30 C
Mumbai
Wednesday, April 24, 2024
Homeआरोग्यआजपासून पुढील 75 दिवस 'कोविड बुस्टर' डोस मिळणार मोफत

आजपासून पुढील 75 दिवस ‘कोविड बुस्टर’ डोस मिळणार मोफत

टीम लय भारी

केंद्र सरकार यंदा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव वेगवेगळ्या लोकोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून दणक्यात साजरा करीत आहे. याच उत्सवाचे निमित्त साधत सरकारने ‘कोविड लस अमृत महोत्सव’ सुरू करण्याचे ठरविले आहे. या महोत्सवाला देशभरात आजपासून (दि. 15 जुलै) सुरूवात होणार असून यामध्ये कोविड बुस्टर डोस पुढील 75 दिवस नागरिकांना मोफत देण्यात येणार आहे.

कोरोना संकटात कोरोना लसीमुळे अनेकांना जीवनदान मिळाले, परंतु काही जणांमध्ये मात्र लस घेण्याबाबत सुरवातीपासूनच उदासीनता दिसून आली. कोणी लसीचा एकच डोस घेतला तर कोणी दोन्ही सुद्धा घेतले नाहीत. दरम्यान दोन्ही लस घेतल्यानंतर सुद्धा बुस्टर डोसबाबत तेवढा उत्साह दिसून आला नाही, किंबहुना खर्च नको म्हणून सुद्धा अनेकांनी बुस्टर डोस घेणे टाळले.

आजपासून पुढील 75 दिवस 'कोविड बुस्टर' डोस मिळणार मोफत

दरम्यान, लोकांमधील हिच मानसिकता लक्षात घेऊन, नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करून स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवच्या निमित्ताने नागरिकांना बुस्टर डोस मोफत देण्याचे केंद्र सरकार कडून जाहीर करण्यात आले आहे.

बुस्टर डोस का महत्त्वाचा?

कोरोनाचे संकट अद्याप टळलेले नाही. दरवेळी वेगवेगळ्या स्वरूपात (व्हेरीयंट) पुन्हा पुन्हा येत कोरोना दहशत निर्माण करीत आहे. अनेकांनी दोन्ही डोस घेऊन सहा महिन्यांपेक्षा अधिक काळ लोटला आहे, त्यामुळे लस घेऊन निर्माण झालेली रोगप्रतिकारक शक्ती, त्याचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आहे. अशावेळी रोगप्रतिकारक शक्ती पुन्हा वाढवणे गरजेचे आहे म्हणून 18 वर्षांवरील सगळ्यांनी बुस्टर डोस घेण्याबाबत सरकार आग्रही दिसून येत आहे.

बुस्टर डोस कुठे मिळणार?

सगळ्या महानगरपालिका आणि शासकीय लसीकरण केंद्रांवर बुस्टर डोस उपलब्ध होणार आहे. दरम्यान सरकारच्या या विशेष योजनेनुसार 30 सप्टेंबरपर्यंत सगळ्यांना या केंद्रांवर मोफत डोस मिळणार आहे.

बुस्टर डोस घेण्यासाठी कोण पात्र?

दोन्ही डोस घेऊन सहा महिने उलटून गेले असतील अशा व्यक्ती कोरोनाचा बुस्टर डोस घेऊ शकतात, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे. यापूर्वी डोस मधील अंतर नऊ महिने होते परंतु त्यामध्ये बदल करत सहा महिने असे अंतर ठेवले आहे.

कोरोना लसीच्या बुस्टर डोस बाबच लोकांमध्ये अजूनही समज – गैरसमज आहेत, परंतु कोरोनापासून बचाव करण्यासाठी, स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी बुस्टर डोस घेणे गरजेचे आहे. त्यामुळे या कोविड लस अमृत महोत्सवात सगळ्यांनी सहभागी व्हा असे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा…

राज्यातील शिष्यवृत्तीच्या परीक्षांची तारीख बदलली

गायक दलेर मेहंदीला ‘मानवी तस्करी’ प्रकरणी दोन वर्षांचा तुरुंगवास

पेट्रोल दराच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर भडकले

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी