28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
Homeमहाराष्ट्रचंद्रकात पाटलांचा डाव पुण्यातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी उधळला

चंद्रकात पाटलांचा डाव पुण्यातील आमदार आणि अधिकाऱ्यांनी उधळला

मंत्रालयात मार्च एंडिंगची प्रशासकीय लगीनघाई सुरु असतानाच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयाकडून विकास कामांच्या याद्यांमध्ये ऐनवेळी फेरबदल करण्यात आल्याचा धक्कादायक कारनामा उघडकीस आला आहे. पुणे जिल्हा वार्षिक आराखड्यात मंजूर नसलेली विकास कामे ऐनवेळी घुसडवून त्या कामांना घाईगडबडीत मंजुरी आणि प्रशासकीय मान्यता मिळविण्याच्या पुण्याच्या पालकमंत्री कार्यालयाने केलेल्या या कारनाम्यामुळे जिल्हा प्रशासनाचा पुरता गोंधळ उडाल्याचे बघायला मिळाले.

देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये चंद्रकांत पाटील महसूलमंत्री होते. त्यामुळे कुठल्याही कामांना झटपट मंजुरी आणि प्रशासकीय मान्यता कशी मिळवून घ्यायची, याचा त्यांना चांगला अनुभव आहे. हा अनुभव पणाला लावून पुण्याचे पालकमंत्री या नात्याने त्यांच्या कार्यालयाने जिल्हा वार्षिक आराखड्यात मंजूर नसलेली कामे मार्च एंडिंगच्या लगीनघाईत घुसडवून ती मंजूर करून घेण्याचा प्रकार काही आमदारांच्या सतर्कतेने उजेडात आला. या आमदारांनी पालकमंत्र्याच्या कार्यालयाने केलेल्या या कृतीबद्दल प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली.

पालकमंत्र्यांच्या कार्यालयाने जनसुविधा, नागरी सुविधा, दलित वस्ती या लेखाशीर्षांतर्गत आधीच मंजूर असलेल्या कामांमध्ये फेरबदल करण्यासाठी प्रशासनावर दबाव टाकण्यात आल्याचे निदर्शनास आले. मार्च एंडिंगची गडबड सुरु असतानाच पालकमंत्र्यांच्या कार्यालयाकडून भलतीच कामे मंजूर करून घेण्यासाठी वापरण्यात आलेल्या दबावतंत्रामुळे पुणे जिल्हा प्रशासनाची त्रेधातिरपीट उडाली. पालकमंत्री कार्यालयाच्या या कृतीला आमदारांनी विरोध केल्यानंतर प्रशासनाचे काम सोपे झाले.

पालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न!

मार्च एंडिंगमुळे शुक्रवारी रात्री १२ वाजेपर्यंत सरकारी कार्यालये सुरु होती. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे जिल्हा परिषद आणि इतर सरकारी कार्यालयात अधिकारी डोळ्यात तेल घालून कामे करीत असतानाच पालकमंत्री कार्यालयाकडून प्रशासनावर नियमबाह्य पद्धतीने दबाव आणण्याच्या प्रयत्नाचा एका स्थानिक आमदाराने तीव्र शब्दात विरोध केला.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी