28 C
Mumbai
Sunday, September 29, 2024
Homeमहाराष्ट्रग्रामपंचायत निवडणुकीत कोटींचा धुरळा!

ग्रामपंचायत निवडणुकीत कोटींचा धुरळा!

टीम लय भारी, अतुल माने ज्येष्ठ पत्रकार

पुणे : राजकीय कारकिर्दीचा पाया म्हणून ग्रामपंचायत निवडणूक (Gram Panchayat elections) ही पाहिली जाते. एकवेळ लोकसभा निवडणुक जिंकणे सोपे असते पण ग्रामपंचायत निवडणुकीत आपल्याच गल्ली मध्ये मते मिळून साधं ग्रामपंचायत सदस्य होणे महाकठीण. शुक्रवारी राज्यात झालेल्या 14234 ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांनी काही कोटी रुपयांचा धुरळा उडविल्याचे स्पष्ट झाले आहे.

काही जिल्ह्यात संक्रांतीचे वाण म्हणून भावी महिला सदस्यांनी सोने आणि चांदीचे वाण मुक्तहस्ते लुटल्याची चर्चा आहे. खर्चाच्या मर्यादेवर रामबाण उपाय म्हणून काही चतुर उमेदवारांनी वस्तू स्वरूपात मतदारांना खुश करण्याचा प्रयत्न केला आहे. टीव्ही , वॉशिंग मशीन ते महागडे मोबाईल फोन यामध्ये आय फोन चा समावेश आहे अशा काही वस्तू दिल्या आहेत. काही ठिकाणी प्रति मत 50 ते 70 हजार असा दर असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. कांटे की टक्कर असलेल्या वार्डात एकेका मतासाठी लाखोंची बोली लागल्याची खुमासदार चर्चा आता गावातील पारावर रंगू लागली आहे.

काही उमेदवारांनी आपल्या निवडणूक चिन्हांचा वापर प्रत्यक्षात करून घरटी ती वस्तू पोचेल अशी व्यवस्था केली होती. कोल्हापूर जिल्ह्यातील एका उमेदवाराने तर हे चिन्ह असलेल्या गाड्याचे वाटप केल्याचे समजते. पुणे जिल्ह्यातील शिरुर खेड तालुक्यातील एका ग्रामपंचायत उमेदवाराने आपले निवडणूक चिन्ह असलेल्या बॅटच्या चांदीच्या प्रतिकृतीचे वाटप केल्याचे समजते. काही उमेदवारांनी एक महिन्याचा किराणा , पाच ते 15 लिटर तेलाचे डबे, तर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर साड्या, विविध प्रकारची वाणांचे मोठ्याप्रमाणात वाटप केले आहे.

मुंबई, पुण्यातील मतदारांना गावाला घेऊन येणे आणि पुन्हा सोडण्यासाठी देखील विशेष सोय करण्यात आली होती . त्यासाठी गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला होता.

पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव एमआयडीसी हद्दीतील एका ग्रामपंचायती उमेदवारांने तब्बल 80 हजार वाटप केल्याची जोरदार चर्चा गावांच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे.

वास्तविक ग्रामपंचायत सदस्य संख्येनुसार उमेदवाराला 15 ते 75 हजार रुपये खर्चाची मर्यादा निवडणूक आयोगाने ठरवून दिली असली तरी प्रत्यक्षात कोटींचा धुरळा उठला आहे. सोमवार 18 जानेवारीला निकाल लागणार असून कोणाची हुकूमत गावावर असेल ते ठरेल.

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी