33 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeराजकीयचंद्रकांत पाटील वापरतात दोन मोबाईल फोन, पण दोन्ही जुनाट जमान्यातले !

चंद्रकांत पाटील वापरतात दोन मोबाईल फोन, पण दोन्ही जुनाट जमान्यातले !

टीम लय भारी

मुंबई : साधारण तीन दशकांपूर्वी भारतात मोबाईल फोनचे आगमन झाले. मोटोरोला, नोकीया या कंपन्यांचे हॅण्डसेट त्यावेळी वापरले जायचे. हे फोन आता हद्दपार झाले आहेत.आलेले फोन घेणे, इतरांना फोन करणे, मोजक्याच शब्दांत एसएमएस करणे अशा अत्यल्प सुविधा जुन्या हॅण्डसेटमध्ये होत्या. पण गेल्या दहा बारा वर्षांत मोबाईल तंत्रज्ञानात वेगवान बदल झाले. मिनिटा – मिनिटाला नवनवीन तंत्रज्ञानातील बदल येवून आदळत आहेत.

सगळ्यांच्या हातात ‘स्मार्ट’ फोन आले आहेत. मोबाईल तंत्रज्ञान पाचव्या पिढीमध्ये (‘फाईव्ह जी) जाऊन पोचले आहे. बोलण्याच्या वापरापेक्षाही विविध ॲप्स, ट्विटर, फेसबुक, वॉट्स अप अशा सोशल मीडियासाठी मोबाईल फोन्सचा वापर अधिक वाढला आहे.‘स्मार्ट फोन’ ही लोकांची गरज बनली आहे. अन्न, वस्त्र, निवारा याप्रमाणे मोबाईल फोनचे महत्व वाढले आहे. अन्य व्यावसायिकांप्रमाणेच राजकीय नेत्यांनाही स्मार्ट फोनची गरज महत्वाची बनली आहे. ‘जितका नेता मोठा, तितकाच स्मार्ट फोन्सचा वापर मोठा’ असे समीकरण बनले आहे.

भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र, आपला साधेपणा कायम ठेवलेला आहे. ते दोन मोबाईल फोन वापरतात. पण दोन्हीच्या दोन्ही फोन जुनाट पद्धतीचे आहेत. दुसऱ्यांना फोन करायचे, अन् दुसऱ्यांकडून आलेले फोन घ्यायचे, एवढ्याच मर्यादीत वापरासाठी चंद्रकांतदादा मोबाईल फोन वापरतात.

आता प्रश्न उपस्थित होईल की, चंद्रकांतदादा ‘बाबा आदम’च्या जमान्यातील फोन वापरतात. तरीही ते सोशल मीडियावर मात्र जोरात ॲक्टीव्ह कसे काय असतात. फेसबुक, ट्विटर व वॉट्स अपवर त्यांचे संदेश, व्हिडीओ सतत येत असतात. ते सुद्धा अगदी प्रभावीपणे.
चंद्रकांतदादांनी ‘स्मार्ट फोन’ वापरासाठी स्वतःला बदलून घेतले नसले तरी बदलासोबत चालण्यासाठी यंत्रणा विकसित केली आहे. ही यंत्रणा सुद्धा साधीच आहे. पण यंत्रणेचे काम मात्र प्रभावी आहे.

यलप्पा व अभय वंटे नावाचे त्यांचे दोन पीए आहेत. Whats App वर एखादा व्हिडीओ मागवून घ्यायचा असेल, किंवा व्हिडीओ पाठवायचा असेल, सोशल मीडियावरील काही संदेश पाहायचा असेल तर या दोघांची मदत चंद्रकांतदादा घेतात. पुण्यात आणि मुंबईत यलप्पा व अभय दादांसोबत असतात.

चंद्रकांतदादा कोल्हापूरला असतील तर राहूल चिकोडे नावाचे भाजपचे पदाधिकारी चंद्रकांतदादांसाठी स्मार्ट फोन्सची मदत करतात.
चंद्रकांतदादांचा सोशल मीडिया प्रभावी आहे. त्यांचे हे काम पक्षाच्या वतीने समीर गुरव सांभाळतात. समीर गुरव यांनी चंद्रकांतदादांना सोशल मीडियात सक्रीय ठेवण्यास मोठे योगदान दिले असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रवासासाठी गाडीही इतरांपेक्षाही साधीच

चंद्रकांतदादा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे त्यांना राज्यभरात सतत दौरे करावे लागतात. अशा पद्धतीने दौरे करणारे इतर राजकीय नेते आलिशान गाडी वापरत असतात. कोट्यवधी रुपयांच्या किमतीच्या गाड्या अनेक पुढारी वापरतात. परंतु तुलनेने साधी असलेली इनोव्हा गाडी चंद्रकांतदादा वापरत असल्याचे सूत्रांनी सांगितले. दादांना मोठ्या संख्येने दौरे करावे लागतात. म्हणून ही गाडी ते वापरतात. अन्यथा यापेक्षाही साधी गाडी त्यांनी वापरली असती, असेही सूत्रांनी सांगितले.

मलईदार पदांवर काम करूनही साधेपणाची जपणूक

देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांतदादा दुसऱ्या क्रमांकाचे मंत्री होते. सोन्याची अंडी देणारी महसूल व सार्वजनिक बांधकाम ही दोन खाती त्यांच्याकडे होती. काही काळ सहकार खातेही त्यांच्याकडे होते. अशी खाती सांभाळणाऱ्या मंत्र्यांकडे पोत्याने ‘लक्ष्मी’ घरात येत असते. पण चंद्रकांतदादांनी लक्ष्मीला महत्व दिले नव्हते की काय ?, असे कुणालाही वाटल्यास त्यात नवल ते काय ?

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी