अनैतिक संबंधातून गर्भवती राहणाऱ्या तरुणीने चोवीस तासापूर्वी जन्म झालेले बाळ (baby born) रस्त्याच्या कडेला कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर फेकले. तिच्या रडण्याच्या आवाजाने रस्त्याने जाणाऱ्या युवकाचे लक्ष घेले. त्याने तिकडे धाव घेतली असता चिमुकले बाळ आढळून आले. ही दुर्दैवी घटना बुधवारी सकाळी ६ वाजता कुंजीलाल पेठ परिसरात उघडकीस आली. माहिती मिळताच अजनी पोलिसांनी घटनास्थळ गाठून मुलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळ सुखरूप आहे.कुणीतरी परिसरातील तरुणीनेच या बाळाला फेकल्याची चर्चा आहे. अनैतिक संबंधातून जन्माला आलेल्या बाळाला कुठेतरी सोडून मोकळे होण्याचा हा प्रकार असावा, अशी चर्चा परिसरात होती.(A baby born out of an illicit relationship was thrown on the street)
अजनी पोलीस ठाण्यांतर्गत कुंजीलालपेठ परिसरातील रहिवासी लुटे यांच्या घराच्या बाजूला असलेल्या गल्लीत एक दिवसाचे स्त्री जातीचे बाळ होते. ती गल्ली फारशी वापरण्यात नसल्याने कचरा आणि माती पसरलेली आहे. त्या ठिकाणी कुणीतरी बाळाला सोडून निघून गेले. सकाळी ६ वाजताच्या सुमारास बाळाच्या रडण्याचा आवाज एका युवकाला आला. तो थेट कचऱ्याच्या ढीगाऱ्याजवळ गेला. त्याने शोध घेतला असता चिमुकली आढळून आली. लुटे यांनी लगेच अजनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. चिमुकलीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता डॉक्टरांनी त्वरित उपचार केल्यामुळे बाळ सुखरूप आहे. दरम्यान पोलिसांनी अपत्य जन्माची लपवणूक करणाऱ्या तरुणीविरुद्ध गुन्हा नोंदविला असून, बाळ ठेवणाऱ्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत. सकाळपासून पोलिसांनी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. मात्र, काही सुगावा लागला नाही. कुणाची नुकतीच प्रसूती झाली काय, याचाही पोलीस शोध घेत आहेत.