31 C
Mumbai
Saturday, September 3, 2022
घरमनोरंजनP. L. Deshpande Kala Academy : पु. ल. देशपांडे कला अकादमीला मिळते...

P. L. Deshpande Kala Academy : पु. ल. देशपांडे कला अकादमीला मिळते लाखो रुपयांचे भाडे, तरी आहे सुविधांचा अभाव

पु. ल. देशपांडे कला अकादमीतील हॉल आणि रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यक्रमामधून मिळणारे भाडे सोबत येथील बँका, संस्थांचे कार्यालय, बँकेट हॉल, हॉटेल्स आदीकडून दरमहा आकारण्यात येणाऱ्या भाड्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते.

पु. ल. देशपांडे कला अकादमीतील (P. L. Deshpande Kala Academy) हॉल आणि रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यक्रमामधून मिळणारे भाडे सोबत येथील बँका, संस्थांचे कार्यालय, बँकेट हॉल, हॉटेल्स आदीकडून दरमहा आकारण्यात येणाऱ्या भाड्यातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळते. तरी गेल्या २० वर्षात भाडे शुल्क भरून कलावंत तालीम करत असलेल्या हॉलमध्ये एका पंख्याची सोय देखील करण्यात आलेली नाही. मात्र येथील प्रकल्प संचालक पूर्णतः वातानुकूलित असलेल्या कॅबिनमध्ये बसतात. येथे प्रत्येक वस्तू ही येथील कंत्राटदाराकडूनच भाड्याने घ्यावी लागत असून जर कार्यक्रमाकरिता किंवा कोणत्याही गोष्टीकरिता वस्तू स्वतःहून आयोजकांनी वा रंगकर्मीने आणली तर कंत्राटदाराला रॉयल्टी द्यावी लागत आहे. विशेष म्हणजे, त्या कंत्राटदाराकडे स्वतःची लाईट्स आणि साऊंड सिस्टीमचे सामान नसूनही त्याला रॉयल्टी देणे भाग असल्याचा नियम येथे करण्यात आलेला आहे.

पु. ल. देशपांडे कला अकादमीत विविध तालीम हॉल आहेत. या तालीम हॉलमध्ये नियमितपणे काही संस्थांतर्फे कराटे, नृत्य, भरतनाट्यमसोबत नाटकांची तालीम ही केल्या जातात. तसेच छोटेखानी कार्यक्रम ही येथे केले जातात. एका तालीम हॉलचे शुल्क दोन तासाला ५०० रुपये आहे. भाडे शुल्कासोबत अनामत रक्कम आणि जीएसटी ही भरणे आवश्यक आहे.

पु. ल. देशपांडे तालीम करण्यासाठी येणारे कलावंत दिवसा दोन – चार तासांसाठी हॉल घेत असल्याने एक संस्था एक हजार ते तीन हजार रुपयांपर्यंत भाडे शुल्क भरून तालीम करत असतात. मात्र इतके शुल्क भरूनही येथे पिण्याच्या पाण्याचा नळ तर नाहीच सोबत हॉलमध्ये ही पंख्याची सोय देखील करण्यात आलेली नाही.

पु. ल. देशपांडे कला अकादमीमध्ये कित्येकजण नियमितपणे तालीम करण्यासाठी येत असतात. यातीलच एका कलावंतांनी ‘लय भारी’ शी बोलताना सांगितले की, आम्ही नियमितपणे येथे तालीम करत असलो तरी आम्हाला कोणत्याही प्रकारची सूट तर मिळत नाहीच उलट कोणत्या सुविधा देखील येथे नसल्याने येथे प्रत्येक वस्तू या ठिकाणी असलेल्या कंत्राटदाराकडून भाड्याने घ्याव्या लागतात.

येथे पिण्याच्या पाण्याचा नळ नसल्याने रोज रोज येथील हॉटेल्समधून पाण्याची बॉटल विकत घेणे परवडत नसल्याने आम्ही घरूनच पाण्याची बॉटल सोबत घेऊन येतो. मात्र पंख्याशिवाय घामाघूम होऊन तासभर तालीम करणे अवघड असल्याने येथील कंत्राटराकडे एका पंख्यासाठी २५० रुपये द्यावे लागत असल्याचे या कलावंतांकडून सांगण्यात आले. पंख्यासोबत येथे एका खुर्चीकरिता १५ रुपये भाडे आणि टेबल करिता २५० रुपये भाडे येथील कंत्राटदाराला द्यावे लागतात, असे ही कलावंतांनी सांगितले.

तर मिनी थिएटर्स आणि रवींद्र नाट्यमंदिर येथे संगीताचे कार्यक्रम वा अन्य कार्यक्रम कोणा आयोजकांमार्फत केले जात असेल तर येथे स्वतः हून कोणी बाहेरून साऊंड सिस्टीम किंवा लाईट्स आणली तर येथील कंत्राटदाराला रॉयल्टीच्या नावावर तीन ते चार हजार रुपये द्यावे लागतात. मात्र या कंत्राटदाराकडे स्वतःचे लाईट सामान आणि साऊंड सिस्टिमचे सामान देखील नाही, तरी त्याला रॉयल्टी देणे आवश्यक असल्याचा नियम येथे करण्यात आलेला आहे. या कंत्राटदाराचे नाव मुरलीधर बांदेकर असल्याचे रंगकर्मीने सांगितले.

हे सुद्धा वाचा

Azadi Ka Amrit Mahotsav : शिंदे – फडणवीस यांचा ‘मराठी द्वेष्ठेपणा’, मराठी कलावंतांचे कार्यक्रम रद्द करून नवी दिल्लीच्या कलावंतांना बोलविले

Azadi Ka Amrit Mahotsav : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हुकूमशाहीचा आणखी एक नमुना

Azadi Ka Amrit Mahotsav : राज्यपालांचा ‘अमराठी बाणा’, आधी ‘मराठी’ कलावंतांना डावलले, नंतर ‘अमराठी’ कार्यक्रमाचे थाटात उदघाटन केले !

आयोजकांनी स्वतः कार्यक्रमाचा बॅनर जरी लावला तरी कंत्राटदाराला 2500 ते 3500 रुपये रॉयल्टीच्या नावावर द्यावे लागतात. विशेष म्हणजे, कंत्राटदार तुमच्याकडून रॉयल्टीची रक्कम वसूल करत असला तरी त्याचे कोणतेही बिल देत नाही आणि कंत्राटदारकडून बॅनर लावून घेतले वा त्याने कार्यक्रमाकरिता खुर्च्या, टेबल पुरविल्या तरी त्याचे जीएसटी बील ही देत नसल्याचे रंगकर्मीने सांगितले. त्यामुळे पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी कलावंतांसाठी आहे की, कंत्राटदाराला कमविण्यासाठी ही वास्तू उभारण्यात आली आहे, असा सवाल कलावंतांनी उपस्थित केला आहे.

दरम्यान, पु. ल. देशपांडे कला अकादमीतील हॉल आणि रवींद्र नाट्यमंदिर येथील कार्यक्रमामधून मिळणारे भाडे यासोबत येथील आय. सी. आय. सी. आय बँका, भारतीय स्टेट बँक, ब्लँकेट हॉल, विविध संस्थांचे कार्यालय, उत्सव हॉटेल्स (नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्याकरिता निविदा काढण्यात आलेली आहे.), बंजारा हॉटेलकडून (नवीन कंत्राटदाराची नेमणूक करण्यासाठी निविदा काढण्यात आलेली आहे.) दरमहा आकारण्यात येणाऱ्या भाड्यातून लाखों रुपयांचे उत्पन्न मिळत आहे. मग या पैशाचा नेमका उपयोग कशासाठी होतो ? असा प्रश्न मराठी कलावंतांकडून विचारला जात आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागातर्फे लोकशाहीर साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या मिनी थिएटर्समध्ये १ ऑगस्ट २०२२ रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संबंधित कार्यक्रम शासनातर्फे करण्यासाठी मला देण्यात आला होता. शासनाचा कार्यक्रम असूनही माझ्याकडून भाडे, जीएसटी, अनामत रक्कम घेण्यात आली पण त्याची पावती देण्यात आली नाही. तर दुसरीकडे नॅशनल स्कुल ऑफ ड्रामासोबत संयुक्त कार्यक्रम करण्यासाठी पु. ल. देशपांडे कला अकादमीने रवींद्र नाट्य मंदिरचे पाच सत्र मोफत देण्यात आले आहे.

तसेच, अण्णा भाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमादरम्यान आम्ही स्वतः रंगभूमीवर बॅनर लावताना येथील कंत्राटदार बांदेकर यांनी मज्जाव करत आमच्याकडून रॉयल्टीच्या नावावर २६०० रुपयांची मागणी केली. त्याला आम्ही पैसे दिले, पण त्याने कोणतीही पावती दिली नाही. संबंधित प्रकरण प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांना सांगितले तर कंत्राटदार बांदेकर यांना मोनोपॉली देण्याचे कंत्राट आम्ही दिलेले नसून आधीच्या अधिकाऱ्याने दिले आहे. त्यात माझा काही संबंध नाही असे सांगत याबाबत सांस्कृतिक कार्य संचालनालय विभागाला तक्रार करा, अशी माहिती ज्येष्ठ दिग्दर्शक- निर्माता अशोक झगडे यांच्याकडून देण्यात आली.

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी