एका शेअरवर अनेक बोनस मिळतील, आमच्या कंपनीचे स्टॉक (stock market) आयपीओ घेतले तर निव्वळ नफाच मिळेल, असे अमिष दाखवत सायबर चोरट्यांनी (Cyber thieves) शहरातील डॉक्टरला तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा (duped) घातला आहे. सोबतच इतर दोघांकडून १४ लाख रुपये उकळून फसविले (duped) आहेत. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात अनोळखी व्हाटस् अँपधारक व इन्स्टाग्राम प्रोफाईलधारकांवर फसवणुकीसह आयटी अक्ट अन्वये गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील डॉक्टरसह दोघांना सायबर भामट्यांनी २८ मार्च ते २० मे २०२४ दरम्यान वेगवेगळ्या व्हाटस् अप क्रमांक आणि इन्स्टाग्राम प्रोफाईलवरुन संपर्क साधला. (Cyber thieves duped three in the name of stock market)
आम्ही शेअर मार्केटमधील अधिकृत कंपनीचे ब्रोकर आहोत. गुंतवणूक करायचीच आहे आणि आर्थिक फायदाच हवा असेल तर आमच्याकडे ट्रेडिंग, स्टॉक टू आयपीओ घ्या, असे अमिष दाखविले. नंतर, शेअर मार्केटमधील स्टॉक आणि आयपीओ स्वतंत्ररित्या घेतल्यास आर्थिक फायदा येईल, असे सांगून आमच्या कंपनीचे ट्रेड, स्टॉक आम्हीच विकू शकतो, त्यामुळे गुंतवणूकदारास कुठलाही तोटा होत नाही, उलट फायदाच होतो, असे अमिष दाखविले.
आयपीओ, शेअर मार्केट व स्टॉक ट्रेडिंग अतिशय फायदेशिर आहे असे सांगून नवनवीन स्कीम सांगितल्या. आम्ही अधिकृत असून आमचीच कंपनी अपर सर्किट स्टॉक ट्रेडिंग करते. त्यातून जास्तीचे पैसे देऊन आर्थिक फायदा मिळतो, असे म्हणूण विश्वास संपादन केला. त्यामुळे डॉक्टरसह इतर दोघांचा विश्वास बसला आणि त्यांनी आर्थिक गुंतवणूक करण्यास समर्थता दर्शविली. यानंतर संशयित सायबर चोरट्यांनी संबंधित मोबाईल अपवरुन इन्स्टिट्यूशनल ट्रेडिंग अकाउंटच्या माध्यमातून स्टॉक ट्रेडींग व आयपीओ कन्फर्म अलॉटमेंट दिसतील असे भासविण्याचा बहाणा करुन जास्त नफा मिळेल, असे दाखविले.
दरम्यान, संशयितांनी सांगितल्याप्रमाणे डॉक्टरने तब्बल १ कोटी ४३ लाख रुपये गुंतविले, तसेच इतर दोघांनीही एकूण १३ लाख रुपये गुंतविले. संशयितांनी सांगितलेल्या बँक खात्यांवर पैसे भरले असता संशयितांनी काही प्रमाणात नफा बँक खात्यात क्रेडिट झाल्याचे भासविले. प्रत्यक्षात हे पैसे डॉक्टरसह इतरांच्या बँक खात्यात आलेच नसल्याने ते काढतांना किंवा जमा रक्कम तपासण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. तेव्हा फसवणूक झाल्याचे उघड झाले. याप्रकरणात तिघांना एकूण एक कोटी ५७ लाख एक हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून तपास वरिष्ठ निरीक्षक रियाज शेख करत आहेत.