ऑनलाईन कॅब बूक करून सुरक्षित प्रवास करण्याचे स्वप्न बाळगत असाल, तर वेळीच सावध व्हा! कारण कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेमुळे तुम्ही सावध व्हाल, अशी अपेक्षा आहे. कारण नवी मुंबईतून कल्याणमधील नेतेवली गावात कॅब बूक करून परतणाऱ्या युवतीवर कठीण प्रसंग ओढावला होता. मात्र, तिने वेळीच आरडाओरड केल्यामुळे वाचली. त्यानंतर पोलिसांनीही तातडीने तपास करून त्या नराधमाला बेड्या ठोकल्या. ही घटना आहे १४ ऑक्टोबरची. राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढत असताना ऑनलाईन कॅब बूक करून असा प्रसंग ओढावणार असेल तर विश्वास कुणावर ठेवणार, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्यामुळे यापुढे कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांनी चालकांची पोलीस चौकशी करून त्यांना नियुक्त करावे, अशी मागणी आता होत आहे. याची राज्य आणि राष्ट्रीय महिला आयोगानेही दखल घ्यावी, अशीही मागणी होत आहे.
ती २३ वर्षांची तरुणी कल्याणमधील नेतेवलीमध्ये राहते आणि नवी मुंबईतील एका खासगी कंपनीत नोकरी करते. शुक्रवारी ती कामाला गेली होती. आणि शनिवारी पहाटे काम संपवून घरी जाण्यासाठी ऑनलाईन कार बूक केली. नवी मुंबईतून ती कल्याणच्या दिशेने जात असताना तिला डुलकी लागली. त्यावेळी गाडी कल्याण-शीळ मार्गावर होती. पहाटेची वेळ होती, आजूबाजूला कुणी नाही हे पाहून टॅक्सीचालक राकेश जयस्वाल याने धावत्या टॅक्सीतच युवतीशी गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. तरुणीने लगेच आरडाओरड केल्यामुळे घाबरून टॅक्सीचालक जयस्वाल पळून गेला.
हे ही वाचा
शरद पवारांनी रिपाईं फोडली; पडळकरांचा नवा आरोप
‘तो मी नव्हेच!’ बोरवणकरांच्या आरोपांवर ‘दादां’चे प्रत्युत्तर
फुकट्या प्रवाशांचे ‘कल्याण’, १६.८५ लाखांचा दंड वसूल
या धक्क्यातून कसेबसे सावरत तरुणीने कल्याणमधील कोळसेवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. पोलिसांनीही सीसीटीव्ही फूटेज पाहून कार कुठल्या दिशेने गेली हे पाहून तपास केला. आणि नवी मुंबईतील ऐरोलीमधून आरोपी राकेश जयस्वालला अटक केली. कोळसेवाडी पोलिसांची आरोपी राकेश जयस्वालविरोदात भा.द.वि.च्या कलम 354, 509 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलीस आधिक तपास करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे महिला प्रवासी घाबरून गेल्या आहेत. अशा घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी ऑनलाईन टॅक्सी सेवा पुरवणाऱ्या कॅब कंपन्यांनी चालकांचे कॅरेक्टर पाहून आणि पोलीस चौकशी करून नियुक्त करावे, अशी मागणी आता महिला करत आहेत.