टीव्ही अभिनेत्री तुनीषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी सहकलाकार शीजान खानला अटक केली आहे. (Tunisha Sharma Love Jihad Victim) या प्रकरणात लव्ह जिहाद अँगल समोर आल्याचे सांगत आता हिंदुत्ववादी संघटनांनी त्यात उडी घेत पोलिसांवर दबाव वाढवला आहे. तुनीषाला ब्लॅकमेल करून तिचे लैंगिक शोषण केले जात होते का, याचा सखोल तपास करण्याची मागणी होत आहे.
तुनीषा शर्माच्या आईने याप्रकरणी तक्रार दिली आहे. त्यावरून वसईतील वाळीव पोलिसांनी गुन्हा दाखल करून शीजान खानला अटक केली. त्याला आज वसई न्यायालयात हजर केले जाणार आहे. शीजान हाही तुनीषासोबत “अलिबाबा : दास्तान-ए-काबुल” या मालिकेत मुख्य भूमिकेतील कलाकार आहे. शीजानने तुनीषाला प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. या प्रेमसंबंधातून आलेले नैराश्य व शीजानच्या दबावातूनच तुनीषाने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले, असा आरोप तिच्या आईने केला आहे. त्यामुळे शीजानविरोधात कलम 306 खाली तुनीषाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला गेला आहे.

तुनीषाने अलिबाबा मालिकेचे शुटिंग सुरू असतानाच स्टुडिओत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सहाय्यक पोलीस आयुक्त असलेले चंद्रकांत जाधव हे आता या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, तुनीषाच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जेजे रुग्णालयात करण्यात आले आहे. पोस्टमार्टेम अहवालाची प्रतीक्षा आहे.
राज्यात लव्ह जिहाद संबंधात कायद्याचे वारे वाहत आहेत. हिंदुत्ववादी संघटनांनी त्यावरून वातावरण तापविले आहे. राज्य सरकारनेही अलीकडेच आंतरधर्मीय विवाहांच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली आहे. अशात आता तुनीषाच्या आत्महत्येत लव्ह जिहाद अँगल समोर आल्याने हिंदुत्ववादी संघटना हा मुद्दा उचलून आक्रमक होऊ पाहत आहेत. सिने इंडस्ट्रीत नवोदित हिंदू अभिनेत्रींना जाळ्यात ओढून त्यांचे शोषण करणारी गँग कार्यान्वित असल्याचे आरोप यापूर्वीही झाले आहेत. यानिमित्ताने त्यावरून पुन्हा वाद उभा राहण्याची शक्यता आहे.
Tunisha Sharma, Love Jihad Victim, Sheejan Khan arrested, Vasai Police