32 C
Mumbai
Thursday, April 18, 2024
Homeमहाराष्ट्रआमदार जयकुमार गोरे यांचे नाव ऐकताच अजित पवारांची सटकली

आमदार जयकुमार गोरे यांचे नाव ऐकताच अजित पवारांची सटकली

टीम लय भारी

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. जे मनात मनात आहे ते ताडकन बोलून मोकळे होतात. त्यांचा रोखठोक स्वभाव आहे. माण – खटाव मतदार संघाचे आमदार जयकुमार गोरे यांच्याविषयी भावना व्यक्त करताना अजित पवार यांनी आपल्या रोखठोक स्वभावाला साजेशा भावना व्यक्त केल्या आहेत.सातारा जिल्ह्यातील वडूज व दहिवडी या दोन्ही नगरपंचायतींमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता स्थापन झाली आहे. निवृत्त IAS अधिकारी व राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी आखलेल्या डावपेचांमुळे राष्ट्रवादीने हे यश संपादन केले.

त्या पार्श्वभूमीवर प्रभाकर देशमुख यांनी दोन्ही नगरपंचायतींचे नगराध्यक्ष व इतर सर्व सदस्यांना मंत्रालयात आणले होते. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नव्या कार्यकारीणीची ओळख दिली. दहिवडी व वडूज या दोन्ही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आहे. तेथील योजना डबघाईला आलेली आहे. त्यामुळे लोकांना पुरेसे व वेळेवर पाणी मिळत नाही. नवीन योजनेसाठी निधी द्यावा अशी मागणी देशमुख यांच्या नेतृत्वाखालील या सदस्यांनी केली.

त्यावेळी अजित पवार यांना आमदार जयकुमार गोरे यांची आठवण ‘दाटून’ आली. पाण्याची एवढी गंभीर समस्या आहे. मग जयकुमार गोरे निवडून येतातच कसे काय ? गोरे हे काम न करणारे आमदार आहेत. बऱ्याचदा दुसऱ्यांनी केलेली कामे ते स्वतःच्या नावावर खपवत असतात. असे असताना स्थानिक जनता गोरेंना निवडून देतेच कशी ?’ अशा शब्दांत अजित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला.
अजित पवार यांनी जयकुमार गोरे यांच्याविषयी संताप व्यक्त केलाच, पण जयकुमार यांचे दुसरे बंधू शेखर गोरे यांच्याबाबतही राग व्यक्त केला.

दहिवडी नगरपंचायतीच्या एका सदस्याचे शेखर गोरे यांनी अपहरण केले होते. या सदस्याला शोधून काढण्यासाठी साताऱ्याच्या पोलीस अधिक्षकांनी जंग जंग पछाडले होते. पुणे जिल्ह्यात पोलिसांनी सापळा रचून शेखर गोरे व संबंधित सदस्याला शोधून काढले होते.
त्यावेळी संतापलेल्या पोलीस अधिक्षकांनी शेखर गोरे यांचाही समाचार घेतला होता. त्या संदर्भाने अजित पवार यांनी आपल्या भावनाही यावेळी व्यक्त केल्या.

ही लोकशाही आहे. इथे कायद्याचे राज्य चालते. निवडून आलेल्या सदस्याचे अपहरण कुणीही करू शकत नाही. अपहरण केल्यानंतर तुम्ही लोकांनी शेखर गोरेवर गुन्हा दाखल करायला हवा होता, असे अजितदादा म्हणाले.गोरे बंधूंविषयी राग व्यक्त करून झाल्यानंतर अजित पवार यांनी माण – खटावमधील विविध योजनांसाठी भरभरून निधी दिला.नगरोत्थान योजनेतून दहिवडीसाठी १६ कोटी रुपये, तर वडूजसाठी १४ कोटी रुपयांच्या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद दिला. या शिवाय स्मशानभूमी, मागासवर्गीयांचे संविधान सभागृह, मुस्लिम समाजासाठी दफनभूमी, एमपीएससी / युपीएससी करू इच्छिणाऱ्यांसाठी सुसज्ज ग्रंथालय, अभ्यासिका, बाग बगीचे इत्यादी योजनांसाठी भरभरून निधी दिला. या योजना लवकरच मार्गी लावल्या जातील, असे आश्वासनही अजित पवार यांनी देशमुख यांना दिले.

नवनियुक्त सदस्यांना मानाचे स्थान माण – खटावमधील स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून आलेल्या सदस्यांना आपल्या नेत्यासोबत भेट घडवून आणण्याचा नवा पायंडा प्रभाकर देशमुख यांनी या निमित्ताने पाडला. आमदार जयकुमार गोरे यांनी यापूर्वी कधीही आपल्या पदाधिकाऱ्यांना अशा पद्धतीने मान दिला नव्हता.किंबहूना स्थानिक पदाधिकारी मंत्रालयाकडे कधीही फिरकणार नाहीत, याची ते सतत काळजी घेतात. पदाधिकारी हुशार झाले तर डोईजड होतील, अशी भिती गोरे यांना वाटत असते. त्यामुळे त्यांचे सातारा जिल्ह्याच्या बाहेर महत्व वाढून द्यायचे नाही, याची काळजी गोरे घेत असतात, अशी चर्चा माण – खटावच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

प्रभाकर देशमुख यांनी मात्र गोरेंच्या उलट विचार केला. नव्या पदाधिकारी व सदस्यांना मंत्रालयात नेले तर ते हुशार होतील. लोकहिताच्या अनेक योजना त्यांना कळतील. त्या योजना आपापल्या कार्यक्षेत्रात राबविण्यासाठी ते धडपड करतील. सरकारी कामकाज कसे चालते याचा त्यांचा अभ्यास होईल, या उदात्त भावनेतून प्रभाकर देशमुख यांनी नव्या पदाधिकाऱ्यांची भेट अजित पवारांसोबत घडवून आणल्याचे सूत्रांनी सांगितले.यावेळी वडूजच्या नगराध्यक्षा मनिषा काळे, उपाध्यक्ष मनोज कुंभार, दहिवडीचे नगराध्यक्ष सागर पोळ आदी मान्यवर उपस्थित होते.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी