30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeएज्युकेशनTAIT Exam : विवाहित महिला उमेदवाराला परीक्षेपासून ठेवले वंचित; राज्य सरकार आणि...

TAIT Exam : विवाहित महिला उमेदवाराला परीक्षेपासून ठेवले वंचित; राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेव्दारे (Maharashtra State Council of Examination) तब्बल 6 वर्षांनंतर शिक्षक भरती करिता शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (TAIT) 2022 चे आयोजन केले आहे. 22 फेब्रुवारी ते 3 मार्चदरम्यान ‘आयबीपीएस’ (IBPS) कंपनीमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. 26 रोजी परीक्षेसाठी गेलेल्या विवाहित महिला उमेदवाराला परीक्षा केंद्रावर ओळखपत्रासाठी कागदपत्रांची योग्य पडताळणी न केल्यामुळे परीक्षेपासून वंचित रहावे लागले. अनेक महिलांची लग्नानंतर नावे बदलतात. त्यामुळे अशावेळी ओळखीचा पूरावा म्हणून विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सादर केले जाते. परीक्षार्थी महिलेने विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र दाखवून देखील ते ग्राह्य न धरता त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे संबंधीत महिला उमेदवाराने सोमवारी (दि.27) रोजी मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व महाराष्ट्र सरकारविरोधात अॅड. शंकर एम काटकर यांचे वतीने रीट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल करुन घेत बुधवारी (1 मार्च) रोजी त्यावर सुनावणी ठेवली असल्याची माहिती अॅड. शंकर काटकर यांनी दिली. (TAIT Exam : Married women candidate debarred from examination; Petition in the Bombay High Court)

राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र या संगणकीय प्रणाली द्वारे शिक्षक भरती करिता ‘टेट’चे आयोजन करण्यात आले आहे. या परीक्षेसाठी अर्जावरील नाव आणि ओळखपत्रावरील नाव तंतोतंत जुळणे अपेक्षीत आहे. मात्र अनेकदा विवाहानंतर महिलांच्या नावामध्ये बदल होते. त्यामुळे कागदपत्रांवर विवाहापूर्वीचे नाव वेगळे आणि विवाहानंतरचे नाव वेगळे असते. अशावेळी विवाहित महिलांना अडचण येऊ नये या करिता विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या.

दरम्यान रविवार (दि. 26) रोजी परीक्षार्थी उषाताई अर्जुन देवकर या पवई येथील परीक्षा केंद्रांवर परीक्षा देण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आधार कार्ड, पॅन कार्ड, तसेच ग्रामपंचायतीचे लग्न नोंदणीचे प्रमाणपत्र ओळखीचा पूरावा म्हणून सोबत घेतले होते. ऑनलाइन परीक्षेत प्रवेशासाठी कागदपत्रांची योग्य प्रकारे पडताळणी न करता आणि विवाह प्रमाणपत्र पडताळणी न करता परीक्षा प्रवेश नाकारण्यात आला. त्यामुळे उषाताई काटकर यांना मोठा धक्का बसला आहे. सहा वर्षांपासून परीक्षा झाली नव्हती. त्यात आता मेहनतीने अभ्यासकरुन परीक्षा देण्यासाठी गेल्या असता, ओळखपत्रासाठी जी कागपत्रे आवश्यक आहेत ती सादर करुन देखील त्यांना परीक्षेला बसू न दिल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा 

येत्या तीन महिन्यांत होणार 30 हजार शिक्षकांची भरती

TET Scam : टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांचे पगार झाले बंद

आधारशिवाय शालेय प्रवेशाला तात्पुरती मान्यता; शिक्षण विभागाचा निर्णय

उषाताई देवकर 2021 साली झालेली टीईटी (TET Exam) देखील उत्तीर्ण झाल्या आहेत. त्या परीक्षेचा निकाल अवघा साडेतीन टक्क्यांच्या दरम्यान लागला होता. अतिशय मेहनतीने अभ्यास करुन त्यांनी आता टेट (TAIT) परीक्षेसाठी तयारी केली होती. एकतर किमान दरवर्षी ही परीक्षा होणे अपेक्षीत आहे. मात्र गेली सहा वर्षे टेटची परीक्षा झाली नव्हती. आता ती परीक्षा होत असल्याने त्यांनी परीक्षेची कसून तयारी केली होती. मात्र परीक्षा केंद्रावर त्यांच्या कागदपत्रांची योग्य पडताळणी न केल्यामुळे त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागले. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही परीक्षा पुन्हा कधी होईल याची निश्चिती नाही. त्यामुळे परीक्षेसाठीची वयोमर्यादा उलटून गेल्यास पुन्हा परीक्षा देण्यासाठी अपात्र ठरु शकतो. त्यामुळे आपल्याला न्याय मिळावा, असे उषाताई देवकर म्हणाल्या.

टेट परीक्षेसाठी ओळखीचा पुरावा म्हणून विवाहित महिलांना विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना प्रवेश पत्रावर दिलेल्या आहेत. उषाताई देवकर यांच्याकडे विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र होते. मात्र कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता त्यांना परीक्षेला बसू दिले नाही. त्यामुळे त्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद व महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयातमध्ये रीट याचिका दाखल केली आहे.
-अॅड. शंकर काटकर

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी