29 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeमुंबईखेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दडपण्याचे षडयंत्र? मागास वर्गीय मुलांची मदतीसाठी हाक

खेड्यापाड्यातील विद्यार्थ्यांना दडपण्याचे षडयंत्र? मागास वर्गीय मुलांची मदतीसाठी हाक

टीम लय भारी

मुंबई : वरळी येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर समाज कल्याण वसतीगृहातील विद्यार्थी – विद्यार्थिनींनी वसतिगृहाच्या जागेतील अनधिकृत बांधकामांविरोधात आज (दि. 11 जुलै) बेमुदत आंदोलन छेडले आहे. या आंदोलनास आता स्टुडंट्स फेडरेशन आॕफ इंडिया (SFI) ने सक्रिय पाठिंबा दर्शवला आहे.

महाराष्ट्रातील खेड्या – पाड्यातून शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांचे वरळीतील समाज कल्याण वसतीगृह हे शैक्षणिक आधार आहे. ते जपण्यासाठी वसतिगृहातील विद्यार्थ्यांनी आवारात होणाऱ्या अनधिकृत, त्रासदायक बांधकामाविरोधात आवाज उठवत त्यांच्या मदतीसाठी पुकारा केला आहे.

मागील काही दिवसांपासून लाॅकडाऊनचा फायदा घेत काही लोकांनी वसतिगृहाच्या मालकीच्या जागेत अनधिकृत बांधकामे सुरू केली, शिवाय रहदारीच्या जागेत अनधिकृतपणे वाहने पार्क करून मुलांची, प्रामुख्याने अंध विद्यार्थी व विद्यार्थिनी यांची गैरसोय निर्माण केली. यावर विद्यार्थांनी वारंवार तक्रार केली, अधीक्षक,अभियंता यांनी सुद्धा अतिक्रमण हटवण्याचे निर्देश दिले परंतु अनधिकृत कामे तशीच सुरू राहिली.

अनेक तक्रारींनंतर सुद्धा चालू असणाऱ्या या अवैध बांधकामांमुळे वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागला म्हणून विद्यार्थ्यांनी पोलिसांकडे धाव घेतली, त्यानंतर काल व आज हे बांधकाम वरळी पोलिसांनी थांबवले होते. परंतु आज पुन्हा बांधकाम करणारे बागडे नामक स्थानिक व्यक्तीने विद्यार्थ्यांवर आरेरावी करत त्यांच्या अंगावर धावून येत जीवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेमुळे परस्पर विरोधी तक्रारी नोंदवल्या गेल्या आहेत. राजकीय दबाव वापरून वसतिगृहातील विद्यार्थ्यांवर हेतुपुरस्पर वयक्तिक तक्रारी केल्या जात आहेत. विद्यार्थ्यांनी लेखी तक्रार देऊन सुद्धा पोलिसांनी पक्षपाती भूमिका घेत “तुम्हाला काय करायचे ते करा, तुम्ही इथून निघून जा” असे म्हणून निवेदन घेण्यास स्पष्ट नकार दिला.

शैक्षणिक संस्थांच्या आवारात अतिक्रमण करून मुलांना उगाचच त्रास करण्याचे प्रकार खूप आक्षेपार्ह व निंदनीय आहेत अशी भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली आहे. दरम्यान, हे वसतीगृह व विद्यार्थी शासनाने रामभरोसे सोडले आहे. व मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमधून उमटत आहेत.

अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आणि बेकायदेशीरपणे केलेले पार्किंग हटवण्यासाठी,तसेच वरळी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांच्या पक्षपाती धोरणाविरोधात महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागाने तत्काळ या गंभीर प्रकरणी लक्ष द्यावे यासाठी स्टुडंट्स फेडरेशन आॕफ इंडिया (SFI) ,मुंबई जिल्हा कमिटी विद्यार्थ्यांच्या मदतीस धावून आली असून त्याबाबतचा पाठपुरवठा शासनाकडे करीत आहे.

हे सुद्धा वाचा…

VIDEO : आमदार शहाजी पाटील यांनी दाखवला निर्लज्जपणा !

गोगलगायीच्या त्रासाने धनंजय मुंडे वैतागले!

सर्वोच्च न्यायालयाचा शिंदे गटाला दिलासा, आता सुरू होणार मंत्रीमंडळ विस्ताराची लगबग

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी