25 C
Mumbai
Sunday, February 5, 2023
घरमहाराष्ट्रमुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामाख्या पूजा पावणार का?

मुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कामाख्या पूजा पावणार का?

नागपूर अधिवेशन हे मुख्यमंत्रीपद घालवणारे म्हणून ओळखले जाते. विलासराव देशमुख, मनोहर जोशी, सुधाकरराव नाईक, बाबासाहेब भोसले आणि बॅरिस्टर अ. र. अंतुले यांच्या पदाचे हिवाळी अधिवेशनाने बळी घेतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा नागपूर हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कसे ठरणार, हा औत्सुक्याचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदेंना कामाख्या मंदिरात केलेली तंत्र-मंत्र पूजा पावणार का, हाही चर्चेचा मुद्दा आहे. याशिवाय, राजकीय पक्षात फूट पाडण्याचा इतिहास असलेल्या नागपुरात यंदा विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील ऐक्यात बिघाडी करण्याचे भाजपचे डावपेच सुरू आहेत.

नागपूर अधिवेशन हे मुख्यमंत्रीपद घालवणारे म्हणून ओळखले जाते. (Chief Minister Chair in Danger) विलासराव देशमुख, मनोहर जोशी, सुधाकरराव नाईक, बाबासाहेब भोसले आणि बॅरिस्टर अ. र. अंतुले यांच्या पदाचे हिवाळी अधिवेशनाने बळी घेतले आहेत. त्या पार्श्वभूमीवर यंदा नागपूर हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी कसे ठरणार, हा औत्सुक्याचा मुद्दा आहे. एकनाथ शिंदेंना कामाख्या मंदिरात केलेली तंत्र-मंत्र पूजा पावणार का, हाही चर्चेचा मुद्दा आहे.

नागपुरातील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर काही दिवसांतच देशमुख, जोशी, नाईक, आणि बॅरिस्टर अंतुले या राज्याच्या पाच मुख्यमंत्र्यांना पदावरून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे राज्यातील कोणत्याही मुख्यमंत्री हा नागपूर अधिवेशन म्हणताच चिंतीत होतो. राजकारण्यांच्या उरात धडकी भरविणारे असेच हे अधिवेशन असल्याचे इतिहास सांगतो. इथेच राजकीय पक्षात फोडाफोडीचे डावपेच आखले जातात. यंदाही नागपुरातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खुर्चीला सुरुंग लावला जाणार का, यांची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नागपूरच्या, विदर्भातील नेत्यांना मात्र हिवाळी अधिवेशन कमालीचे भावते. ही मंडळी फॉर्मात असतात. त्यामुळेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जोरात दिसत असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नागपुरातून काही बत्ती तर लावली जाणार नाही ना, या विचाराने चिंतीत दिसत आहेत.

उद्धव ठाकरे यांना तर नागपूर टाळूनही पक्षातील काही असंतुष्ट, फुटीर मंडळींच्या बंडामुळे पद गमवावे लागले होते. शिवसेनेत छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात पडलेल्या फुटीचे डावपेचही नागपूर अधिवेशनकाळातलेच! जसे उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याला नोयडा दौऱ्यानंतर पद गमवावे लागते, असा राजकीय गैरसमज रूढ झाला आहे, तसेच काहीसे राज्याच्या मुख्यमंत्रीपदाबाबत नागपूर हिवाळी अधिवेशनाबाबत सांगितले जाते. बँ. अ. र. अंतुले, बाबासाहेब भोसले, सुधाकरराव नाईक, मनोहर जोशी व विलासराव देशमुख या पाच मुख्यमंत्र्यांना हिवाळी अधिवेशन संपताच काही काळाने पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. साहजिकच हिवाळी अधिवेशन म्हटल्यावर कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या मनात धडकीच भरते.

हिवाळी अधिवेशन काळात नागपूरमध्ये झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्ष बैठकीत काही आमदार मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांच्यावर धावून गेले होते. त्यावेळी बाबासाहेबांनी चपला हातात घेऊन बैठकीतून काढता पाय घेतला होता. नंतर बाबासाहेबांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागले होते. नागपुरातच तेव्हाच्या अभेद्य आणि आक्रमक शिवसेनेत 18 आमदारांना घेऊन छगन भुजबळ यांनी बंड केले होते. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेस आमदारांच्या संरक्षणातच भुजबळांना विधानसभेत प्रवेश करावा लागला होता. शरद पवार यांच्या विरोधातही सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनानंतरच बंड पुकारले होते. मात्र, देशमुख-शिंदेंचे हे बंड फसले. या मंडळींनी अधिवेशन संपताच पवारांना पदावरून दूर करण्याची मागणी केली होती. मात्र, पवारांनी नेहमीप्रमाणे राजकीय डावपेच लढवून पक्षातील विरोधकांना धोबीपछाड देत मुख्यमंत्रीपद वाचविले होते. राजीव गांधी यांचीच पवारांच्या विरोधातील बंडाला फूस असल्याच्या चर्चा तेव्हा रंगविल्या गेल्या होत्या. पवारांनी आपली खुर्ची वाचविली. मात्र, नागपूर अधिवेशनाने विलासराव देशमुख, मनोहर जोशी, सुधाकरराव नाईक, बाबासाहेब भोसले आणि बॅरिस्टर अ. र. अंतुले यांच्या मुख्यमंत्रीपदाची खुर्ची खेचून घेतली होती.

हे सुद्धा वाचा : 

हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरपर्यंत चालणार; तीन वर्षांनंतर नागपुरात कामकाज!

हिवाळी अधिवेशन : राज्यपाल कोश्यारी, मंत्री चंद्रकांत पाटील यांना हटवा, विरोधकांचा चहापानावर बहिष्कार

शिंदे सरकारचे खोके नागपूरला जाणार

राजकीय पक्षात फूट पाडण्याचा इतिहास; महाविकास आघाडीतील ऐक्यात बिघाडी करण्याचे भाजपचे डावपेच 

राजकीय पक्षात फूट पाडण्याचा इतिहास असलेल्या नागपुरात यंदा विधान परिषद सभापतीपदाच्या निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीतील ऐक्यात बिघाडी करण्याचे भाजपचे डावपेच सुरू आहेत. सध्या विधानपरिषद सभापतीपद रिक्त आहे. राज्यपालांनी 12 आमदारांची फाईल अडवून ठेवली आहे. याशिवाय, स्थानिक स्वराज्य संस्थांतून निवडून द्यावयाच्या 9 म्हणजे एकूण 21 सदस्यांच्या जागा रिक्त आहेत. शिवसेनेच्या डॉ. नीलम गोऱ्हे या उपसभापती आहेत. भाजपाला सभापतीपद हवे आहे. प्रवीण दरेकर, राम शिंदे यांची नावे त्यासाठी चर्चेत आहेत. मात्र, मुंबई महापालिका निवडणूक लक्षात घेऊन मंत्रीमंडळ विस्तारात दरेकर यांना संधी दिली जाईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे भाजप प्रदेशाध्यक्षपद निवडणुकीत चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबरोबरच दावेदार म्हणून चर्चेत राहिलेले राम शिंदे यांची सभापतीपदी वर्णी लावली जाण्याची शक्यता आहे. त्यामागे आगामी निवडणुकीतील जातीय मतांचे राजकारणही आहेच. मात्र, संभागृहातील सध्याची संख्याबळाची स्थिती पाहता, राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या मदतीशिवाय भाजपला सभापतीपद मिळविणे अशक्य आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ यांच्याकडेच विधानसभा उपाध्यक्षपद कायम ठेवावे आणि सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचा पाठिंबा मिळविण्याचे छुपे प्रयत्न भाजपाकडून सुरू असल्याची चर्चा आहे. असे झाल्यास नुकत्याच मुंबईत झालेल्या महामोर्चात दिसलेल्या महाविकास आघाडीतील ऐक्याला तडा जाऊ शकतो.

Chief Minister Chair in Danger, Nagpur Winter Session, मुख्यमंत्रीपद घालवणारे नागपूर अधिवेशन

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!