28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeएज्युकेशनयशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अधिसूचना जारी

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी अधिसूचना जारी

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठांतर्गत विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी शोध व निवड समितीद्वारे अर्ज मागविण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल तथा कुलपती यांनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कायद्यानुसार कुलगुरूंच्या पदासाठी यथोचित व्यक्तीची शिफारस करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीद्वारे कुलगुरूंच्या पदासाठी विहित केलेली अर्हता आणि अनुभव या अटींची पूर्तता करणाऱ्या नामांकित शिक्षणतज्ज्ञांकडून नामनिर्देशने/अर्ज मागविण्याच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत. (Yashwantrao Chavan open University Released of Vice-Chancellor recruitment)

विद्यापीठाच्या कुलगुरू पदासाठी आवश्यक असलेल्या अर्हता व अनुभव याबाबतची आवश्यक ती तपशीलवार माहिती तसेच अर्जाचा नमुना यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या www.ycmou.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या पदासाठी इच्छुक व्यक्तींनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या नमुन्यानुसार आपली तपशीलवार माहिती, स्वतःच्या उमेदवारीबाबतचे दोन पानी समर्थन, विद्यापीठाकरिता दोन पानी भविष्यलक्षी योजना आणि स्वतःच्या कार्याची नीट ओळख असलेल्या तीन नामांकित व्यक्तींची नावे, संपर्क तपशील, संदर्भपत्रासह सादर करणे आवश्यक आहे. मुख्यतः विद्यापीठे/संस्थांनादेखील या पदासाठी सुयोग्य व्यक्तींचे नामनिर्देशन करता येईल.

इच्छुक व्यक्तींनी विहित नमुन्यातील अर्जामधील माहिती भरून अर्हता व अनुभवाची कागदपत्रे जोडून एकूण चार प्रतींमध्ये टपालाद्वारे तसेच सॉफ्ट प्रत ई-मेलद्वारे समन्वय अधिकारी यांच्याकडे दिनांक 13 मार्च रोजी किंवा त्यापूर्वी पोहोचतील अशा रितीने पाठवावेत. यासाठी सहयोगी प्राध्यापक तथा समन्वय अधिकारी डॉ. सुधीर सिंग यांना ई-मेल sudheer [email protected] त्याचप्रमाणे पत्ता राज्यशास्त्र विभाग, दयाल सिंग कॉलेज, दिल्ली विद्यापीठ लोधी रोड, नवी दिल्ली- 110003 यावर संबंधित कागदपत्रे टपाल करावे आणि अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 9810947348 यावर संपर्क साधावा.

कुलगुरू शोध व निवड समितीच्या कार्य व प्रक्रियेसंदर्भातील सर्व पत्रव्यवहार केवळ समन्वय अधिकारी यांच्याकडेच करावा. या संदर्भात कुलगुरू शोध व निवड समिती अध्यक्ष अथवा सदस्य यांच्याशी कोणीही थेट संपर्क करू नये. अंतिम दिनांकानंतर प्राप्त झालेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत, त्याचप्रमाणे निवड यादीतील उमेदवारांना शोध व निवड समितीसोबत वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलाविण्यात येऊ शकते. मात्र, किमान अर्हता पूर्ततेने उमेदवारास मुलाखतीस बोलाविले जाण्याचा हक्क प्राप्त होतोच असे नाही, असे देखील सूचनेत नमुद करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा : मुंबई, पुणे विद्यापीठाच्या कुलगुरू पदांसाठी निवड समिती जाहीर, मातब्बर तज्ज्ञांचा समावेश !

अभियांत्रिकीच्या परीक्षा रद्द; पुणे विद्यापीठाच्या गलथान कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनःस्ताप

मुंबई विद्यापीठाच्या विकासाला मुहुर्त सापडेना; एमएमआरडीएची चालढकल

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना महाराष्ट्र विधिमंडळ कायद्यान्वये झाली असून विद्यापीठाचे मुख्यालय नाशिक येथे आहे. विद्यापीठ परिसरास ‘ज्ञानगंगोत्री’ असे समर्पक नाव आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ हे देशातील पाचवे मुक्त विद्यापीठ असून विद्यापीठाचे कार्यक्षेत्र संपूर्ण महाराष्ट्र राज्य आहे. या विद्यापीठाद्वारे वय, प्रवेश पात्रता, ठिकाण तसेच शिक्षणाची गती यासारखे अडसर दूर करून समाजातील मोठ्या वर्गाला माफक शुल्कामध्ये शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जाते. त्याद्वारे विद्यार्थ्यांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेद्वारा आंतरक्रियेची संधी प्राप्त होते. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ स्वयं अर्थसहाय्यित असून, महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत कार्यान्वित आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी