33 C
Mumbai
Friday, April 19, 2024
HomeमनोरंजनVeer Marathe Saat : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त

Veer Marathe Saat : ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा भव्य मुहूर्त

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने व शेकडो मावळयांच्या बलिदानाने मराठा स्वराज्य उभारले गेले. स्वराज्य रक्षणासाठी प्राणांची आहुती दिलेल्या वीरांच्या आठवणींशिवाय महाराष्ट्राचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही. नेसरीखिंडीत छत्रपती शिवरायांचे सरसेनापती प्रतापराव गुजर आणि त्यांच्या सहा शिलेदारांनी आपल्या आत्मबलिदानाने इतिहास अजरामर केला. प्रतापराव आणि त्यांच्या शिलेदारांचा हा अतुलनीय पराक्रम दिग्दर्शक महेश मांजरेकर ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या मराठी चित्रपटातून भव्य स्वरूपात घेऊन येत आहेत. प्रतापरावांच्या भूमिकेत असणारे अभिनेता प्रवीण तरडे यांच्यासह हार्दिक जोशी, विशाल निकम, विराट मडके, सत्य मांजरेकर, जय दुधाणे, डॉ.उत्कर्ष शिंदे, नवाब शहा तसेच दिपाली सय्यद, शिवानी सुर्वे, गौरी इंगवले, हेमल इंगळे हे कलाकार या चित्रपटात दिसणार आहेत. या कलाकारांसोबत हिंदीतील सुप्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार आहे.

कुरेशी प्रोडक्शन आणि महेश मांजरेकर यांची प्रस्तुती असलेल्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची निर्मिती कुरेशी प्रोडक्शन यांची आहे. वसीम कुरेशी चित्रपटाचे निर्माते आहेत. पुढच्या वर्षी दिवाळीत हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची घोषणा एका दिमाखदार समारंभात नुकतीच करण्यात आली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा.एकनाथ शिंदे तसेच मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे चित्रपटाला शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून यावेळी उपस्थित होते.

हे सुद्धा वाचा

Accident Update : मध्यरात्री भीषण अपघात; चिमुकल्या बाळासह 11 जणांनी गमावला जीव

Ajit Pawar : या सरकारचा पर्दाफाश करणार, अजित पवारांकडून सूचक वक्तव्य

Jobs in IT Sector in India : ही भारतीय IT कंपनी 20,000 लोकांना देणार नोकऱ्या! जाणून घ्या संपूर्ण माहिती

प्रतापराव गुजर आणि त्यांच्या ६ शूर शिलेदारांच्या अद्वितीय पराक्रमाची महती सांगणारी ध्वनिचित्रफीत कार्यक्रमाच्या सुरुवातीला दाखविण्यात आली आणि त्यानंतर सातही योद्धयांची अतिशय बहारदार सादरीकरणातून रंगमंचावर एंट्री झाली. उपस्थितांच्या टाळयांच्या कडकडाटातच मा. मुख्यमंत्र्यांनी मुहूर्ताचा नारळ वाढविला आणि राजसाहेबांनी क्लॅप देऊन संपूर्ण टीमला शुभाशिर्वाद दिले. अभिनेता सलमान खाननेही याप्रसंगी शुभेच्छा देण्यासाठी उपस्थिती दर्शवली.

मुहर्तप्रसंगी मा.मुख्यमंत्री म्हणाले की, ‘अनेक कठीण प्रसंगांवर मात करत महेश मांजरेकर यांनी मोठं यश मिळवले आहे. ते ध्येयवेडे आहेत आणि ध्येयवेडी माणसंच इतिहास घडवितात. महेश मांजरेकर खऱ्या अर्थाने दबंग आहेत, असं सांगत या चित्रपटाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या. ‘महेश मांजरेकर नेहमीच भव्य स्वप्न घेऊन येतात. त्यांनी पाच वर्षापूर्वी मला या चित्रपटाची गोष्ट सांगितली होती. मराठी चित्रपटसृष्टी कात टाकतेय यात महेश मांजरेकर यांचा मोलाचा वाटा असल्याचं राजसाहेब ठाकरे यांनी आवर्जून नमूद करत चित्रपटाला शुभेच्छा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारा अभिनेता अक्षय कुमार म्हणाला की, मराठीत मला काम करण्याची खूप दिवसांपासूनची इच्छा होती. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटाच्या निमित्ताने मला ही संधी मिळतेय याचा मला आनंद आहे. ही भूमिका मी करावी असे राजसाहेब ठाकरे यांनी मला सुचवले. मी या भूमिकेसाठी माझं सर्वस्वपणाला लावणार आहे.

प्रतापरावांच्याकडून अभय मिळालेला बहलोल खान पुन्हा शिवरायांच्या भूमीत धूमाकूळ घालून उपद्रव करू लागला होता. वेळीच त्याचा बंदोबस्त करावा अन्यथा आम्हास तोंड दाखवू नका’ अशा आशयाचा खलिता महाराजांनी प्रतापरावांना पाठविला. खलिता हाती येताच प्रतापरावांचे रक्‍त सळसळू लागले. प्रतापराव गुर्जर आपल्या सहा शिलेदारांसह शेकडोच्या सैन्यासह तळ ठोकून बसलेल्या बहलोल खानाच्या सैन्यांवर तुटून पडले. तो दिवस होता महाशिवरात्रीचा. मंगळवार २४ फेब्रुवारी १६७४ ला सात मर्दांनी स्वराज्य रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहूती दिली.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाची कथा पराग कुलकर्णी यांची असून पटकथा महेश मांजरेकर, पराग कुलकर्णी यांची आहे. संवाद संजय पवार यांनी लिहिले आहेत. संकलन मनीष मोरे तर छायांकन अभिमन्यू डांगे यांचे आहे. कलादिग्दर्शन प्रशांत राणे यांचे असणार आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत हितेश मोडक यांचे आहे. साहस दृश्ये प्रद्युमन कुमार स्वान यांची आहेत. उमेश शिंदे या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटाचा थरार रुपेरी पडद्यावर पहाण्यासाठी आपल्याला २०२३च्या दिवाळीपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी