29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमंत्रालयमंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

मंत्रालयातील IAS अधिकारी टेबल साफ करतात, चहाचे कपही धुतात

टीम लय भारी

मुंबई : ‘कोरोना’च्या आपत्ती निवारणासाठी मंत्रालयामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात जवळपास 17 IAS अधिकारी काम करतात. या IAS अधिकाऱ्यांनी ‘कोरोना’ निवारणासाठी इतके वाहून घेतले आहे की, ते स्वतःची कामे स्वतःच करतात.

कक्षामध्ये सफाईगारांनी स्वच्छता केली आहे की नाही, या खोलात हे अधिकारी जात नाहीत. सकाळी कक्षामध्ये येताच सरळ हातात झाडू घेऊन कार्यालयाची सफाई करतात, हातात फडके घेऊन टेबल साफ करतात. चहा पिल्यानंतर कप स्वतःच धुतात. बऱ्याचदा तर सहकारी अधिकाऱ्यांचेही चहाचे कप काही अधिकारी धुतात, असे सूत्रांनी ‘लय भारी’शी बोलताना सांगितले.

भूषण गगराणी, नितीन करीर, संजीव जयस्वाल (आता मुंबई महापालिकेत बदली झाली), प्राजक्ता लवंगारे, आय. ए. कुंदन (आजारामुळे आता कार्यालयात येत नाहीत), राजीव जलोटा, आभा शुक्ला, परिमल सिंग, इक्बाल चहल ( आता मुंबई महापालिकेत बदली ) इत्यादी सगळे IAS अधिकारी कोणताही मानमरातब न ठेवता काम करतात.

Mahavikas Aghadi

एरवी प्रशासकीय यंत्रणेत ‘प्रोटोकॉल’ फार पाळला जातो. पण या नियंत्रण कक्षातील सगळे अधिकारी एखाद्या कुटुंबाप्रमाणे काम करीत आहेत. नियंत्रण कक्षात काही उपसचिव, अवर सचिव, लिपीक सुद्धा आहेत. पण या कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा सगळे IAS अधिकारी समान दर्जाची वागणूक देतात.

‘कोरोना’बाबत भूषण गगराणी, नितीन करीर या अधिकाऱ्यांना मोबाईलवर मोठ्या संख्येने फोन येत असतात. पण ते कोणताही फोन टाळत नाहीत. फोनवरून मिळालेल्या माहितीचे गांभीर्य ओळखून हे अधिकारी संबंधित समस्या लगेच मार्गी लावतात. अन्य सगळे IAS अधिकारी सुद्धा आलेले फोन लगेच उचलतात.

संजीय जयस्वाल यांची सध्या मुंबई महापालिकेत बदली करण्यात आली आहे. पण बदली होण्यापूर्वी नियंत्रण कक्षात त्यांनी अफलातून काम केले होते. दोन महिन्यांपूर्वी लॉकडाऊन जाहीर झाला तेव्हा लोकांमध्ये गोंधळ उडाला होता. अन्न धान्य, भाजीपाला, औषधे मिळणेही कठीण झाले होते.

कंपन्यांकडे क्रोसीनसारख्या औषधांचा साठा अवघा दोन दिवस पुरेल इतका कमी होता. सॅनिटायझर, मास्कची कमतरता होती. वितरण व्यवस्थेचा फज्जा उडतोय की काय असे चित्र होते. परंतु संजीव जयस्वाल यांनी त्यावेळी यशस्वी परिस्थिती हाताळली. त्यांनी वेगवान उपाययोजना करीत सगळी वितरण व्यवस्था सुरळीत केली.

जयस्वाल यांनी वितरण व्यवस्थेसंबंधी अनेक निर्णय बारकाईने घेतले होते. वयोवृद्ध लोकांना घरपोच औषधे पोचविण्याची तजवीज त्यांनी केली.

नियंत्रण कक्षातील एका अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण झाली. या अधिकाऱ्यासोबत त्या दिवशी नितीन करीर यांनी दिवसभर काम केले होते. त्यामुळे करीर यांनीही वैद्यकीय चाचणी करून घेतली. सुदैवाने त्यांची चाचणी निगेटिव्ह आली. परंतु सध्या त्यांना ‘कॉरन्टाईन’ व्हावे लागले आहे.

कॉरन्टाईन असून सुद्धा करीर स्वतःची कामे घरूनच करीत आहेत. अगोदर जेवढे काम करायचे, त्याच पद्धतीने आताही ते कामे करीत आहेत.

नियंत्रण कक्षातील एकूण दोन आयएएस अधिकाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण झाली आहे. सोबतच्या सहकाऱ्यांना ‘कोरोना’ची लागण झाली म्हणून उर्वरीत अधिकाऱ्यांनी कसलीही भिती व्यक्त केली नाही. उलट या दोन्ही अधिकाऱ्यांची पुढील जबाबदारी सांभाळण्यासाठी अनेक IAS अधिकाऱ्यांनी तयारी दर्शविली.

राज्यात अनेक उद्योग हळहळू सुरू होत आहेत. त्याबाबतचा प्रत्येक निर्णय अत्यंत विचारपूर्वक बारकाईने तपासण्याची कामगिरी गगराणी करीत आहेत.

प्राजक्ता लवंगारे यांच्याकडे स्वयंसेवी संस्थांची (एनजीओ) जबाबदारी आहे. पण राज्यातील या आपत्तीमध्ये एनजीओंची मदत घेण्यासाठी त्यांनी मोठे कष्ट उचलले. अशा एनजीओंसोबत त्यांनी संपर्क करून मोठी यंत्रणा उभी केली.

आभा शुक्ला यांनी यापूर्वी दुष्काळाच्या काळात छावण्या हाताळण्याची कामे केली होती. त्यांचा हा अनुभव शासनाच्या कामी आला.

आय. एस. कुंदन यांच्याकडे स्थलांतरीत मजुरांची जबाबदारी होती. परराज्यात अडकलेल्या अनेक मराठी लोकांना तिथेच जेवण व सर्व किराणा मिळवून देण्यापासून ते त्यांना परत आणण्यापर्यंत कुंदण यांनी मोठी कामगिरी केली. मुंबई – पुण्यात स्थलांतरीत मजुर मोठ्या संख्येने अडकलेले होते. त्यांना परत पाठविण्यासाठीच्या उपाययोजना करण्यासाठी कुंदन यांनी कष्ट घेतले.

नवी दिल्लीत युपीएससीच्या परीक्षेच्या तयारीसाठी गेलेले अनेक मराठी युवक अडकले होते. या युवकांना परत आणण्यामध्ये नितीन करीर, भूषण गगराणी यांनी स्वतःच्या कौशल्याचा वापर केला.

आयएएस होण्यापूर्वी करीर व गगराणी युपीएससीच्या परीक्षेची तयारी करीत होते. मुंबईतील एसआयएसी या संस्थेत अशा अभ्यासक्रमाची तयारी केली जाते. त्यावेळी सोबत असलेल्या सहकारी विद्यार्थ्यांमधील काहीजण आता दिल्लीत नोकरी करीत आहेत.

यांत सुशील गायकवाड, नरेंद्र पाटील, प्रवीण गेडाण या नवी दिल्लीत काम करीत असलेल्या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी मोठी मदत केली. परिमल जैन यांनी रेल्वे मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून ही विशेष रेल्वे सोडण्याचे आदेश मिळवून घेतले.

या रेल्वेसाठीचा निधी कसा द्यायचा असा पेच निर्माण झाला होता. त्यावेळी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ स्वतःच्या खिशातून नवी दिल्लीवरून येणाऱ्या रेल्वेचा सगळा खर्च दिला.

मंत्रालयात विविध विभाग आहेत. या विभागांमार्फत अनेकदा तातडीचे आदेश काढावे लागतात. अशा वेळी त्या खात्याकडे आदेश काढण्याचा तगादा लावण्याऐवजी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनीच दुसऱ्यांच्या खात्यांचे आदेश, परिपत्रके तयार केली. त्या खात्यांना विश्वासात घेऊन संबंधित खात्यांच्या नावाने आदेश जारी केले.

या कक्षाची जबाबदारी राजीव जलोटा यांच्याकडे आहे. कक्षाचे काम अचूक चालण्यासाठी ते स्वतः लक्ष देतात. दररोज कक्षामध्ये येवून बसतात.

‘कोरोना’मुळे मुंबईतील गल्लीपासून गावखेड्यापर्यंत असंख्य प्रश्न आहेत. असे प्रश्न निर्माण होऊ नयेत यासाठी हे IAS अधिकारी दूरदृष्टी ठेवून अगोदरच उपाययोजना करतात. जगभरामध्ये ‘कोरोना’ची काय स्थिती आहे. त्यावरही कक्षातील अधिकारी सतत संशोधन करतात. त्यातील चांगल्या बाबी हेरून मुख्य सचिवांना त्याबाबतची माहिती देतात, व राज्यात त्यांची अंमलबजावणी करतात.

अजित कवडे नावाचे अवर सचिव या कक्षात काम करतात. कक्ष स्थापन झाल्यापासून ते नियमितपणे सकाळीच कक्षात पोचतात, आणि रात्री उशिरापर्यंत काम करतात. घरून येताना कक्षातील सगळ्यांसाठी थर्मासमध्ये चहा व गरम पाणी घेऊन येतात.

सगळ्या IAS अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कामांसाठी कवडे यांची मोठी मदत होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.

महाराष्ट्राला ‘कोरोना’च्या संकटातून बाहेर काढण्यासाठी नियंत्रण कक्षातील हे अधिकारी प्रचंड कष्ट उपसत आहेत. IAS अधिकारपदाचा कसलाही बडेजाव ते मिरवत नाहीत. राज्यभरात मुंबईपासून गाव खेड्यापर्यंत ‘कोरोना’ स्थिती हाताळणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याने नियंत्रण कक्षातील या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांचा आदर्श घ्यायला हवा अशी भावना सूत्रांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

उद्धव ठाकरेंचे खमके पाऊल : ‘कोरोना’साठी मुंबई महापालिकेत 9 IAS अधिकाऱ्यांची फौज, 3 अधिकाऱ्यांची नव नियुक्ती

Social work : पती पोलीस उपायुक्त, पत्नी महापालिका उपायुक्त, दोघेही आपल्या गावाला ‘कोरोना’पासून वाचविण्यासाठी घेताहेत कष्ट

Coronavirus – Maharashtra Crosses 40,000 COVID-19 Cases, Mumbai At Over 25,000

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी