30 C
Mumbai
Wednesday, April 17, 2024
Homeसंपादकीय11 जुलै...एक शोकांतिका !!

11 जुलै…एक शोकांतिका !!

लेखक : बंधुराज लोणे

11 जुलै 1997 ची सकाळ… मी रात्रपाळी करून घरी पोहोचलो होतो. मला फोन आला की रमाबाई आंबेडकर नगरला गोळीबार झालाय. मी संपादक निखिल वागळे यांना ही माहिती दिली. माझ्या घरापासून जवळच राहत असलेल्या छायाचित्रकार प्रकाश पारशेकरला फोन केला. त्याच्या बाईकवर आम्ही रमाबाई आंबेडकरला निघालो. सायनपर्यंत पोहोचलो तर पूर्व द्रुतगती मार्ग वाहतुक कोंडीमुळे जवळपास बंद होता. पण पीपीने रस्ता काढत रमाबाई आंबेडकर नगर गाठलेच…तिथे पोहोचल्यावर वस्तीत कोणालाच प्रवेश दिला जात नव्हता…पण मला अनेक कार्यकर्ते ओळखत होते. त्यामुळे मी कामराज नगर,गनी आर्ट कडून कॉलनीत प्रवेश केला. मी घाबरून गेलो. रस्त्यावर असा रक्ताचा सडा मी कधी बघितला नव्हता. पीपी फोटो घेत होता. मी फक्त बघत होतो…मनाचा थरकाप उडाला होता. चालत मी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ आलो..( सध्या असलेला पुतळा तेव्हा नव्हता, हा पुतळा नंतर उभारण्यात आलाय) तिथे डॉ हरीश अहिरे आणि इतर नेते, कार्यकर्ते भेटले..त्यांनी नेमके काय घडले त्याची हकिकत सांगितली. तोपर्यंत स्थानिक पोलीस वस्तीत घुसले होते..पूर्व द्रुतगती मार्ग अडविण्यात आला होता. तरुण वर्ग, महिला या मार्गावर बसले होते.. रस्त्यावर टायर जाण्यात आले होते.. दोन्ही मार्गावर हिंसक आंदोलन सुरू होते.

ठाण्याच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर दोन टॅन्कर उभे होते. मुंबई जवळपास बंद पडली होती. आंबेडकरी वस्त्यातील जनता रमाबाई आंबेडकर नगरकडे येत होती. एस. सी. एस. टी. सेलचे प्रमुख टी. के. चौधरी घटनास्थळी पोहोचले होते. या विभागाचे डी. सी. पी. संजय बर्वेही घटनास्थळी पोहोचले होते. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी आता आंदोलकांवर बाळाचा वापर न करण्याच्या सूचना देण्यात आले होते.. पण त्यापूर्वीच सकाळी आंदोलकांवर लाठीमार करून 50 वर आंदोलकांना जखमी केले होते. सर्व मृतांचे पार्थिव राजावाडी इस्पितळात हलविण्यात आले होते. तिथे ज्या पद्धतीने मृतदेह ठेवण्यात आले ते बघितल्यावर तर संवेदना काही प्रकार असतो वराचा विश्वास उठला असता.सकाळी चेंबूर ब्रिज जवळ मोहमद खडस भेटले होते. मी त्यांना म्हणालो की एकटे असे का बाहेर पडलात, परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे…तर त्यांनी उत्तर दिले होते की गौतम सोनावणे येणार आहे आणि आंबेडकरी वस्तीत मला कोण काय करणार आहे ?दिवसभर राज्यातील अनेक शहरात या घटनेचे पडसाद उमटले होते.

त्यावेळी विधान परिषदेचे विरोधीपक्ष नेते होते छगन भुजबळ तर सभेचे विरोधीपक्ष नेते होते पिचड. गृहमंत्री होते गोपीनाथ मुंडे तर मुख्यमंत्री होते मनोहर जोशी. संध्याकाळी उशीरा या नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली होती.रात्री मी कार्यालयात पोहोचलो तर निखिल वागळे माझी वाट पाहातच होते.आधी त्यांना सर्व माहिती दिली आणि नंतर मी बातमी लिहायला घेतली. एक मुख्य बातमी दिल्यावर एक पूर्ण पान रिपोताज मी दिला. रात्री पुन्हा घटनास्थळी आलो. दुसरा दिवस म्हणजे 12 जुलै असाच तणावात गेला. दुसर्‍या दिवसीही मुंबईत काहीच सुरू झाले नाही. आंबेडकरी वस्त्यांमध्ये तर चुलही पेटली नव्हती. घटनेला 24 तास झाल्यानंतरही प्रमुख नेत्यांना इथे प्रवेश दिला जात नव्हता.

संतप्त जनता शिवसेना भाजप सरकार विरोधात घोषणाबाजी करत होतेच. पण आपल्या नेत्यांच्या विरोधात शिवीगाळ करत होते. त्यातच वार्ताहर नवाच्या दैनिकात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना आमच्याच लोकांनी केली. असेल अशी शंका घेणारे वृत्त प्रसिद्ध झाले होते. याबाबत वागळे सरांनी माझ्यासोबत चर्चा केली. तेव्हा मी त्यांना या बातमीमागे कोण आहे, याची सविस्तर स्पष्ट केले. तेव्हा वागळे म्हणाले की मुंडे जनतेला जनतेला शांत करण्यापेक्षा भडकवत आहेत. या वृत्तामुळे परिस्थिती अधिकच चिघळणार आणि तसेच घडले. दुसर्‍या दिवशी पत्रकारांना वस्तीत प्रवेशच देण्यात येत नव्हता. संतप्त जनतेवर कोणाचेच नियंत्रण नव्हते. दुपारी माझ्यासोबत काही पत्रकार यात लोकसत्ताचे प्रसाद मोकाशी, दिवंगत प्रकाश देशमुख , महाराष्ट्र टाईम्सचे संजीव लाटकर,काही इंग्रजी पत्रकार वस्तीत जात होतो. जमावाने आम्हाला अडविले. तेवढ्यात संजीव लाटकर म्हणाले वार्ताहर आहोत…बस्स, त्यांच्यावर जमावाने हल्ला केला. आम्ही मध्ये पडलो आणि लाटकर यांची सुटका केली.

त्यावेळी मला ओळखणाऱ्या चंद्रकला कांबळे यांची खूप मदत झाली. वार्ताहराने विटंबना आंबेडकरी तरुणांनी केली असावी अशी बातमी दिली होती. त्यामुळे लाटकर आम्ही वार्ताहर आहोत, असे म्हणताच तरुणांनी त्यांच्यावर राग काढला. चंद्रकला कांबळे यांनी या आंदोलनात हिरीरीने भाग घेतला होता.( माझे जवळचे मित्र राहुल कांबळे याच्या त्या आई. आपल्या मुलांना आईने आंबेडकरी चळवळीत आणले) या आंदोलनाचा नंतर त्यांना खूप फटका बसला. आयकर खात्याने त्यांचे सेवानिवृत्तीचे सर्व फायदे देण्यास नकार दिला. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू केली.आंबेडकरी समाजातील अनेकांना नंतरच्या काळात असा त्रास सहन करावा लागला.

या सर्व काळात डॉ हरीश अहिरे यांच्या कुटुंबांचे सर्व पत्रकार आणि नेत्यावर खूपच उपकार झाले. एक तर त्यांचे घर कॉलनीच्या अगदी प्रवेशद्वार जवळ आहे.त्यांच्याकडे त्याकाळात फोन होता. त्यामुळे त्यांचाच पत्रकारांना आधार होता. डॉ.अहिरे आणि त्यांच्या पत्नीने या काळात खूप मदत केली. महिला पत्रकारांना तर अहिरे यांच्या घराशिवाय दुसरी काही व्यवस्थाच नव्हती. (त्यावेळी कॉलनीत एवढ्या सुविधाही नव्हत्या ) 13 जुलै रोजी जे जे इस्पितळातून सर्व पार्थिव आणण्यात आले. त्यांनी शहरात अधिकच तणाव वाढला. या दोन दिवसातही प्रमुख नेत्यांचा उद्धार सुरूच होता. याच दिवशी अंत्यसंस्कार होणार होते. प्रशासनाने आणि कॉलनीतील कार्यकर्त्यांनी सर्व तयारी केली होती. अंत्यसंस्काराला प्रचंड गर्दी झाली. राजवाडी स्मशान ते कॉलनीच्या सर्व रस्त्यावर जनता दिसत होती.

राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. किमान अंत्यसंस्काराला तरी हजर राहता यावे म्हणून प्रमुख नेते येणार होते. पहिल्यांदा रामदास आठवले पोहोचले आणि कॉलनीच्या प्रवेशद्वारा जवळ , रस्त्यावरच काही तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. मी आणि पीपी इथेच होतो. पीपीला या घटनेचे फोटो मिळाले. आधीच तयारीत असलेल्या तरुणांनी आठवले यांच्यावर हल्ला केला. त्यामुळे इतर नेते आल्या मार्गाने परत फिरले. आमच्या नेत्याला मारहाण झाली आता इतरांनाही बघून घेतो असा पावित्रा आठवले यांच्या समर्थकानी घेतला. त्यामुळे इतर कोणीच प्रमुख नेते अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नाहीत. मुंबई, महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून जनता इथे पोहोचली होती. सर्व पुरोगामी पक्ष , संघटनेचे प्रमुख नेते, कार्यकर्ते अंत्यसंस्कासाठी आले होते. रामदास आठवले मारहाण झाल्यानंतर दोन दिवसानी घटनास्थळी गेले. त्यांचे त्यावेळी स्वागत करण्यात आले. ही बातमीही वागळे यांनी छायाचित्रासह प्रसिद्ध केली होती. नंतर एकदा आठवले यांनी माझ्याकडून मारहाणीच्या घटनेचे छायाचित्र घेतले होते.यात कोण कार्यकर्ते सहभागी होते याची माहिती घेतली होती पण आठवले यांचे वैशिष्ट्ये हे की त्यांनी कधीच या घटनेचे भांडवल केले नाही आणि मारहाण करणार्‍यांवर खुन्नस काढला नाही.

14 जुलै अशीच तणावात गेली. 15 जुलै पुन्हा एक धक्का घेऊन उजाडली. शाहीर विलास घोगरे यांनी या हत्याकांडाच्या निषेधार्थ मुलुंड येथे स्वतः च्या घरी आत्महत्या केली. घरच्या भिंतीवर त्यांनी आपण हे पाऊल का उचलले ते स्पष्ट करणारा संदेश लिहून जयभीम/ लाल सलाम अशी घोषणा लिहिली होती. विलासचे असे जाणे माझ्यासाठी खूपच वेदनादायी होते. कारण मी ज्या संघटनेत ( विद्यार्थी प्रगती संघटना, नौजवान भारत सभा आणि आव्हान नाट्य मंच) सोबत काम करीत होतो. विलास आव्हान नाट्य मंचचे काम करायचा. मुंबई गिरणी कामगार संपात आणि नंतरच्या काळात अनेक आंदोलनात विलासचा मोठा सहभाग होता. मराठवाडा नामांतर चळवळीतील त्याचे जातोय मराठवाडा हे गाणे तर खूपच गाजले. त्या दिवशी मी विलासवर एक लेख लिहिला. ‘”काळ चालला पुढे पुढे ” या विलासच्या एका गाण्याच्या ओळीच या लेखाचे शीर्षक होते.

रमाबाई आंबेडकर नगर हत्याकांड आणि त्या नंतरच्या घटना म्हणजे एक वेगळाच विषय आहे. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा सरकारने केली. न्या. गुंडेवार यांचा आयोग नेमण्यात आला. त्यापूर्वी जस्टीस सुरेश यांनी एक चौकशी सत्यशोधन अहवाल प्रसिद्ध केला. मधल्या काळात या घटनेचे खूप राजकारण झाले. नारायण राणे यांचे एक समर्थक कार्यकर्ते होते. गुप्ता त्याचे नाव. भुजबळ यांनी अपत्याला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यास सांगितले हो. असे शपथपत्र गुप्ताने जाहीर करून या घटनेला वेगळीच कलाटणी देण्याचा डाव केला.त्यावेळी केंद्रीय गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांनी घटनास्थळी भेट दिली होती. युती सरकार बरखास्त करा अशी मागणी त्याच्याकडे करण्यात आली. यात त्यावेळी जनता दलाचे नेते ललित बाबर यांचाही प्रमुख सहभाग होता. पण गुप्ता यांनी ही मागणी साफ फेटाळून लावली.

बहुमताने निवडून आलेले सरकार असे बरखास्त करता येणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. (सध्या सरकार पाडण्यासाठी केंद्रीय सत्ता करीत असलेले कारनामे बघितले की इंद्रजित गुप्ता सारखे गृहमंत्री देशात होते याचेच नवल वाटते) केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या वारासाना रेल्वेत नोकरी देण्याची घोषणा केली आणि त्याची अमलबजावणी ही केली.
कालांतराने या घटनेची न्यायालयीन चौकशी सुरू झाली. घटना घडल्यानंतर घटनास्थळी पोहोचणारा मीच पहिला पत्रकार आणि पीपी छायाचित्रकार होतो. त्यामुळे मी या आयोगापुढे साक्ष द्यावी असे माझे संपादक निखील वागळे यांचे मत होते. त्यानुसार मी आयोगापुढे शपथपत्र सादर केले. माझे वकील होते संघराज रूपवते. त्याआधीच मी 23 सप्टेंबर रोजी महानगर मध्ये एक लेख प्रसिद्ध केला. त्याचे शीर्षक होते टॅंकर स्टोरीचा पर्दाफाश ” गोळीबार करण्यात आला त्याचे चित्रण समोरील सायोनारा इमारतीत 5 व्या मजल्यावर राहणार्‍या एका पेट्रोल पंप मालकाने केले होते. ते हाती लागल्यावर मी आनंद पटवर्धन यांना भेटलो. त्यांच्याकडून या छायाचित्रणाची सत्यता आणि इतर गोष्टी तपासून, समजून घेतल्या आणि मी लेख लिहिला. तसेच शिवडी येथे जाऊन त्या दिवशी. म्हणजे 11 जुलै रोजी शिवडी पेट्रोलियम मधून किती गाड्या पेट्रोल भरून निघाल्या होत्या याची मी माहिती मिळवली होती. त्या दिवशी रमाबाई आंबेडकर नगरच्या मार्गावरून गेलेल्या आणि तिथे थांबलेल्या वाहनात पेट्रोल नव्हतेच हे मी या लेखात सिद्ध केले होते.

त्यामुळे पेट्रोलने भरलेल्या वाहनांना आंदोलकानी आग लावली असती तर अर्धे घाटकोपर जळून खाक झाले असते म्हणून गोळीबार केला, असा पोलिसांचा बचाव होता. महानगराच्या या लेखामुळे पोलिसांचा हा बचावच गळून पडला. निखिल वागळे सारखे संपादक पाठीशी होते म्हणून हे शक्य झाले हे मान्यच केले पाहिजे. महानगरने शेवटापर्यंत या घटनेचा पाठपुरावा केला. आयोगाच्या दैनंदिन कामकाजचे वार्तांकन करण्यासाठी सुनील शिंदे यांची वागळे यांनी खास नेमणूक केली होती. इथे एक गम्मत आहे. उज्वल निकम यांनी गोळीबार करण्याचा आदेश देणार्‍या मनोहर कदमची बाजू आयोगापुढे मांडली होती तर मंजुळा राव यांनी शिवसेनेचे वकीलपत्र घेतले होते. आयोगापुढे माझी साक्ष तर एक स्वतंत्र लेखाचा विषय होईल.

मी यावेळी निकमची खूप टर उडविली होती. ” तुम्ही मागासवर्गीय आहात का? गोळीबारात मृत्यू पावलेले तुमच्या जातीचे आहेत का? असा प्रश्न मला उज्वल निकम यांनी विचारला होता. तेव्हा मी उलटा प्रश्न केला की ” का आपली कोणी बहीण लग्नाची आहे का? ” तेव्हा जेजनेच मला झापले होते. निखिल वागळे आणि शिवसेना यांच्यात वाद आहे हे खरे आहे का ” असा एक प्रश्न मला विचारण्यात आला. तुम्ही मागासवर्गीय आहात आणि निखिल वागळे याचाही युती सरकारला विरोध आहे. म्हणून मी शपथपत्र दिले आहे, त्यामुळे माझ्या दाव्यावर विश्वास ठेऊ नये असा निकम यांचा युक्तिवाद होता. मी निकम यांच्या प्रश्नांना गांभीर्याने घेत नव्हतो, त्यांच्या प्रश्नांना उलट उत्तर देत होतो. तेव्हा न्यायाधीशांनी मला समज दिली. शेवटी माझी साक्ष अपूर्ण ठेवण्याची विनंती करून निकम यांनी सलग दुसऱ्या दिवशी माझी उलट तपासणी घेतली.

माझी Tanker स्टोरी कशी खोटी आहे हे सिद्ध करण्याचा निकम यांनी खूप मेहनत घेतली पण ते शक्य झाले नाही. शेवटी आयोगाने पोलिसांची पेट्रोल भरलेल्या वाहनाची स्टोरी खोटी असल्याचे स्पष्ट केले आणि मनोहर कदमचा गोळीबार करण्याचा आदेश अनावश्यक होता असे सांगून मनोहर कदमला दोषी ठरविले.मी आणि निखिल वागळे आणि रमाबाई आंबेडकर नगर, मुंबईतील इतर अनेक कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनतीचे फळ मिळाले होते. पण शेवटी सरकार नावाची एक व्यवस्था असते. सरकारने हा अहवाल विधिमंडळात नाकारला. नंतर श्याम गायकवाड आणि इतरांनी ( सर्वांचीच नावे इथे घेणे शक्य नाही पण मला त्यांची जाणीव आहे) खूप काम केले. नेहमी प्रमाणे प्रस्थापित नेते विसरून गेले पण एक समिती स्थापन करून सरकारला उच्च न्यायालयात खेचन्यात आले.

दरम्यान युती सरकार जाऊन कॉ. आणि एन. सी. पीचे सरकार आले होते. भुजबळ गृहमंत्री होते पण विरोधी पक्षात असताना भुजबळ यांनी केलेल्या मागण्या ते विसरले आणि त्यांनीही मनोहर कदमवर काहीच कारवाई केली नाही. न्यायालयाने दणका दिल्यावर भुजबळ यांनी मनोहर कदमवर 304 कलमाखाली गुन्हा नोंदविला, 302 कलमानुसार गुन्हा नोंदविण्याची मागणी त्यांनी मान्य केली नाही. कदमला अटक करण्यात आली आणि सरळ त्याची रवानगी इस्पितळात करण्यात आली. एक तास ही तो तुरुंगात राहिला नाही. त्याला रीतसर निवृत्त होऊ दिले, सर्व फायदे देण्यात आले आणि नंतर त्याच्यावर कारवाई केल्याचा देखावा करण्यात आला. ( कदम न्यायालयात यायचा तेव्हाच त्याला टपकविण्याची तयारी वडाळा येथील कदम नावाच्या कार्यकर्त्याने केली होती. पण त्याची समजूत काढण्यात आली.आंबेडकरी युवक असे साहस करण्यास घाबरत नाही..पण ? )

या भयावह घटनेचे आंबेडकरी चळवळीवर काय परिणाम झाले. यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे. ही घटना एका वेगळ्या अर्थाने एक मोठी शोकांतिका आहे. वैयक्तिक पातळीवर एक पत्रकार म्हणून मी खूप काही शिकलो. यानंतर मला काही संघटनांनी पुरस्कार देऊ केला, मी असा पुरस्कार कसा काय घेणार? माझ्या हाडामांसाच्या माणसांना जीवे मारण्यात आले आणि या घटनेचे वार्तांकन केले म्हणून पुरस्कार ? नाही ते शक्य नाही. या घटनेवर भाषण देण्यासाठी बोलावण्यात येत होते. मी नाही गेलो. सुनील कदमने या हत्याकांडावर एक पोस्टर प्रदर्शन बनविले होते.पोलिसानी ते दाखविण्यास बंदी आणली होती.एवढी मोठी घटना घडून गेल्यावर आपण काय शिकलो? सरकारी यंत्रणा, नेते आणि एकूणच आंबेडकरी चळवळ असा सारा नव्याने काही विचार होऊ शकतो काय? सध्याच्या काळात एकूणच लोकशाही व्यवस्था धोक्यात आहे, ब्राम्हणी फॅसिस्ट सक्तीचे आक्रमण जोरदारपणे सुरू आहे. अशा काळात काही नवीन मांडणी शक्य आहे का? या घटनेस एक शोकांतिका म्हणून म्हणून आपण फक्त दरवर्षी शहिदांना स्मरण करून कर्तव्य पार पडणार आहोत का? प्रश्न गंभीर आहेत आणि आपल्याला उत्तर शोधावेच लागेल. ब्राम्हणी फॅसिस्ट शक्तीचा पाडाव या देशात फक्त आंबेडकरी विचार करू शकतो असे माझे ठाम मत आहे. ?

 इथे आणखी एका गोष्टीचा उल्लेख करू इच्छितो. तसा याचा आणि हत्याकांडाचा संबंध नाही. महानगर मध्ये निखल वागळे यांनी केवळ हे हत्याकांड नाही तर अनेक प्रश्नावर काम करण्याची संधी दिली प्रसंगी पाठराखण केली. त्याच्यासोबत अनेक विषयावर वादही झाले पण त्यांनी कधी ते वैयक्तिक असे घेतले नाही. पण खैरलांजी हत्याकांडावर कुमार केतकर यांनी घेतलेल्या भूमिकेला मी विरोध केला. ( खैरलांजी हत्याकांड हे प्रेम प्रकरणातून घडले असे आपल्या अग्रलेखात केतकरांनी लिहिले आहे. या हत्याकांडानंतर उल्हासनगर येथे आंदोलकांनी डेक्कन क्वीन जाळली तर महाराष्ट्राचे भूषण जळाले असा अग्रलेख केतकरांनी लिहिला. या हत्याकांडानंतर लोकसत्तासह एकूणच प्रसार माध्यमांच्या भूमिकेवर खैरलांजी स्मृती दिनी मी ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’मध्ये एका कार्यक्रमात मी टीका केली. तर केतकरांनी मला लोकसत्तेच्या नोकरीतून बडतर्फ केले. महाराष्ट्रातील दोन प्रमुख संपादकाच्या भूमिका कशा आहेत हे स्पष्ट करण्यासाठी ही थोडे विषायांतर केले

 बंधुराज लोणे : 9869197934 

हे सुध्दा वाचा:

अमित शहांच्या घरी खासदारांची गुप्त बैठक

दहावीत उत्तीर्ण होऊनही विद्यार्थी अकरावी प्रवेशाच्या प्रतीक्षेत

नाशिकची पाणी कपात टळली

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी