28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
Homeआरोग्यमन प्रसन्न ठेवण्यासाठी पंच सुत्रांचा आधार घ्यावा: डॉ. संजय उपाध्ये 

मन प्रसन्न ठेवण्यासाठी पंच सुत्रांचा आधार घ्यावा: डॉ. संजय उपाध्ये 

“मनःशांती शोधायला कुठेही जाऊ नका, मन शांतच असते एखाद्या नदीच्या डोहाप्रमाणे आपणच त्यात खडा टाकून अस्थिरता निर्माण करतो. जीवनात सदैव प्रसन्न राहण्यासाठी प्रथम मी जीवंत आहे, द्वितीय रोज स्वतःला आरशात पहा, तृतीय समोरील व्यक्तीचेच बरोबर आहे, चतुर्थ शरीर व मन मजबूत राहण्यासाठी रोज व्यायाम करा आणि आयुष्यभर शिकत रहा अशा पंच सुत्रांचा आधार घ्यावा.” असा सल्ला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गप्पाष्टककार डॉ. संजय उपाध्ये यांनी दिला. (Panch Sutras to keep your mind happy)

लोकमान्य सेवा संघ, पारले यांच्या शतकपूर्ती सोहळ्यानिमित्त स्वा. सावरकर पटांगण, लोकमान्य सेवा संघ पारले, टिळक मंदिर, राम मंदिर रस्ता, विलेपार्ले, (पूर्व),मुंबई येथे आयोजित ‘मन करा रे प्रसन्न’ कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी संघ कार्यवाह महेश काळे, डॉ. रश्मी फडणवीस, मुकुंद फाटक, पराग साठे, संतोष जोशी, सुबोध जोशी आणि मृदुला दातार उपस्थित होते.

डॉ. संजय उपाध्ये म्हणाले,“ घरातील वातावरण प्रसन्न ठेवण्यासाठी सर्व प्रथम मन प्रसन्न करावे लागते. सुख दुःखाच्या जीवन संतुलनाची सर्वात मोठी जबाबदारी स्त्रियांपेक्षा पुरूषांच्या खांद्यावर अधिक असते. त्यामुळे निरोगी आणि विनोदी पुरूषच समृद्ध घराचे प्रथम लक्षण आहे. दररोजच्या कृत्रिम जगण्यात आपण किती गुरफटून जातो याची जाणीव व्हावी. मनमोकळे राहिल्याने मन प्रसन्न होते. मन प्रसन्न असेल तर जीवनात प्रसन्नता आणि चैतन्य संचारते. आपल जीवन सुलभ करत नाही तर आपल्या कुटुंबाचही जगणं सुंदर बनवतं.”

“मन स्वास्थ्यासाठी स्वतःच्या भावना जाणून घेऊन त्यानुसार काम करावे. एखादी परिस्थिती आपण बदलू शकणार नाही. मात्र तिला सामोरं कसं जायचं हे तर नक्कीच ठरवू शकतो. कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची शक्ती आपलं मन आपल्याला देत असते. त्यामुळे मन ताब्यात असले की सर्व साध्य करणे सोपे जाते. मनाचा समतोल, संयम आणि मनाला लावलेले योग्य वळणच आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाऊ शकते. प्रसन्नता अबाधित ठेवण्यासाठी कोणत्या विषयांना किती महत्त्व दयायचे, कोणत्या आठवणी किती काळ मनात ठेवायच्या, कोणाचे बोलणे मनाला लावून घ्यायचे या गोष्टींची मनाशी आखणी करायला हवी. तरच, मन कायमस्वरूपी शांत आणि आनंदी राहू शकेल.”

“जीवनात पैसा हा केवळ साधन असून ते साध्य नाही. पैसा आला की विचारांची धारा बदलते आणि त्यावर काल्पनिक सुख दुःखांच्या संकल्पना उभारल्या जातात. अशा वेळेस आयुष्य ‘सिरियसली’ घेण्यापेक्षा ‘सिंसियरली’ घेण्याची गरज आहे. तसेच अ‍ॅजेस्ट नाही तर अ‍ॅड जस्ट केल्यास प्रसन्नता येईल. जीवनात कोणत्याही रिअ‍ॅक्शन देण्यापेक्षा सकारात्मक रिस्पॉन्स देण्याची गरज आहे. जीवनाच्या चढ उतारात दुःखला सदैव तिलांजली देतांना ते उगाळून घ्यावयाची गोष्ट नाही तर ते गाळून त्यातून सुखाची संकल्पना शोधावी.”

“आपली मातृभाषा उत्तम केल्यास शब्दा शब्दांमध्ये विनोद जाणवेल. जीवनात खूप मोठे तत्वज्ञानी बनण्यापेक्षा विनोदी बना. माणसाने रसग्रहण करण्याची क्षमता वाढवावी. जीवनात प्रसन्न व आनंदी राहण्यासाठी जसे एकाच विनोदावर पुन्हा पुन्हा हसणार नाही. तसेच पुन्हा पुन्हा दुख उगाळत बसण्यात काहीच अर्थ नाही. ”

“ मन अप्रसन्न होण्याच्या प्रमुख कारणांमध्ये आपल्या मनासारखे न घडणे, स्वतःची इमेज झटकून सर्वांमध्ये न मिसळणे, घरातील वर्तमानपत्र मन प्रसन्न करत नाही आणि आजच्या शिक्षण पद्धतीमुळे दोन पिढीतील तफावत हे दुःखाचे कारण आहे. जीवनात श्वास, विश्वास आणि आत्मविश्वास अत्यंत महत्वाचा आहे. मृत्यूचे भय गेल्याशिवाय जीवनात आनंदी राहता येणार नाही. जीवनात कोणताही दृष्टीकोन ठेवू नका, वर्तुळकार जीवन जगा म्हणजे कोणती ही परिस्थिती तुमची मन स्थिती खराब करू शकणार नाही. तसेच त्यांनी आर्ट ऑफ एलईएव्हीआयएनजी ही नवी पद्धत लोकांसमोर मांडली आणि वाईट आठवणीचे विस्मरण सोडून देण्याचा सल्ला त्यांनी दिला.”

हे सुद्धा वाचा :

उत्साह, चैतन्याचा झरा : सौ. मनिषा संजय काळविंट

दिवसाची सुरुवात उत्साहात करण्यासाठीचे ‘हे’ आहेत काही उत्तम पर्याय

GITA GPT: जीवनातील समस्यांवर भगवद्गीतेचा AI उपाय?

या कार्यक्रमात डॉ. उपाध्ये यांच्या संभाषणाला प्रेक्षक अक्षरशः प्रत्येक मिनटाला हसत होते. आयोजित कार्यक्रमाला मुंबईभरातून श्रोते आले होते. कार्यक्रमाला उत्फुर्त प्रतिसाद मिळाल्याने बर्‍याच श्रोत्यांना बसायलाही जागा नसल्याने उभे राहून याचा आनंद लुटला. मृदुला दातार यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. संघ कार्यवाह महेश काळे यांनी आभार मानले.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी