डोंबिवलीमध्ये काल एमआयडीसीत फेज २ मध्ये कंपनीत भीषण स्फोट ( Dombivali blast case) झाल्याची घटना घडली होती. ज्यानंतर या परिसरातील अनेक कंपन्यांमध्ये भीषण अग्नितांडव बघायला मिळाले असून बहुतांश कंपन्याचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई करत पहिली अटक केली आहे. पोलिसांकडून अमुदान कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता, मलय प्रदीप मेहता यांच्यासह इतर संचालक व्यवस्थापक आणि देखरेख अधिकाऱ्यांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदविण्यात आला होता.(One arrested from Nashik in Dombivali blast case)
त्यानंतर कंपनीचे मालक फरार होते. अमुदान कंपनीचे मालक फरार झाल्यानंतर नाशिकला पळाले असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली होती. त्यानंतर आज (शुक्रवार) पोलिसांनी कंपनीचे मालक मालती प्रदीप मेहता यांना अटक करण्यात आली आहे. नाशिक पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान एनडीआरएफच्या पथकाकडून शुक्रवारी सकाळापासून पुन्हा शोधमोहिम सुरू करण्यात आली. घटनास्थळी पाच ते सहा गाड्या दाखल झाल्या असून बचावकार्य सुरू झाले आहे. या दुर्घटनेत आत्तापर्यंत ११ जणांचे मृतदेह हाती लागले आहे. गुरवारी रात्रीपर्यंत हा आकडा ८ होता मात्र आज सकाळपासून आणखी तीन मृतदेह शोधमोहिमेदरम्यान काढण्यात आले आहेत. त्यामुळे मृतांची संख्या आता ११ वर पोहोचली आहे. या दुर्घटनेत आणखी काही जण अडकल्याची शक्यता असून मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.
एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोटानंतर लागलेल्या भयंकर आगीने डोंबिवली परिसर हादरुन गेला आहे. काल दुपारी दोन वाजता डोंबिवली एमआयडीसीतील अमुदान कंपनीत भीषण स्फोट झाला. ही दुर्घटना इतकी भयंकर होती की परिसरातील २ ते ३ किमीपर्यंतच्या इमारतींच्या काचा फुटल्या तसेच हादरेही बसले. कालपासून या दुर्घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दल तसेच एनडीआरएफच्या जवानांकडून बचावकार्य सुरू होते.