32 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमुंबई'मरेन पण शरण जाणार नाही', ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचा बाणा कायम

‘मरेन पण शरण जाणार नाही’, ईडीच्या धाडीनंतर संजय राऊतांचा बाणा कायम

टीम लय भारी

मुंबई : पत्राचाळ प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत ईडीच्या रडावर आले आहेत. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अगदी जवळचे, विश्वासू मानले जाणारे नेते संजय राऊत यांच्या घरी आज इडीची धाड पडली आहे, त्यामुळे राजकीय वर्तुळातून चर्चेला एकच उधाण आले आहे. शिवसेना नेते राऊत यांच्या मैत्री बंगल्यात आज ईडीच्या अधिकाऱ्यांचे एक पथक सीआरपीएफ जवानांसह दाखल झाले असून राऊत यांच्या चौकशीस सुरवात झाली आहे. यावेळी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची सुद्धा ईडी चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून शक्यता वर्तवण्यात येत आहे

या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी सोशल मिडीयावर ट्विट करीत आपली बाजू स्पष्ट केली आहे. ट्विटमध्ये राऊत लिहितात, “कोणत्याही घोटाळ्याशी माझा काडीमात्र संबंध नाही. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन मी हे सांगत आहे..बाळासाहेबांनी आम्हाला लढायला शिकवलंय.. मी शिवसेनेसाठी लढत राहीन,” असे म्हणून या प्रकरणात कोणताच सहभाग नसल्याचे त्यांनी सूचक ट्विट केले आहे.

पुढे संजय राऊत लिहितात, “खोटी कारवाई.. खोटे पुरावे मी शिवसेना सोडणार नाही.. मरेन पण शरण जाणार नाही जय महाराष्ट्र”, असे म्हणून त्यांनी ईडी कारवाई होऊ नये म्हणून पळ काढणाऱ्यांवर आणि सत्ताधारी भाजपवर यावेळी निशाणा साधला असून त्यांनी ईडी कारवाईवर शेवटपर्यंत लढत राहणार असल्याचे सांगितले.

याआधी ईडीने संजय राऊत यांना चौकशीला हजर राहण्यासाठी दोन समन्स बजावली होती, परंतु संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचे कारण पुढे करून राऊत चौकशीला हजर राहिले नाहीत, त्यामुळे ईडीने कारवाईचा बडगा आणखी तीव्र करीत थेट संजय राऊत यांचे घर गाठले असून तिथे त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान या संपुर्ण प्रकरणात संजय राऊत यांना ईडी कार्यालयात नेणार का, अटक होणार का याकडे सगळ्यांचे आता लक्ष लागले आहे.

जाणून घ्या काय आहे पत्राचाळ जमीन घोटाळा?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ येथे महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. ईडीने केलेल्या आरोपानुसार प्रविण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, परंतु तो भाग विकसित करण्याऐवजी अनेक महिने ओलांडून गेले तरी तो तसाच राहिला, तो भाग रहिवाशांना न देता बिल्डरला विकण्यात आला आणि याप्रकरणी प्रविण राऊत यांना अटक करण्यात आली. हा संपुर्ण पत्राचाळ जमीन घोटाळा 1,034 कोटी रुपयांचा आहे.

गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळमधील 3 हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते, त्यातील 672 फ्लॅट येथील भाडेकरूंना द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे असे ठरले होते, परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर अनुक्रमे 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले आणि वाद वाढला.

दरम्यान या प्रकरणील मुख्य आरोपी प्रवीण राऊत यांच्या खात्यातील काही रक्कम शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा झाल्याचे समोर आले, त्यामुळे ईडीच्या रडारवर वर्षा राऊत आणि संजय राऊत असे दोघे सुद्धा आले असून या पत्राचाळ प्रकरणी ते चांगलेच अडचणीत आले आहेत.

हे सुद्धा वाचा…

राज्यपालांना दिल्लीला पाठविण्यासाठी स्वाक्षरी मोहीम

एका सुयोग्य व्यक्तीची राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची छत्रपती संभाजी महाराजांची मागणी

VIDEO : राष्ट्रवादी काँग्रेसकडून हुतात्मा चौकात राज्यपालांविरोधात आंदोलन

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी