राज्यातील तरुणांसाठी एक आनंदाची बातमी असून महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाद्वारे अधिकारी आणि कर्मचारी पदांसाठी मोठ्या प्रमाणात भरती होणार असून राज्यातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी संधी उपलब्ध होणार आहे. गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रिया आता पुन्हा सुरु होणार आहे. यामध्ये, तब्बल १० हजार ९४९ पदांची भरती केली जाणार आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रा डॉ तानाजी सावंत यांनी ही माहिती दिली. यामुळे आता सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील होतकरू मुलांना दिलासा मिळणार असून राज्यातील आरोग्य विभागातील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
राज्यात कोरोंना संकटामुळे तरूणांमध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगरीचे संकट उभे राहिले होते. अशात महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिति सुद्धा भक्कम नव्हती. त्यामुळे राज्यातील तरुणांमध्ये रोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होत नव्हत्या. अशातच, राज्य शासनाच्या गृह विभागाद्वारे पोलिस भरती, वन विभागाकडून वन संरक्षक आणि महसूल विभागाद्वारे तलाठी भरतीची घोषणा करण्यात आली. यामुळे महाराष्ट्रातील होतकरू तरुणांना दिलासा मिळाला होता. त्यातच आता आरोग्य विभागतही भरतीची घोषणा झाल्यामुळे आरोग्य विभागात करियर करू इच्छिणाऱ्या तरुणांना आता चांगली संधी मिळणार आहे.
हे ही वाचा
काका विरोधात बंडानंतर राजकीय आश्रय देणाऱ्यालाच धनंजय मुंडे विसरले!
ठाण्यातील ‘हा’ देखणा घुमट कोणी बनविला ? जाणून घ्या वैशिष्ट्ये
आता होणाऱ्या भरती प्रक्रियेत ‘क’ आणि ‘ड’ संवर्गामध्ये विविध ६० प्रकारची पदे असणार आहेत. आणि यामध्ये एकूण १० हजार ९४९ पदांची केली जाणार आहे. ही संपूर्ण भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS मार्फत राबवली जाणार आहे, अशी माहिती आरोग्य मंत्री सावंत यांनी दिली आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात २०२१ साली आरोग्य विभागात भरती प्रक्रिया राबवण्यात आली होती. परंतु, राबवण्यात आलेल्या त्या भरती प्रक्रियेवेळी पेपरफुटीचा घोटाळा झाला होता. त्यानंतर ही भरती प्रक्रिया थांबली होती. आता पुन्हा एकदा आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या पुढाकाराने आणि पाठपुराव्यानंतर आरोग्य विभागातील मेगा भरती प्रक्रिया सुरू होणार आहे.
ह्या भरतीविषयी सखोल माहिती मंगळवारी, २९ ऑगस्ट रोजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत हे पत्रकार परिषद घेऊन सांगणार आहेत.