहे. तीन टक्केवाले अशा बेमालूमपणे ९७ टक्केवाल्यांना फिरवतात की काही विचारू नका. ९७ टक्केवाले तीन टक्केवाल्यांपेक्षाही जास्त प्रामाणिकपणाने त्यांच्या रूढी, परंपरा, पद्धती यांचा स्वीकार करतात. तीन टक्केवाल्यांप्रमाणे वागतात , जगतात .

तीन टक्केवाल्यांनी त्यांच्या परंपरा इतक्या छान पद्धतीने पुढे आणून ठेवल्यात की ९७ टक्केवाल्यांना सुद्धा वाटते की या तीन टक्केवाल्यांचेच आपण अनुकरण केले पाहिजे. म्हणजे आपल्याला समाजात प्रतिष्ठा मिळेल. ही प्रतिष्ठा मिळविण्यासाठी मग ते स्वतःच्या घरी गणपती बसविण्यास सुरुवात करतात.

खरंतर, गणपती हा ब्राम्हणांचा देव. विविध मोठ्या लेखकांनी ते सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यामुळे त्या फार मी तपशीलात जात नाही. गणपती हा पुण्याच्या पेशव्यांचा देव. टिळकांनी देवघरातला गणपती रस्त्यावर आणून तो बहुजनांच्या गळ्यात कधी मारला ते बहुजनांना सुद्धा समजले नाही.

ब्राह्मणांच्या घरी दीड दिवसाचा गणपती परंतु बहुजनांच्या घरी दहा-बारा दिवसांचा गणपती. तसं पाहिलं तर बहुजनांचे देव म्हणजे विठ्ठल, म्हसोबा, मल्हार, दुर्गादेवी, भवानी, काळुबाई, खंडोबा. परंतु ह्या मूळ बहुजनांच्या या देवदेवतांना बाजूला सारून त्यांनी गणपतीला पुढे केले. गणपती देवांचा देव, त्याला कोणत्याही पूजेला अग्रस्थानाचा मान, ही प्रथा कधी सुरू झाली हे कोणत्याच बहुजनाला समजले नाही.

नववर्षाच्या शोभायात्रेचे सुद्धा असेच आहे. तीन टक्केवाल्यांचा गुढीपाडवा तमाम ९७ वाल्यांचा कधी झाला हे कुणाच्याच लक्षात आले नाही. शोभायात्रेच्या निघण्याच्या जागा पहा. गिरगाव, विलेपार्ले, ठाणे, डोंबिवली, पुणे येथील सदाशिव पेठ, कोथरूड अशा ब्राह्मणबहुल वस्त्यांमधूनच या शोभायात्रा निघतात .

वरील वस्त्यांमध्ये ही ९७ टक्केवाली मंडळी राहतात का? तर नाही. तेथील एकूण वस्त्यांपैकी १० ते १५ टक्‍क्‍यांपर्यंतची लोकसंख्या त्यांची असते. आणि पुन्हा हे दहा, पंधरा टक्के लोक उर्वरित ९०/ ८५ टक्के लोकांना त्या शोभायात्रेत भाग घेण्यास प्रवृत्त करत असतात. नव्हे भाग पाडत असतात.

या शोभायात्रेत बहुजनांच्या मुला-मुलींनी खरेतर नवीन कपडे वगैरे घालून सहभागी होण्याचे काहीच कारण नाही. ‘बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना’ अशीच काहीशी गत बहुजन मंडळींची असते. नववर्ष कोणाचे? मिरवतोय कोण? सगळ्यात गंमत म्हणजे ही बहुजन मंडळी गुढीपाडव्याला ज्या प्रमाणात नवीन वर्षाचा जल्लोष करतात त्याच पद्धतीने किंबहुना त्याच्या दुप्पट उत्साहाने ३१ डिसेंबरच्या रात्री सुद्धा नवीन वर्षाचे स्वागत करतात.

कारण ही मंडळी गोंधळलेल्या अवस्थेत असतात. ते अशा अवस्थेत असल्याने मग तीन टक्केवाले मधूनच एक पुडी सोडतात की, ‘आपले नवीन वर्ष ३१ डिसेंबर नसून गुढीपाडवा हेच नवीन वर्ष आहे. ३१ डिसेंबर तर ख्रिश्चनांचे नवीन वर्ष आहे’.

हिंदू धर्माच्या श्रेणीबद्ध रचनेनुसार सर्वात वरच्या पायरीवर ब्राह्मण समाज आहे. नंतर क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशी उतरंड आहे. क्षत्रियांपासून शूद्रांपर्यंत हा बहुजन समाज दुसरा, तिसरा, पाचवा, शंभरावा असा क्रमांक लागतो. खरंतर, एक नंबरच्या नंतर असलेल्या नंबरांना काहीही अर्थ आणि किंमत नाही. परंतु एक नंबरच्या खालचे सर्वजण हे एक नंबर असल्यासारखे वागतात. चालीरीती, रूढीपरंपरा पाळण्याचा ते कसोशीने प्रयत्न करतात.

कारण त्यांना वाटते की आपण सगळे समान आहोत. एकाच पातळीवर आणि एकाच पायरीवर आहोत. परंतु हिंदु धर्माच्या पायऱ्या इतक्या पक्क्या आहेत की शंभर नंबरची पायरी कधीच एक नंबर होऊ शकत नाही आणि एक नंबरची पायरी कधीच शंभर नंबरची होऊ शकत नाही. ब्राह्मण कितीही भ्रष्ट असला आचरणाने अशुद्ध असला तरी तोच सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिकदृष्ट्या श्रेष्ठ असतो, असे मनुस्मृती आणि बामणी साहित्यातून बहुजनांच्या मनावर बिंबवण्यात आले आहे. बहुजनांना याचा विसर पडावा, यात कोणतेही आश्चर्य नाही. पिढ्यानुपिढ्या हेच मेंदूवर थोपवण्यात आले आहे.

त्यामुळे शोभायात्रेत बहुजन वर्गातील लोक कितीही नट्टापट्टा करून सहभागी झाले तरी त्यांना ब्राह्मणी प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकत नाही. शोभायात्रेत पाच सहा ब्राह्मण मुलीं ह्या बुलेट चालवित असतात. बहुजनांच्या तीस-चाळीस मुलीसुद्धा बुलेट चालवित असतात. ‘सैराट’ मधील आर्ची सारखे. या मुलींनी कधीही हिंदूंची मनुस्मृती वाचलेली नसते.

मनुस्मृतीत मुलींचे, स्त्रियांचे काय स्थान आहे याची थोडीशी सुद्धा कल्पना नसते. बहुजन मुलींना सावित्रीबाई फुले यांचा संपूर्ण विसर पडलेला असतो. ती जी बुलेट चालवित असते ती केवळ सावित्रीमाईमुळेच याचा साधा विचारही तिच्या मनात कधी येत नाही. मनुस्मृतीनुसार तिचे स्थान अतिशूद्रापेक्षाही खालचे असते. परंतु तीन टक्केवाल्यांच्या भुरळीला भुलून ती नववर्षाच्या शोभयात्रेचं अतिशय जोरात स्वागत करते.

ब्राह्मणांची बहुसंख्य मुले विविध प्रकारच्या ज्ञानविज्ञानावर, कॉम्प्युटरवर प्रभुत्व मिळवून देश-विदेशात खोऱ्याने डॉलर मिळवित आहेत. आणि या मुलांचे आईवडील इकडे बहुजनांच्या मुला-मुलींना दांडपट्टा, लेझीम अशा तथाकथित पारंपारिक खेळात गुंतवून ठेवतात. मला सांगा दांडपट्टा चालवून, लेझीम खेळून तुमची आर्थिक सुबत्ता वाढणार आहे की कॉम्प्युटर शिकून तुम्ही डॉलर कमविणार आहात? आणि हो, मागच्या काही वर्षापासून गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसारखीच दिवाळीसुद्धा साजरी व्हायला लागलेली आहे.

गुढीपाडव्याच्या शोभायात्रेसारखीच दिवाळीच्या सणातील दिवाळी पहाट हा नवीनच प्रकार उदयास येत आहे. पहाटे पहाटे उठून कोणत्या तरी संगीताच्या कार्यक्रमाला उपस्थित राहायचे आणि दिवाळी पहाट साजरी करायची असा हा आधुनिक शोभयात्रेचा प्रकार आहे.

शोभयात्रेच्या धर्तीवर मराठी माणसाच्या सांस्कृतिक जीवनात जे सण उत्सव असतात त्याचे सुद्धा शोभयात्रेसारखेच वेगवेगळे अध्याय तयार करून ठेवलेले आहेत. उदा. गणेश जयंती, अंगारकी, संकष्टी, माघी जयंती, दहीहंडी आणि वर्षभर चालणारे इतर उत्सव. या सगळ्यांचा ‘उत्सव’ करून ठेवल्याने ते बहुजनांच्या माथी मारले गेले आहे.

बहुजन त्यास सहज बळी ठरतात. “आपली संस्कृती” या नावाची नशा बहुजनांच्या मनामध्ये भिनविल्यामुळे बहुजनांचे मूळ उद्देश असलेले “शिक्षण” यापासून त्यांना दूर ठेवले जाते. शोभयात्रेच्या नावाखाली बहुजनांना त्यांच्या वैयक्तिक उत्कर्षापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाते.

समाजाला कशा पद्धतीने मोल्ड करायचं हे मीडियाचे काम आहे. सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे मीडिया. हाच मीडिया सध्या भटाळलेला आहे. एका मीडिया हाऊसमध्ये जर शंभर कर्मचारी असतील तर तिथे फक्त दोन किंवा तीन ब्राह्मण समाजाचे असतात आणि ते संपादक, मुख्य संपादक, जाहिरात प्रमुख अशा मुख्य हुद्यांवर असतात.

ते जे अजेंडा ठरवितात तोच अजेंडा संपूर्ण कर्मचारी वर्ग राबवित असतो. शोभायात्रेचे डायरेक्ट टेलिकास्ट दिवसभर कशा पद्धतीने दाखविले जाईल याची संपूर्ण दक्षता घेतली जाते. दिवसभर शोभायात्रा दाखवित असल्याने घर बसलेल्या सर्व बहुजनांना वाटत असते की हा आमच्याच संस्कृतीचा भाग आहे. ते कळत नकळत ती संस्कृती स्वीकारत असतात. article by Vishwas Kashyap

संपादक, मुख्य संपादक, जाहिरात प्रमुख हे त्यांच्या अजेंडानुसार काम करीत असतात. एक प्रकारे त्यांची संस्कृती ते बहुजनांवर थोपवत असतात. बहुजनांना ते कळतसुद्धा नसते. ते त्या संस्कृतीत इतके वाहून जातात की त्यांच्या आयुष्याची अशीच ‘शोभायात्रा’ होऊन जाते. तीन टक्केवाल्यांचा अजेंडा यशस्वी झालेला असतो.article by Vishwas Kashyap

बहुजनांची शोभायात्रा मात्र दरवर्षी नव्या जोमाने, नव्या उत्साहाने परंपरेने निघतच राहते. तीन टक्केवाले मात्र दुरून ती गंमत पाहत असताना गालातल्या गालात हसत असतात. शोभायात्रा ब्राह्मणी नववर्षाची असते पण त्यात हास्यास्पद ठरेल अशी ‘शोभा’ मात्र बहुजनांच्या आयुष्याची होते. article by Vishwas Kashyap

कोण आहे या सर्वांमागे? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सोबत हिंदुत्ववाद्यांच्या विविध संघटना हे बहुरूप्याचे सोंग आणून बहुजन समाजाला नाचवत आहेत. हे एक बहुजनांवरील सांस्कृतिक अतिक्रमण आणि सांस्कृतिक दहशतवादच आहे. बहुजन समाजाला हे कळते आहे पण वळत नाही. या तथाकथित नववर्ष स्वागतयात्रांमधील किती तीन टक्केवाले सहा डिसेंबरला चैत्यभूमीच्या निळ्या सागरात सहभागी होऊन बाबासाहेबांना अभिवादन करतात? किती जण आंबेडकर जयंतीला बेभान होऊन नाचतात?

बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार करतात? गावागावात निघणार्या बहुजनांच्या गावदेवाच्या जत्रेयात्रेत गुलाल उधळतात? आजही गावागावात, हाटा-हाटांवर दलित-बहुजनांच्या बायकांच्या इज्जतीला हात घातला जातो. घोटभर पाण्यासाठी बायांना संघर्ष करावा लागतो. ‘आमचं पाणी भरून झालं की तुम्ही…’ जणू यांचे पाणी विटाळते.

उच्चवर्णियांच्या पोरीबरोबर प्रेम प्रकरण झाले म्हणजे मोठा गुन्हा केला अशा अविर्भावात कोवळी पोरं मारली जातात. कोण असतात या सर्वांच्या पाठीमागे आशिर्वाद देणारे? जग खूप पुढे निघून गेले आहे, जातीपाती संपल्या असे एकीकडे म्हटले जात असले तरी गावागावात आजही बहुजनांच्या पंगतीत बसताना या तीन टक्केवाल्यांना लाज वाटते, हे कटू सत्य आपण ९७ टक्केवाले समजून घेणार आहोत की नववर्षाच्या स्वागत यात्रांमध्ये मेंदू गहाण टाकून झिंग येईपर्यंत नाचणार आहोत, याचा विचार करायची आता वेळ आली आहे.

संपर्क : ९८२०६९७३०१

(लेखक माजी पोलिस अधिकारी असून उच्च न्यायालयात वकिली करतात.)

हे सुध्दा वाचा:

धर्माच्या नावावर माणसांमध्ये धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न : शरद पवार

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने महागाई विरोधात अभिनव आंदोलन!

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी