30 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरसंपादकीयRajiv Gandhi : राजीव गांधी - सोनिया गांधींच्या विवाहावेळी बच्चन कुटुंबियांनी ‘माहेर’ची...

Rajiv Gandhi : राजीव गांधी – सोनिया गांधींच्या विवाहावेळी बच्चन कुटुंबियांनी ‘माहेर’ची जबाबदारी पार पाडली होती

दिल्लीतील बच्चन कुटुंबियांचा बंगला हे सोनियांचे त्यावेळचे माहेर होते. हरिवंशराय बच्चन यांचा त्यावेळी नवी दिल्लीत बंगला होता. विवाहाच्या वेळी याच बंगल्यावरून सोनिया गांधी सासरी नांदायला गेल्या होत्या.

राजीव गांधी आणि सोनिया गांधी (Rajiv Gandhi-Sonia Gandhi) यांची भेट ब्रिटनमध्ये झाली होती. नंतर दोघांचा एकमेकांवर जीव जडला. आणि पुढे विवाह सुद्धा झाला. त्यावेळी इंदिरा गांधी देशाच्या माहिती व प्रसारण मंत्री होत्या. नंतर त्या पंतप्रधानही झाल्या. याउलट सोनिया गांधी यांचे वडील हे मध्यमवर्गीय होते. सोनिया गांधी यांच्या या प्रेमप्रकरणाला त्यांच्या वडीलांचा विरोध होता. त्यामुळे त्यांचे वडील या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित राहिले नव्हते. मात्र सोनियांचे चुलते विवाहासाठी आवर्जून उपस्थित राहिले होते. सोनिया यांचे कन्यादान चुलत्यांनी केले. दिल्लीतील बच्चन कुटुंबियांचा बंगला हे सोनियांचे त्यावेळचे माहेर होते. हरिवंशराय बच्चन यांचा त्यावेळी नवी दिल्लीत बंगला होता. विवाहाच्या वेळी याच बंगल्यावरून सोनिया गांधी सासरी नांदायला गेल्या होत्या.

सोनिया गांधी इंग्लंडमधील एका शिक्षण संस्थेत शिकत होत्या. त्याच वेळी राजीव गांधी इंग्लंडमधील ट्रिनिट महाविद्यालयात शिकत होते. याच महाविद्यालयात राजीव यांचे आजोबा जवाहरलाल नेहरू यांनी सुद्धा शिक्षण घेतले होते. सोनिया गांधी त्यावेळी ट्रिनिटीच्या ग्रीक रेस्टॉरन्टमध्ये जायच्या. थोड्याफार फरकाने त्या ठिकाणी इटालियन जेवण मिळायचे. याच ठिकाणी सोनिया गांधी यांना वेटरची (बैरन) नोकरी मिळाली.

सोनिया गांधी यांच्या या वेटरच्या नोकरीचा अपप्रचार भाजप व हिंदुत्ववाद्यांकडून केला जातो. सोनिया यांचे पूर्वाश्रमीचे नाव एडविगे एंटोनियो माइनो हे होते. हे नाव व त्यांची वेटरची नोकरी यांचा परस्पर संबंध साधून हिंदुत्ववाद्यांकडून बदनामी केली जाते. सोनिया गांधी यांना बारबाला म्हणून सुद्धा बरेच हिंदुत्ववादी हिणवतात. वास्तवात जी मंडळी युरोपात जाऊन आली आहेत, त्यांना माहित आहे की, तिथे बिअरच्या बाटल्या सुद्धा फुटपाथवरील दुकानांमध्येही विकत मिळतात. त्यामुळे किराणा मालाच्या दुकानाला सुद्धा बिअर बार म्हटले तर नवल वाटायला नको.

ज्या हॉटेलमध्ये सोनिया गांधी वेटर म्हणून नोकरी करायच्या तिथेच राजीव गांधी आपल्या मित्रांसोबत भोजन करण्यासाठी आले होते. सोनिया गांधी यांच्याशी त्यांची तिथेच ओळख झाली. सन १९६५ चा तो काळ होता. त्यानंतर दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले.

इंदिरा गांधी एकदा ब्रिटनला गेल्या होत्या. तेव्हा राजीव गांधी यांनी सोनिया गांधींची इंदिरा गांधींसोबत ओळख करून दिली. त्यावेळी सोनिया गांधी यांना इंग्रजी व्यवस्थित बोलता येत नव्हते. मग इंदिरा गांधी यांनी सोनिया गांधींशी फ्रेंच भाषेतून संवाद साधला. काही दिवसांनंतर राजीव गांधी यांनी संजय गांधी यांची सुद्धा सोनिया गांधींशी ओळख करून दिली.

त्यावेळी इंदिरा गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली संजय गांधी राजकारणाचे धडे गिरवत होते. संजय हेच इंदिरा गांधी यांचे राजकीय उत्तराधिकारी असणार होते. राजीव गांधी यांना राजकारणात काडीमात्र रस नव्हता. नियतीमुळे त्यांना भविष्यात राजकारणात यावे लागेल, आणि पंतप्रधान व्हावे लागेल असे तेव्हा कुणालाच वाटले नव्हते.

सोनिया गांधी जरी परदेशी असल्या तरी त्या सुसंस्कारीत होत्या. त्यामुळे इंदिरा गांधी व संजय गांधी यांनाही राजीव गांधी यांची पसंत योग्य वाटली. मात्र सोनिया गांधी यांच्या वडीलांचा या विवाहाला विरोध होता. स्वतः राजीव गांधी यांनी इटलीला जावून सोनिया गांधी यांच्या वडीलांचा होकार मिळविण्यासाठी प्रयत्न केले होते.

‘तुम्ही दोघांनी एकमेकांशी एक वर्ष बिल्कूल भेटायचे नाही. एक वर्षानंतर पाहूयात काय करायचे ते…’ अशी अट सोनिया गांधी यांच्या वडीलांनी राजीव गांधी यांना घातली. राजीव गांधी यांनी ती पाळली सुद्धा.
एक वर्षानंतर, जानेवारी १९६८ मध्ये सोनिया गांधी दिल्लीच्या विमानतळावर पोहोचल्या. त्यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी राजीव, संजय व इतर मित्र परिवार उपस्थित होता. राजीव गांधींनी सोनिया यांची अमिताभ बच्चन यांच्यासोबत ओळख करून दिली. ‘हा माझा मित्र आहे. आपला विवाह होईपर्यंत तुला यांच्याच घरी राहायचे आहे’, असे राजीव यांनी सोनियांना सांगितले.

सोनिया गांधी भारतात आल्यानंतर पहिल्या भारतीय व्यक्तीला भेटल्या होत्या. त्यांचे नाव होते अमिताभ बच्चन !. त्यावेळी अमिताभ बच्चन सुपरस्टार म्हणून उदयास आलेले नव्हते.
सोनिया गांधी यांनी १९८५ मध्ये एका नियतकालिकाला मुलाखत दिली होती. त्यात तेजी बच्चन या माझ्या तिसऱ्या आई आहेत. पहिली आई इटलीची. दुसरी आई इंदिरा गांधी आणि तिसरी तेजी बच्चन असे सोनिया गांधी यांनी त्या मुलाखतीत म्हटले होते.

तेजी बच्चन यांनी सोनिया गांधी यांना भारतीय भोजन, परिवेष, भाषा, संस्कृती याबाबत अवगत करून दिले होते. सोनिया गांधी जवळपास महिनाभर बच्चन यांच्या घरी राहिल्या होत्या. २५ फेब्रुवारी १९६८ रोजी राजीव व सोनिया यांचा विवाह झाला. सोनिया गांधी यांचे चुलते एंजेलो प्रेदेबोन यांनी कन्यादान केले.

इंदिरा गांधी यांना दोन सुना होत्या. एक सोनिया गांधी आणि दुसऱ्या मनेका गांधी. सोनिया परदेशी, तर मनेका भारतीय. पण दोघींमध्ये जमीन अस्मानचा फरक होता. सोनिया गांधी परदेशी असून सुद्धा कमालीच्या सुसंस्कारीत होत्या. इंदिरा गांधी यांचे कुटुंब फार उत्तम प्रकारे त्या सांभाळायच्या. इतकेच काय मनेका गांधी यांचा मुलगा वरूण याचाही सांभाळ सोनिया गांधी यांनी उत्तम प्रकारे केला होता. राहूल व वरूण या दोन्ही लेकरांना सोनिया गांधी यांनी सांभाळले होते.

याउलट मनेका गांधी या भारतीय होत्या. पण त्या कमालीच्या ऐय्याशी होत्या. मित्र मैत्रिणींसोबत त्या जाम पार्टी, मौजमजा करायच्या. मनेका गांधी यांच्या या ऐय्याशीच्या स्वभावामुळेच त्यांचे इंदिरा गांधी यांच्यासोबत खटके उडायचे. याउलट सोनिया गांधी या मात्र कुटुंबवत्सल होत्या. त्यामुळे इंदिरा गांधींनाही सोनिया गांधी यांचे कौतुक वाटायचे. राजीव गांधी पंतप्रधान झाल्यानंतर सुद्धा सोनिया गांधी यांनी उत्तम प्रकारे घर सांभाळण्याचे काम केले. भविष्यात राजकारणात येण्याविषयी त्यांचे कोणतेच नियोजन नव्हते. दुर्दैवाने राजीव गांधी यांचे निधन झाले, अन् नियतीने सोनिया गांधींना राजकारणात आणले.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी