28 C
Mumbai
Thursday, November 30, 2023
घरक्राईमड्रग्जमाफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक, ड्रग्जच्या रॅकेटचे गूढ उलगडणार?

ड्रग्जमाफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक, ड्रग्जच्या रॅकेटचे गूढ उलगडणार?

कुख्यात ड्रग्ज माफिया ललित पाटील याला जेरबंद करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. ड्रग्ज माफिया ललित पाटील याला काल बंगळुरूमधून अटक करण्यात आली आहे. ललितसोबत त्याच्या आणखी दोन साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे. अंधेरी कोर्टाने ललित पाटीलसह त्यांच्या दोन्ही साथीदारांना 23 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ललित पाटीलच्या अटकेनंतर नाशिकमधील ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींची संख्या 11 झाली आहे. ललित पाटीलच्या अटकेमुळे नाशिकमधील ड्रग्जची फॅक्टरी, ड्रग्जचे वितरण आणि त्याचे देशातील रॅकेटचे गूढ उकलण्यास मदत होणार आहे. बंगळुरूमध्ये ललित पाटीलला कुणी आश्रय दिला, त्याला परराज्यांत कुणाची साथ मिळत होती, आदी सर्व प्रश्नांची उत्तरे आता मिळू शकतील. कारण ललित पाटील या ड्रग्ज फॅक्टरी प्रकरणातील मुख्य आरोपी आहे.

मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तब्बल तीन दिवस पाळत ठेवून 7 ऑक्टोबर रोजी नाशिकमधील शिंदे गावातील श्री गणेशाय इंडस्ट्रीज ही ड्रग्जची निर्मिती करणारी फॅक्टरी उद्ध्वस्त केली होती. या कारवाईत पोलिसांनी ३०० कोटींचे दीडशे किलो ड्रग्ज हस्तगत जप्त केले. ड्रग्जची निर्मिती करणारी फॅक्टरी असल्याचे उघडकीस आल्यामुळे राज्यात खळबळ उडाली होती. यातील मुख्य आरोपी होते ललित पाटील शिवाय त्याचा भाऊ भूषण पाटील, अभिषेक बलकवडे आणि इतर.


गंभीर बाब म्हणजे मुख्य आरोपी ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयात 2020 पासून उपचार घेत होता. त्याला 2020 मध्ये ड्रग्ज प्रकरणात अटक झाली होती. पण उपचाराच्या नावाखाली तो ससून रुग्णालयात होता आणि तिथूनच ड्रग्जचे रॅकेट चालवायचा. 2 ऑक्टोबरला ससून परिसरात ड्रग्जचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर ललित पाटील ससून रग्णालयातून फरार झाला होता. तेव्हापासून मुंबई पोलीस त्याचा शोध घेत होते.

ससूनमधून मला पळवण्यात आलं

मुंबईतील अंधेरी कोर्टात आणल्यानंतर ललित पाटील यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीसमोर मोठा गौप्यस्फोट केला. मी ससूनमधून पळालो नाही तर मला पळवण्यात आले. मला पळवण्यात कुणाकुणाचा हात आहे, हे सर्व मी सांगेन, असे सांगितले.

ललित पाटीलला अशी झाली अटक

फरार ललित पाटीलने अटक आरोपीला फोन केला होता. त्यावर पोलिसांनी लक्ष ठेवले आणि अटक आरोपीकडून ललित कुठे आहे, याची माहिती मिळवली. त्याप्रमाणे मुंबई पोलिसांनी पाठलाग केला. ललित ससूनमधून पळून गेल्यानंतर प्रथम नाशिकला गेला. तेथून इंदूरला आणि पुढे सूरतला गेला. तिथून पुन्हा धुळे, छ. संभाजीनगर आणि तिथून बंगळुरूमध्ये गेला. आणि काल बंगळुरूमधून चेन्नईमध्ये जाण्याच्या प्रयत्नात असताना त्याला अटक केली.


ड्रग्ज प्रकरणी अटकसत्र

पोलिसांनी ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील आणि साथीदार अभिषेक बलकवडेला उत्तर प्रदेशमधील बाराबंकी गावातून 9 ऑक्टोबरला अटक केली. सध्या दोघेही २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत आहेत. त्यानंतर 16 ऑक्टोबरला पोलिसांनी या प्रकरणात आणखी 6 जणांना अटक केली. आणि आता 17 ऑक्टोबरला मुख्य आरोपी ललित पाटील आणि त्याच्या दोन साथीदारांना बंगळुरूमधील अटक करण्यात आली.

हे ही वाचा 

कल्याणच्या युवतीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न; ऑनलाईन टॅक्सी किती सुरक्षित?

दांडियात महिलांची छेड काढाल, तर तुरुंगात जाल!

महाराष्ट्र की महा’ड्रगनिर्मितीराष्ट्र’? नाशिकनंतर सोलापूरमध्येही ड्रग्जचा कारखाना

नाशिक, सोलापूरमधील 3 ड्रग्जच्या फॅक्टरी उद्ध्वस्त

मुंबईतील साकीनाका पोलिसांनी 7 ऑक्टोबरला नाशिकच्या शिंदे गावात कारवाई करून श्री गणेशाय इंडस्ट्रीज ही ड्रग्जची उद्ध्वस्त केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी नाशिक पोलिसांनी त्याच शिंदे गावातील आणखी एक ड्रग्जची फॅक्टरीवर कारवाई केली. त्यानंतर 16 ऑक्टोबरला मुंबई गुन्हे शाखेने थेट सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील चिंचोली एमआयडीसीमधील ड्रग्ज फॅक्टरीवर कारवाई केली. या फॅक्टरीतून 100 कोटींचा ड्रग्ज आणि मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईमुळे महाराष्ट्रात ड्रग्ज निर्मिती आणि ड्रग्ज माफियांचे जाळे मोठ्या प्रमाणात सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ड्रग प्रकरणाचा ऑगस्टपासून तपास

ललित पाटीलला बेड्या ठोकल्यानंतर मुंबईचे पोलीस सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाची माहिती दिली. आम्ही ड्रगसंदर्भात तपास करत असून आतापर्यंत एकूण 15 आरोपींना अटक केल्याची माहिती त्यांनी दिली. ऑगस्टमध्ये 10 ग्रॅम ड्रगपासून सुरू तपास 105 किलोपर्यंत पोहोचला आणि तब्बल 300 कोटींच्या ड्रगचा साठा जप्त करण्यात यश आले. या प्रकरणातील पहिला आरोपी अन्वर सय्यद असून अटक झालेला ललित पाटील हा 15वा आरोपी असल्याचे सहआयुक्त सत्यनारायण चौधरी यांनी सांगितले. दरम्यान, 2 ऑक्टोबरला ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला होता. याचा तपास पुणे पोलीस करत असल्याची माहिती चौधरी यांनी दिली.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी