ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजित डिसले गुरुजी यांच्यावर आरोप करणारे आणि अनेक मुद्द्यांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी किरण लोहार (Education Officer Kiran Lohar) यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून कारवाई करण्यात आली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने किरण लोहार यांना २५ हजारांची लाच स्वीकारताना अटक केली आहे. लोहार यांच्यासोबत या प्रकरणात आणखी एका कर्मचाऱ्याला देखील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यानंतर किरण लोहार यांच्या कोल्हापूर येथील घरावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने धाड टाकून झाडाझडती घेतली आहे. पण यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना किरण लोहार यांच्या घरात कोणतीही रोख रक्कम आढळून आली नाही.
25 हजार रुपयांची लाच घेताना किरण लोहार यांना अटक केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी (ता. 31 ऑक्टोबर) रात्री 10 वाजल्यापासून ते मंगळवारी (ता. 1 नोव्हेंबर) पहाटे तीन वाजेपर्यंत घरातील सर्व कागदपत्रांची तपासणी केली. या तपासणीनंतर किरण लोहार यांच्या स्थावर मालमत्तेबाबतचा अहवाल सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. किरण लोहार हे आजपर्यंत त्यांच्या कामामुळे नाही तर वादांमुळे कायमच चर्चेचा विषय राहिले आहेत.
किरण लोहार हे त्यांना मिळालेल्या पीएच.डी च्या मुद्द्यावरून चर्चेत आले होते. लोहार यांना कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा या विद्यापीठाकडून ऑनररी पीएच. डी पदवी देण्यात आली होती. परंतु जेव्हा शिक्षण संचालकांच्या अधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी केली तेव्हा कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी ऑफ टोंगा ही संस्था बोगस असल्याचे तपासात उघड झाले. तर दुसरीकडे टोणगा या देशाकडून सुद्धा त्यांच्या येथे अशा नावाचे कोणतेही विद्यापीठ नसल्याचे स्पष्ट सांगितले.
हे सुद्धा वाचा
Maharashtra Politics : ‘…नाहीतर राज्यातला ऑक्सिजन गुजरातला गेला असता’
Bachhu Kadu : ‘सत्ता गेली चुलीत, आम्हांला त्याची पर्वा नाही!’ बच्चू कडू आक्रमक
किरण लोहार हे ग्लोबल टीचर रणजित डिसले गुरुजी यांच्यामुळे देखील चर्चेत आले होते. रणजित डिसले गुरुजी यांच्या रजेचा अर्ज लोहार यांनी जाणीवपूर्वकरीत्या मंजूर न केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. मूळचे कोल्हापूरचे असलेले किरण लोहार यांनी आतापर्यंत रत्नागिरी, कोल्हापूर आणि सोलापूर येथे काम केलेले आहे. पण या सर्वच ठिकाणी त्यांची काम करण्याची पद्धत आणि इतर मुद्द्यांमुळे ते नेहमीच वादग्रस्त ठरले
किरण लोहार यांची आतापर्यंतची कारकीर्द इतकी वादग्रस्त आहे की राजकारणी लोकांमध्ये देखील त्यांची प्रतिमा त्याच पद्धतीची आहे. लोहार त्यांच्या वादामुळे इतके चर्चेत राहिले आहेत की, माजी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रिफग यांनी सुद्धा अधिकारी लोहार कुठे आहेत ? असा प्रश्न लोकशाही दिनाच्या दिवशी भर सभागृहात विचारला होता. तसेच काँग्रेसचे कोल्हापूरचे जिल्हाध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार सतेज पाटील यांच्यापर्यंत लोहार यांच्या अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.
दरम्यान, आता 25 हजार रुपयासानंही लाच घेतल्याप्रकरणी किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. किरण लोहार यांना तीन नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयाकडून देण्यात आले आहेत.