राज्य सरकार लवकरच नवी मुंबई महापालिकेच्या (NMMC) शिक्षण विभागात शिक्षक भरती करणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजूरी दिली असून आता पालिकेच्या शिक्षण विभागात वर्ग-1, वर्ग-2, वर्ग-3 आणि वर्ग-4 अंतर्गत एकुण 1081 शिक्षकांची भरती होणार आहे. नगरविकास विभागाने (Department of Urban Development) याबाबत शासननिर्णय जारी केला आहे. त्यामुळे आता भरतीचा मार्ग मोकळा होणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या एकुण 135 शाळा असून या शाळांमध्ये एकूण 58,428 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तर १ हजार 57 इतके शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात एकूण 450 खाजगी शाळा आहेत. सदर शाळांमध्ये एकूण 2,18, 624 विद्यार्थी असून, 9,624 इतके शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. सदर खाजगी शाळांच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण व देखरेख ठेवण्याची जबाबदार महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाची आहे. त्यामुळे उपलब्ध मनुष्यबळावर दिवसेंदिवस ताण वाढत होता.
हे सुद्धा वाचा
आयकर उपायुक्ताला कोर्टाचा दणका; अवमानप्रकरणी 7 दिवसांची पोलिस कोठडी!
त्यामुळे नवी मुंबई महापालिका आयुक्तांनी शिक्षण विभागासाठी अधिकारी, प्राथमिक शिक्षक, माध्यमिक शिक्षक, अंगणवाडी शिक्षिका व अन्य कार्यालयीन कर्मचाऱ्यांची एकूण १०८१ नवीन पदनिर्मितीचा प्रस्ताव शासन मान्यतेसा सादर केला होता. त्या प्रस्तावाला सरकारने मान्यता दिल्याने नवीन शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना १९९२ रोजी झाली त्यानंतर शहराची लोकसंख्या देखील झपाट्याने वाढत आहे. शिक्षण विभागाने राबविलेले विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम, तसेच, आधुनिक तंत्रज्ञान व काळानुरूप शैक्षणिक पध्दतीत अंगिकारलेल्या बदलामुळे महानगरपालिकेच्या शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेत व विद्यार्थी संख्येत मोठ्या प्रमाणात झालेली वाढ या बाबी विचारात घेता, नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभागाकरिता नवीन पदनिर्मिती करणे आवश्यक होते.
तसेच दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या देखील वाढत असल्याने शिंक्षकांची संख्या कमी पडत होती. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी पालक देखील आग्रह करत होते. शिक्षकांची संख्या कमी पडत असल्याने पालकांनी देखील वेळोवेळी महापालिकेकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या अखेर नव्या पदांना शासनाची मंजूरी मिळाली असून आता शिक्षक भरती होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.