ड्रगमाफिया ललित पाटील याच्या मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्यामुळे ललित पाटीलला कुणाचा आशीर्वाद होता, हे चौकशीत लवकरच स्पष्ट होईल. या संदर्भात त्याला अंधेरी कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याने केलेले एक वक्तव्य खूप महत्त्वाचे आहे. त्याने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला सांगितले की, ‘मला ससूनमधून पळवण्यात आलं’. ललित पाटील याचे हे वक्तव्य खूप महत्त्वाचे आणि यामागे मोठे गूढ लपलेले आहे. कारण याचा अर्थ असा होतो की, ललित पाटीलच्या पाठिशी कुणीतरी आहे. कुणाच्या तरी वरदहस्तामुळे ललित पाटील ड्रगमाफिया होता. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीत ललित पाटील कुणाची नावे सांगतो, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
मुंबई पोलिसांनी ड्रगमाफिया ललित पाटील याला काल बंगळुरूमधून अटक केली. त्याच्यासोबत आणखी दोघांनाही अटक केली. त्यांना आज मुंबईच्या अंधेरी कोर्टात हजर करण्यात आले. तत्पूर्वी त्याने ‘मी ससून रुग्णालयातून पळालो नाही तर मला पळवण्यात आलं. कोणाकोणाचा हात आहे हे सर्व सांगेन’ असे वृत्तवाहिनाला सांगितले. याचाच अर्थ याची पाळेमुळे खूप खोलवर आहेत. कारण 2 ऑक्टोबरला तो ससूनमधून पळून गेल्यानंतर आणि 7 ऑक्टोबरला त्याच्या नाशिक जिल्ह्यातील शिंदे गावातील ड्रगची फॅक्टरी उद्ध्वस्त केल्यानंतर पोलिसांचा ससेमिरा त्याच्या पाठिशी लागला होता. तरीही तब्बल 15 दिवस त्याने महाराष्ट्र पोलिसांना गुंगारा दिला.
#WATCH | Mumbai: On drug mafia man Lalit Patil’s arrest, Joint CP (Law and Order) Mumbai Police Satya Narayan Chaudhari says, “Mumbai police started its action against drugs in August when a case was registered in Saki Naka… We have carried out the raid in Dongri, Pune and… https://t.co/AERDAyEb3D pic.twitter.com/pxbYwlTxFe
— ANI (@ANI) October 18, 2023
गंभीर बाब म्हणजे ससूनमधून पळून गेल्यानंतर ललित नाशिकमध्ये आला होता. नाशिकमधून तो इंदूरला गेला. पुढे सूरतला गेला. सूरतमधून तो पुन्हा महाराष्ट्रात म्हणजे धुळे आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. त्यानंतर तो बंगळुरूला गेला. बंगळुरूहून तो चेन्नईमार्गे श्रीलंकेला जाण्याच्या तयारीत असताना त्याला अटक केली. पोलिसांची पथके शोधावर असताना ललित पाटील धुळे, छत्रपती संभाजीनगरमध्ये आला होता. शिवाय ससूनमधून पळाल्यानंतर तो नाशिकमध्ये होता. म्हणजेच त्याच्यावर कुणाचातरी वरदहस्त होता.
या संदर्भात भूषण पाटील आणि अभिषक बलकवडे या ललितच्या साथीदारांना अटक झाल्यापासून राजकीय आरोप-प्रत्यारोप होत आहेत. पालकमंत्र्यांच्या आशीर्वादाशिवाय नाशिकमध्ये ड्रग्जची फॅक्टरी सुरू होऊ शकत नाही, असा आरोप ठाकरे गटाकडून केला जात होता. तर आपण सर्व प्रकारच्या चौकशीला तयार आहोत, असे प्रतिआव्हान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले होते.
हे ही वाचा
ड्रग्जमाफिया ललित पाटीलला बंगळुरूमधून अटक, ड्रग्जच्या रॅकेटचे गूढ उलगडणार?
महाराष्ट्र की महा’ड्रगनिर्मितीराष्ट्र’? नाशिकनंतर सोलापूरमध्येही ड्रग्जचा कारखाना
‘महाराष्ट्राचा उडता पंजाब करू नका’, ड्रग्ज तस्करीवरून पटोले सरकारवर बरसले
भुसे, शंभूराज देसाईंती नार्कोटेस्ट करा!
ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी या प्रकरणी थेट शिवसेना नेत्यांवर आरोपाची बंदूक रोखली आहे. दादा भुसे नाशिकचे पालकमंत्री आहेत तर शंभूराज देसाई उत्पादन शुल्कमंत्री आहेत. त्यामुळे दोघांची नार्कोटेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
ससूनचे डॉक्टर, पोलिसांची चौकशी व्हावी!
पुण्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी तर ससूनमधील डॉक्टरांच्या चौकशीची मागणी केली आहे. ललित पाटील ससूनमध्ये असताना त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टर, पहाऱ्यावर असणारे पोलीस यांची चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असा दावा आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे.