30 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeराजकीयजलसाक्षर पिढी घडविण्याची गरज : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज : केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

टीम लय भारी 

मुंबई : जल संवर्धनासारख्या विषयांवर देशाची ही पिढी गांभीर्याने विचार करेल त्यावेळेस देशाचे भविष्य उज्ज्वल असेल. त्यामुळे पाणी या घटकावर सर्वसमावेशक विचारमंथन होणे गरजेचे आहे. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवला पाहिजे, त्याचबरोबर आता जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज असून तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होऊ असे प्रतिपादन केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह (Gajendra Singh) शेखावत यांनी केले आहे. २०२४ सालापर्यंत प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पोहोचविणार असा मानसही शेखावत यांनी व्यक्त केला. (Gajendra Singh Shekhawat said that there is a need to create a water literate generation)

विलेपार्ले येथील बी.जे.सभागृहात मंगळवारी ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशन आयोजित ‘इंडिया वाॅटर व्हिजन 2040 अँड बेयाँड’ ही एकदिवसीय राष्ट्रीय जल परिषद पार पडली. याप्रसंगी, उद्घाटन समारंभात केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी जल संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले.

केंद्रीय मंत्री यांनी शेखावत (Gajendra Singh) यांनी देशातील जलव्यवस्थापनाची सद्यस्थिती विशद करताना सांगितले, शासनाकडून जलव्यवस्थापन वा संवर्धनाच्या क्षेत्रात सुरु असणाऱ्या प्रकल्प यशस्वीरित्या राबविण्यासाठी चार घटक अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यात राजकीय इच्छाशक्ती, सार्वजनिक स्वरुपातील निधी, सार्वजनिक कृतीशील धोरण आणि लोकसहभाग यांचा समावेश आहे. त्यामुळे जलव्यवस्थापनात अग्रक्रमी पोहोचण्यासाठी भविष्यात जलसाक्षर पिढी घडविण्याची गरज आहे, हे सर्व जलसमृद्धीच्या माध्यमातून शक्य आहे. जलसमृद्धी ही केवळ लोक सहभागातून घडणार आहे, त्यामुळे पाण्याचे मूल्य सामान्यांनी ओळखले पाहिजे.

देशात सर्वांत जास्त पाऊस हा २०-२२ दिवसांत पडतो. त्यामुळे या पाण्याचे उत्पादन मूल्य घटते. परिणामी, जल जतन- संर्वधनासाठी खऱ्या अर्थाने रेन हार्वेस्टींगची अधिक गरज आहे. याविषयी, शासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत असून सामान्यांचा या उपक्रमातील सहभागही वाढायला हवा. पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवायचा असेल तर सर्वप्रथम शेतीतील पाणी वाचविण्याकडे लक्ष वेधले पाहिजे. भविष्यात जलस्त्रोत जपण्यासाठी आताच्या पिढीला हे स्त्रोत माहिती असणे गरजेचे आहे, त्या दृष्टीने पाणथळ जमिनी, तंत्रज्ञानाच्या साथीने जलव्यवस्थापन – पुर्नवापर अशा अनेक क्षेत्रात शासनाकडून काम सुरु आहे अशी माहिती समारोपाप्रसंगी शेखावत (Gajendra Singh) यांनी दिली.

राष्ट्रीय अर्थव्यवस्थेसाठी जल सुरक्षेचे गांभीर्य घेऊन केंद्र आणि राज्य स्तरावर सरकारने जलस्रोत टिकवून ठेवण्यासाठी, संवर्धन करण्यासाठी आणि धोरणात्मकरित्या राबविण्यासाठी सूक्ष्मपणे नियोजन केले पाहिजे, असे मनोगत ब्रह्मा रिसर्च फाऊंडेशनचे संस्थापक संचालक डॉ. विजय पागे यांनी व्यक्त केले.

संर्वधनावर अधिक काम होणे गरजेचे

– डॉ. विजय पागे, संचालक, ब्रम्हा रिसर्च फाऊंडेशन

आपण हजारो वर्षांपासून गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति या रोजच्या प्रार्थनेने जगत आलो आहोत. नर्मदे सिंधु कावेरि जलेस्मिन् सन्निधिं कुरु ॥ वरुणाय नमः । सात नद्यांना महासागरांशी जोडणारे हे स्तोत्र, पाऊस आणि नद्यांशी आपल्या प्राचीन संस्कृतीचे बंध दर्शवते. इस्त्राइलच्या तुलनेत ४२ टक्के चांगला पाऊस आपल्या देशात होतो. मात्र त्या पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि संर्वधन होत नसल्याने आजही आपल्याकडे दुष्काळाची परिस्थिती उद्भवते. जलसुरक्षा ही राष्ट्रीय सुरक्षा आहे, मात्र या विधानाला आपल्याला न्याय देता आला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हिजननुसार आता जल संवर्धनाच्या प्रगतीशील मार्गाकडे वाटचाल करत आहोत. लोकसंख्या विस्ताराचा विचार करता येत्या दोन दशकांत भू-जल संवर्धन ४० टक्क्यांनी वाढविणे गरजेचे आहे.

पाण्याविषयी दृष्टिकोन बदलायला हवा

– अँड आशिष शेलार, आमदार, भारतीय जनता पक्ष

देशात १३५ कोटी लोकसंख्येची तहान भागवण्यासाठी आणि आर्थिक विकासाला बळ देण्यासाठी जलसंपत्ती जपण्याची आणि वाढविण्याची गरज आहे. आपल्या देशात लहान – मोठ्या सुमारे ८०० नद्या असतानाही जलसंपत्तीचा होणारा ऱ्हास खेदजनक आहे. नद्यांची पूजा करणारी आपली संस्कृती आहे, त्यामुळे आतापासून पाण्याविषयीचा दृष्टिकोन बदलण्याची गरज आहे.

शेतकरी उभा करण्यासाठी पाणी वाचवा

-अमरीश पटेल, विधानसभा सदस्य, भारतीय जनता पक्ष

गेल्या १५ वर्षांहून अधिक काळासाठी शिरपूरमध्ये जल जतन संवर्धनाचे काम सुरु आहे. या कारकीर्दीत सुरेश खानापूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली ४२ चौरस फूटांत ३२० छोटा धरण तयार करुन ६०० मिलीमीटर पाण्याचे संवर्धन केले आहे. येत्या पाच वर्षांत हे प्रमाण ९०० मिलीमीटरवर नेण्याचा मानस आहे, या दिशेने प्रवास केल्यास पुढील दोन वर्षांत पाणी कपात झाली तरी चिंता नसेल असा विश्वास पटेल यांनी व्यक्त केला. पिण्याचे पाणी वाचविणे महत्वाचे आहेच, मात्र त्याचबरोबर शेतकऱ्यांना स्वतःच्या पायावर उभ करण्यासाठी पाणी वाचविण्याची अधिक गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले.

वाॅटर वाॅरिअर ’ पुस्तकाचे अनावरण

राष्ट्रीय जल परिषदेत उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पाण्याविषयी नव्या संकल्पना घेऊन काम कऱणाऱ्या स्टार्टअपचे एकत्रित संकलन असणाऱ्या पुस्तकाचे अनावरण केले. ‘ वाॅटर वाॅरिअर – फॅर अ बेटर टूमोरो ’ या पुस्तकात देशभरातील बारा नव्या स्टार्टअपची निवड करण्यात आली आहे.

केंद्र शासनाने ७० हजार कोटींची तरतूद
महाराष्ट्रात २६ प्रकल्प

१९७० सालापासून पाण्याविषयी मांडण्यात आलेले अनेक प्रकल्प हे केवळ कागदावरच होते, तर काही प्रकल्प बंद पडले होते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जलसंपत्तीचे वैभव टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी या प्रकल्पांचा पुनःअभ्यास करुन यातील १०६ प्रकल्प पुन्हा कार्यान्वित केले, त्यातील २६ प्रकल्प-योजना महाराष्ट्रात आहेत. या संपूर्ण प्रकल्प योजनांसाठी केंद्र शासनाने ७० हजार कोटींची तरतूद केली आहे.


हे सुद्धा वाचा : 

शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर होण्यासाठी यंत्रणा सुधारणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

ठाणे महानगरपालिकेच्या नावाने महिलांनी फोडली मडकी

हिंदुत्वनिष्ठ असल्याचे सिद्ध करण्यासाठी भाजपाच्या हायब्रीड हिंदुत्ववाद्यांची केविलवाणी धडपड : अनिल गोटे

पक्ष संघटनेच्या तळाशी राहून प्रामाणिकपणे काम करणारे सच्चे कार्यकर्ते म्हणजे बाळासाहेब थोरात : सत्यजित तांबे

 

 

 

 

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी