पंतप्रधानांचे लाडके उद्योगपती अदानीशेठचा बाजार उठतोय! अदानी समूहाच्या कंपन्यांसाठी ब्लॅक फ्रायडे आहे. (Black Friday for Adani Group Shares) हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर सरकारी मेहेरबानीमुळे अल्पावधीत उभ्या राहिलेल्या तकलादू साम्राज्याच्या पतनाची सुरुवात झाल्याचेच हे निदर्शक मानले जा आहे. आजच्या जबरदस्त पडझडीमुळे गौतमशेठ अदानी चिंताग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, नियम आणि संकेत धाब्यावर बसवून अदानीशेठच्या कंपन्यांत सरकारी कंपन्यांना गुंतवणूक करायला लावणारे मोदी सरकार तोंडावर आपटणार आहे. मात्र, मोदी सरकारच्या शेठधार्जिण्या धोरणामुळे अंतिमत: देशातील कोट्यवधी सर्वसामान्य गुंतवणूकदारांचेच मोठे नुकसान होणार आहे.
हिंडनबर्ग रिसर्च रिपोर्टनंतर आतापर्यंत अदानीचे 65 हजार कोटींहून अधिक रुपये बुडाल्याची माहिती आहे. शेअर बाजारात आजच्या दिवसाची सुरुवात होताच स्थिती अशी आहे –
- अदानी विल्मर 5% घसरण
- अदानी गॅस 15% खाली
- अदानी पोर्ट 4% घसरण
- अदानी ग्रीन 10% खाली
- अदानी पॉवर 5% घसरण
ही सुरुवातीची परिस्थिती आहे. यातून रिकव्हरी होण्याची शक्यता कमीच आहे. अदानी समूहाच्या कंपन्यांचे शेअर आणखी घसरून खालच्या पातळीवर पोहोचण्याची शक्यता आहे.
हिंडनबर्ग संशोधन अहवाल (Hindenburg Research Report) चर्चेत आल्यापासून अदानी सेठ अमेरिकन स्टॉक एक्सचेंजमध्ये रातोरात प्रसिद्ध झाले आहेत. केवळ अमेरिकेतच नाही तर जगभरातील कंपन्या, गुंतवणूक बँका आणि रेटिंग एजन्सींच्या बोर्डरूममध्ये सध्या अदानी शेठचीच चर्चा आहे. आज या प्रसिद्धीचा परिणाम मुंबई शेअर बाजारात पाहायला मिळत आहे. यापूर्वी, हिंडनबर्ग अहवालानंतर निकोला कॉर्पचे बाजार मूल्य 34 अब्ज वरून 1.34 अब्ज पर्यंत खाली यायला एक वर्ष लागले.
अदानी प्रकरणात सध्या सेबीवर दबाव आहे. सेबीला आपली जागतिक प्रतिष्ठा वाचवायची असेल, तर अदानी सेठला निर्दोष ठरवावे लागेल किंवा दोषी ठरवण्यासाठी प्रक्रिया सुरू करावी लागेल. आधीच कलंकित झालेल्या सेबीसमोर आता आपली प्रतिष्ठा जपण्याचे हेच दोन पर्याय आहेत. त्यातून सेबीला एकाची निवड करावी लागेल. तूर्तास, सेबीच्या भूमिकेची आणि अधिकृत स्पष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.
अदानीशेठने ज्यांच्याकडून कर्ज घेतलेय त्या बँका संकटात!
जगातील सर्व बँका, बाँडधारक आणि मध्यस्थही यापुढे अदानी समूहात गुंतवणुकीचा निर्णय घेण्यापूर्वी शंभरदा विचार करतील. अनेक मंडळी सध्या अदानी समूहातील गुंतवणूक काढून घेण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, भारतीय शेअर बाजारातील जोखीम कमी करण्यासाठी परदेशी गुंतवणूकदार आज आणखी विक्री करू शकतात. गेले काही दिवस परदेशी गुंतवणूक संस्था सातत्याने विक्री करत आहेत. एकंदरीत, अदानीशेठने ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे, अशा भारतीय आणि आंतरराष्ट्रीय बँकांवर दबाव असेल. या बँकांचे शेअर्सही जबरदस्त खाली घसरू शकतात.

हे सुद्धा वाचा :
सुपर मंडे : शेयर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले; 6 लाख कोटी रुपयांची कमाई !
मोदींच्या मर्जीतल्या अदानीशेठच्या साम्राज्यातील पत्त्यांचा बंगला कोसळवायला आता आणखी एक धक्का पुरेसा ठरू शकेल. अर्थात, अदानीशेठच्या डुबण्याची किंमत भारतीय बँका, भारतीय संस्था-कंपन्या, सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदार आणि पर्यायाने देशालाच, देशातील जनतेलाच चुकवावी लागेल. बाकी, फकिरांचे काय आहे? ते तर देश आणि जनतेला कंगाल करून झोला उठाके हिमालयातील गुहेत जाऊन बसतील!