राजकारणात धड इकडे ना धड तिकडे अशी अवस्था झालेली अभिनेत्री दीपाली सय्यद आता चित्रपटनिर्मितीत उतरली आहे. ती निर्मिती करीत असलेल्या ‘संत मारो सेवालाल’ या हिंदी चित्रपटाच्या पोस्टरचे आज राज्यपालांच्या हस्ते राजभवनात अनावरण करण्यात आले.
‘संत मारो सेवालाल’ या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद निर्मिती क्षेत्रात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट येत्या 13 जानेवारीला प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ‘संत मारो सेवालाल’ या चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण केले गेले. फिल्मी सितारा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली ‘संत मारो सेवालाल’ची निर्मिती केली जात आहे. दीपाली भोसले, अशोक कामले यांचे हे प्रॉडक्शन हाऊस आहे. अरुण राठोड हे या चित्रपटांचे लेखक, दिग्दर्शक आहेत. संगीत बबली हक यांचे आहे. आशुतोष राठोडची चित्रपटात मुख्य भूमिका आहे.
बंजारा समाजाचे दैवत असलेल्या संत सेवालाल यांच्या जीवनकार्यावर ‘संत मारो सेवालाल’ हा चित्रपट आधारित आहे. संत सेवालाल यांनी दिलेला संदेश, त्यांचे समाज सुधारक विचार यावर हा चित्रपट आहे. या ‘संत मारो सेवालाल’चित्रपटातून सामाजिक विषयांवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. दुष्काळासह अनेक अडचणीत सापडलेल्या शेतकरीवर्गाची व्यथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे.
हेही वाचा :
उद्धवांची साथ सोडत दीपाली सय्यद बाळासाहेबांच्या शिवसेनेत
महाप्रबोधिनी यात्रेत चंद्रकांत खैरेंनी साधला दीपाली सय्यदवर निशाणा
दिपाली सय्यद यांच्याकडून नवनीत राणांना कानपिचक्या
