32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रAzadi ka Amrut Mahotsav : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या 'उपेक्षां'नी...

Azadi ka Amrut Mahotsav : स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष विद्यार्थ्यांच्या, नागरिकांच्या ‘उपेक्षां’नी होणार साजरे

महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असे म्हणून त्यावेळी खेड्याचे महत्त्व विषद केले होते. देशातील खेड्यांचे महत्त्व आणि त्यांच्या सुधारणा याविषयी त्यांनी आधीच सांगून ठेवले असले तरीही प्रत्यक्षात परिस्थिती मात्र त्याच्या अगदी उलट पाहायला मिळत आहे.

यंदाचे वर्ष ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ म्हणून देशभरातून साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर वेगवेगळे कार्यक्रम राबवण्यासाठी मोदी सरकार जोरात तयारीला लागले आहे. एकीकडे स्वातंत्र्यांनंतरच्या विकासगाड्याचे गोडवे गायले जात असताना दुसरीकडे मात्र मुलभूत सुविधांच्या नावाने बोंब पाहायला मिळत आहे. हे कडवड वास्तव धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील नवे आच्छी, हिसपुर तसेच जुने आच्छी येथील असून येथे अजूनही रस्ता नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. ही समस्या आताची नसून गेले वीस वर्षे या गावांमध्ये रस्ताच नाही. रस्त्याच्या नावाखाली सगळीकडे खड्ड्यांचे साम्राज्य दिसून येत आहे, त्यामुळे याठिकाणी प्रवास करण्यासाठी नागरिकांना, विद्यार्थ्यांना फार जिकरीचे झाले आहे परंतु शासनाला इकडे ठुंकूनही बघायला वेळ नाही.

शिंदखेडा तालुक्यांतील या गावांमध्ये रस्त्यांची वानवाच पाहायला मिळत नाही. एक दोन नाही तर तब्बल वीस वर्षांपासून येथील रस्त्याचे कामच झालेले नाही, त्यामुळे येथे रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न स्थानिकांमध्ये निर्माण झाला आहे. रस्त्यातील मोठ्या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून पाण्याचे तळेच झाले आहे. या कारणांमुळे गावात एसटी सेवा सुद्धा बंद झाली आहे. खराब रस्ते, एसटी सेवा बंद यामुळे संबंधित गावातील विद्यार्थ्यांना दुसऱ्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणासाठी जाणे अवघड झाले आहे.

महात्मा गांधींनी खेड्याकडे चला असे म्हणून त्यावेळी खेड्याचे महत्त्व विषद केले होते. देशातील खेड्यांचे महत्त्व आणि त्यांच्या सुधारणा याविषयी त्यांनी आधीच सांगून ठेवले असले तरीही प्रत्यक्षात परिस्थिती मात्र त्याच्या अगदी उलट पाहायला मिळत आहे. शिवाय आता तर आजादी का अमृत महोत्सव साजरा करून देशाच्या विकसनशील वाटचालीकडे मोदी सरकार लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु शिंदखेडा तालुक्यातील ग्रामस्थांकडे कोण लक्ष देणार हा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

Kanumata Festival : खान्देशात कानुमातेच्या उत्सवाचा जल्लोष, उद्या होणार विसर्जन

Ganpatrao Deshmukh : विधानसभेचे विद्यापीठ !

VIDEO : किरीट सोमय्यांचे पुढचे लक्ष्य अस्लम शेख

शिंदखेड तालुक्यातील नवे आच्छी, हिसपूर तसेच जुने आच्छी येथील ग्रामस्थांना आजही मुलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. साधारण दोन हजार लोकवस्तींच्या या गावांतील किमान 8 ते 9 किलोमीटर अंतराचा रस्ताच कुठे हरवून गेला आहे. याविषयी ग्रामस्थांना विचारले असता ते त्यांच्या अडचणींचा पाढाच वाचून दाखवत शासन लक्ष देत नसल्याचे दुःख व्यक्त करतात.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या वीस वर्षांत या भागात रस्ताच नाही, त्यामुळे पावसाळ्यात या ठिकाणी गावमार्गात कुठे डबक्याचे तर कुठे तलावाचे स्वरूप येते. परंतु अशा चिखलमय आणि खड्डेमय रस्त्यातून वाट तुडवत, पावसाची पर्वा न करत मुलं शिक्षणासाठी मोठ्या गावी, तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची जिद्द दाखवतात असे म्हणून त्यांनी विद्यार्थ्यांच्या खराब रस्त्यावर होणाऱ्या पायपाटीचे वर्णन केले आहे.

पुढे ग्रामस्थ म्हणतात, रस्ता खराब असला तरीही मुलांमध्ये कमालीची जिद्द आणि चिकाटी आहे. गावात रस्तेच धड नसल्यामुळे आता तर एसटी सेवा सुद्धा बंद झाली आहे. यात एसटीचा दोष नाही, रस्ता जर चांगला असेल तर एसटी येणारच.. रस्त्याअभावी विद्यार्थी, गृहिणी, रुग्ण, शेतकरी, पालक अशा सगळ्यांचीच गैरसोय होत आहे. गावातील रस्त्याच्या अवस्थेसंदर्भात मायबाप म्हणवणाऱ्या लोकप्रतिनिधींना, मायबाप म्हणवणाऱ्या प्रशासनाला निवेदनं दिलीत मात्र काहीच उपयोग झाला नसल्याचे ग्रामस्थांनी म्हटले आहे.

दरम्यान या समस्येतून मार्ग काढण्यासाठी शासनाचा निषेध दर्शवण्यासाठी विरदेल आच्छी, हिसपुर रस्त्यावर गावकरी,महिला, शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावरील पाण्याच्या डबक्यात मासेमारी करत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त केला परंतु याची सुद्धा कोणाकडून अद्याप दखल घेण्यात आलेली नाही.

विद्यार्थ्यांविषयी बोलताना ग्रामस्थ पुढे म्हणाले, शिंदखेडा तालुक्यातील नवे आच्छी, हिसपुर, जुने आच्छी या गावांना जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळा म्हणजे फक्त इयत्ता चौथी पर्यंतच शिक्षणाची सोय आहे. त्यापुढील शिक्षणासाठी विरदेल, दोंडाईचा या मोठ्या गावी अथवा शिंदखेडा या तालुक्याच्या गावी यावे लागते. रस्त्याची दुरावस्था झाली असल्याने मागील एक वर्षापासून या गावांना एसटी बस येत नाही म्हणून या गावातील शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची खंत यावेळी ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आली.

ज्या पालकाची आर्थिक परिस्थिती चांगली आहे अशा पालकांनी त्यांच्या पाल्यासाठी खाजगी वाहन लावले आहे, मात्र असे बोटावर मोजण्याइतकेच पालक आहेत. गावातील ऐंशी टक्के ग्रामस्थांची आर्थिक स्थिती जेमतेम असल्याने त्यांच्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या ऐंशी टक्के ग्रामस्थांच्या पाल्यांनी पायी प्रवास करून शिक्षण घ्यायचे ठरवले तरी रस्त्याची अवस्था खूपच दयनीय आहे, त्यामुळे या परिस्थितीवर शासनाने “बेटी बचाव”, “बेटी पढाव” चा लावलेला नारा या गावातील मुलींच्या बाबतीत निष्फळ ठरल्याचे म्हणत ग्रामस्थांनी शासनाला फटकारले आहे.

या दयनीय रस्त्याच्या समस्येबाबत गावकऱ्यांनी शासकीय दरबारी अनेक वेळा लेखी निवेदन दिली आहेत, आंदोलन सुद्धा केले मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही. दरम्यान, या कारणावरून स्थानिक आता चांगलेच आक्रमक झाले आहेत. यावर बोलताना शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे म्हणाले, सदर रस्त्याचे काम लवकरात लवकर पूर्ण केले नाही तर गावकरी, महिला, विद्यार्थी यांना घेऊन धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शाळा भरुन तीव्र  आंदोलन  केलं  जाईल असे म्हणून त्यांनी शासनाला इशाराच त्यांनी दिला आहे. त्यांच्या निर्णयाला आच्छी गावाचे सरपंच नामदेव कोळी, सखाराम कोळी, रविंद्र मोहने, मुकेश ईशी, कामाजी दाजमल कोळी, शांताराम कोळी, तसेच ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शवला आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी