29 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeआरोग्यकंबरदुखी पाठ सोडेना; जगभरात 84 कोटी लोकांना पाठदुखीचा त्रास !

कंबरदुखी पाठ सोडेना; जगभरात 84 कोटी लोकांना पाठदुखीचा त्रास !

30 वर्षांपेक्षा जास्त डेटाचे विश्लेषण करून संशोधकांनी काढला निष्कर्ष; आशिया आणि आफ्रिकेतील नागरिकांमध्ये झपाट्याने वाढतेय समस्या; स्त्रियांमध्ये पाठदुखीचे प्रमाण जास्त; कंबरेत वेदना होण्याच्या प्रकरणांची संख्याही झपाट्याने वाढतेय

2025 पर्यंत जगभरात 84 कोटी लोकांना पाठदुखीचा त्रास जडणार आहे. 30 वर्षांपेक्षा जास्त डेटाचे विश्लेषण करून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे. आशिया आणि आफ्रिकेतील नागरिकांमध्ये पाठदुखीची समस्या झपाट्याने वाढत आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये पाठदुखीचे प्रमाणही जास्त असल्याचेही अभ्यासात दिसून आले आहे.

Lancet Rheumatology जर्नलमध्ये यासंदर्भातील संशोधन प्रकाशित केले गेले आहे. मॉडेलिंग अभ्यासानुसार, मुख्यतः लोकसंख्या वाढ आणि वृद्धत्वामुळे हे दुखणे वाढत आहे. पाठदुखीकडे दुर्लक्ष आणि त्यासंबंधी मर्यादित उपचार पर्यायांमुळे भविष्यात मोठे आरोग्यसेवा संकट निर्माण होण्याची संशोधकांना भीती आहे. अलीकडील काळात पाठदुखी हे जगातील अपंगत्वाचे प्रमुख कारण बनत चालले आहे.

 

ऑस्ट्रेलियातील सिडनी विद्यापीठातील प्राध्यापक मॅन्युएला फरेरा यांनी सांगितले, की जागतिक स्तरावर पाठदुखीच्या वाढत्या घटनांमुळे आमच्या आरोग्य सेवा प्रणालीवर प्रचंड दबाव पडत आहे. विशेषत: कंबरदुखीचे प्रमाणही वाढत चालले आहे. पाठदुखीचे व्यवस्थापन करण्यासाठी राष्ट्रीय, सातत्यपूर्ण दृष्टीकोन स्थापित करणे आवश्यक आहे. 2017 पासून, लोअर बॅक पेन म्हणजे पाठीच्या खालच्या भागात अर्थात कंबरेत वेदना होण्याच्या प्रकरणांची संख्या 50 कोटींहून अधिक लोकांपर्यंत पोहोचली आहे. 2020 मध्ये, पाठदुखीची अंदाजे 60 कोटी प्रकरणे होती.

पाठदुखीशी संबंधित अपंगत्वापैकी किमान एक तृतीयांश प्रकरणात धुम्रपान आणि जास्त वजन हे दुखण्याचे मुख्य कारण आढळून येते. तरुण वयातील, कष्टकरी-कामगार वर्गात कंबरदुखी व पाठदुखीचा मुख्यतः त्रास होत असल्याचा एक व्यापक गैरसमज आहे. तथापि, संशोधकांनी सांगितले, की वृद्ध लोकांमध्ये कंबरदुखीचे प्रमाण अधिक असल्याचे या अभ्यासातून दिसून आले आहे. पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये पाठदुखीचे प्रमाणही जास्त आहे.

या अभ्यासात, 1990 ते 2020 दरम्यानच्या, 204 पेक्षा जास्त देश आणि प्रदेशांमधील, पाठदुखीच्या प्रकरणांचे ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज (GBD) डेटाचे विश्लेषण केले गेले. GBD हे देश, वेळ आणि वयानुसार मृत्यू आणि अपंगत्वाचे सर्वात व्यापक चित्र दर्शवणारे साधन आहे. कालांतराने लँडस्केप मॅप करण्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो.

“जगभरातील आरोग्य प्रणालींनी कंबरदुखी, पाठदुखीच्या या प्रचंड वाढत्या ओझ्याला प्रतिसाद देणे आवश्यक आहे. कारण जागतिक स्तरावर लोकांच्या जीवनमानावर त्याचा परिणाम होत आहे,” असे ग्लोबल अलायन्स फॉर मस्कुलोस्केलेटल हेल्थचे सह-अध्यक्ष प्रोफेसर अँथनी वुल्फ यांनी सांगितले. जगभरातील आरोग्य यंत्रणांनी वाढत्या पाठदुखीवर लक्ष देण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन ते सातत्याने करत आहेत.

हे सुद्धा वाचा : 

PHOTO: तरुणांनो सांधेदुखीच्या त्रासाने त्रस्त झालायं; मग योगासनांचे हे प्रकार कराच!

योगाचे फायदे, प्रकार, मिथके, कुणी करावे; वाचा सविस्तर माहिती

गोमूत्र मानवी आरोग्यासाठी हानिकारक; जाणून घ्या नव्या अहवालातील धोके अन् फायदे

वुल्फ म्हणाले, “पाठदुखी रोखण्यासाठी आणि वेळेवर उपचार मिळण्याची खात्री देण्यासाठी बरेच काही करणे आवश्यक आहे. कारण वेदनाग्रस्त लोकांची संख्या वाढत आहे. त्यांना मदत करण्याचे अनेक नवे प्रभावी मार्ग आहेत.” 2018 मध्येच तज्ञांनी द लॅन्सेट जर्नलमध्ये पाठदुखी व कंबरदुखी वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली होती. पाठदुखी रोखण्यासाठी आणि या दुखण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी जागतिक धोरणात बदल करण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, व्यायामावर भर आणि योग्य आरोग्य शिक्षणाबाबत शिफारसी जर्नलमध्ये केल्या आहेत.

 

Increasing Back Pain, Lower Back Pain Problem, Lancet Journal Study, Rheumatology, 84 Crore People May Suffer

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी