30 C
Mumbai
Wednesday, August 30, 2023
घरक्रिकेटआशिया चषक २०२३: पाकिस्तानबद्दल हे काय म्हणाला अश्विन?

आशिया चषक २०२३: पाकिस्तानबद्दल हे काय म्हणाला अश्विन?

येत्या २ सप्टेंबरला सगळ्यांचेच लक्ष लागून राहिलेल्या आशिया चषक स्पर्धेतील भारत विरुद्ध पाकिस्तान सामना होणार आहे. भारतीय संघ आशिया चषकासाठी सज्ज असतानाच भारताचा फिरकीपटू आर अश्विन याने एक मोठे व्यक्तव्य केले आहे. आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तान सर्वात प्रबळ दावेदार असून आणि भारतासोबत पाकिस्तानही फेव्हरिट असल्याचे अश्विनने सांगितले आहे.आपल्या युट्यूब चॅनेलवरून रविचंद्रन आश्विनने ही माहिती दिली.

आपल्या युट्यूब चॅनेलवरून बोलताना आश्विन म्हणाला, “पाकिस्तानचे यश कर्णधार बाबर आझम आणि यष्टिरक्षक मोहम्मद रिझवान यांच्या कामगिरीवर अवलंबून असणार आहे. जर बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांनी मधल्या फळीत फलंदाजीमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी केली, तर या आशिया चषक आणि विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा संघ इतरांसाठी त्रासदायक ठरणार आहे.”

पाकिस्तानला भारतापेक्षा जास्त वरचढ असण्यामागचे कारणही अश्विनने स्पष्ट केले आहे. “पाकिस्तानचा संघ इतरांपेक्षा जास्त मजबूत वाटत आहे. पाकिस्तानने नेहमीच असामान्य क्रिकेटपटू तयार केले आहेत. टेप बॉल क्रिकेटमुळे, त्यांच्याकडे नेहमीच वेगवान गोलंदाज आले आहेत. १९९० आणि २००० च्या दशकाच्या उत्तरार्धात त्यांची फलंदाजीही विशेष होती,” अश्विन म्हणाला.

“परंतु गेल्या ५-६ वर्षांत त्यांचा पुन्हा उदय होण्यामागे वेगवेगळ्या लीगमधील त्यांचे प्रदर्शन हे एक प्रमुख कारण आहे. त्यांच्याकडे पीएसएल आहे. अलीकडील बीबीएल ड्राफ्टमध्ये ते किमान ६०-७० पाकिस्तानी खेळाडू होते,” अश्विन पुढे म्हणाला.

३० ऑगस्ट ते १७ सप्टेंबर दरम्यान रंगणाऱ्या या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान आणि श्रीलंका संयुक्तपणे करणार आहेत. भारत आपल्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात पाकिस्तानविरुद्धच्या लढतीने करेल. ही लढत २ सप्टेंबर रोजी श्रीलंकेतील कॅंडी येथे होणार आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्मा करणार असून अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला उपकर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

स्पर्धेची सुरुवात पाकिस्तान आणि नेपाळ दरम्यान मुल्तान येथे होणार आहे. स्पर्धेतील अ गटात भारत, पाकिस्तान आणि नेपाळ आहेत तर बांगलादेश, अफगाणिस्तान आणि श्रीलंका यांचा समावेश ब गटामध्ये आहे. या स्पर्धेत पाकिस्तान दोन ठिकाणी चार सामने आयोजित करेल आणि उर्वरित सामन्यांचे आयोजन श्रीलंका करेल. अ आणि ब गटातील सामने संपल्यानंतर ६ सप्टेंबरपासून त्यातील सुपर ४ दरम्यान सामने सुरू होतील. सुपर फोरच्या शेवटी दोन आघाडीच्या संघांमध्ये कोलंबो येथे १७ सप्टेंबर रोजी अंतिम सामना खेळवला जाईल. आशिया चषक हा भारताच्या ऑक्टोबरमध्ये सुरू होणाऱ्या विश्वचषकाच्या तयारीसाठी महत्त्वाचा बेंचमार्क असेल आणि निवडकर्त्यांना विश्वचषक स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात मदत करेल.

हे ही वाचा 

आशिया चषक २०२३: राहूल द्रविडने फोडली मोठी बातमी!

नीरजच्या आईने जिंकली करोडो भारतीयांची मनं, पाकिस्तानी खेळाडुबद्दलचं व्यक्तव्य चर्चेत

नीरजच्या सुवर्ण कामगिरीवर आनंद महिंद्राची ट्विटर पोस्ट चर्चेत

आशिया चषकसाठी भारतीय संघ :
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, के एल राहुल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसीध कृष्णा, राखीव खेळाडु संजु सॅमसन.

असा असेल पाकिस्तानी क्रिकेट संघ : 
बाबर आजम (कर्णधार), अब्दुल्ला शफीक, फखर जमान, इमाम-उल-हक, सलमान अली आगा, इफ्तिखार अहमद, तैयब ताहिर, मोहम्मद रिजवान, मोहम्मद हारिस, शादाब खान (उपकर्णधार), मोहम्मद नवाज, उसामा मीर, फहीम अशरफ, हारिस रऊफ, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन अफरीदी

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी