जुनी निवृत्तिवेतन योजना (Old pension scheme) लागू करण्याबरोबरच विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाला सहा दिवस झाले तरी हा संप मिटण्याची चिन्हे दिसत नसून संपात सहभागी झालेल्या संघटनांच्या समन्वयन समितीने या आठवडय़ासाठी संपकरी कर्मचाऱ्यांना कार्यक्रम आखून दिला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवांचा खोळंबा होणार असला तरी संपकरी ठाम आहेत. त्यामुळे कर्मचारी संप अधिक चिघळण्याची दाट शक्यता आहे. (Employee Strike)
जोपर्यंत सरकार जुन्या निवृत्तिवेतन योजनेविषयी काही निर्णय घेत नाही तोपर्यंत संप सुरू राहणार आहे. संपकरी कर्मचाऱ्यांना पुढील कार्यक्रम दिला आहे, असा इशारा राज्य शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी संघटना समन्वयक विश्वास काटकर यांनी दिला आहे. त्याचप्रमाणे मुख्य सचिवांसोबत बैठक आहे. या बैठकीत काय चर्चा होते यावर पुढील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजपत्रित अधिकारी महासंघाचे संस्थापक सल्लागार ग. दि. कुलथे यांनी दिली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मागण्या
- नवी पेन्शन योजना रद्द करावी
- दीर्घ सेवा कंत्राटी कर्मचाऱ्यांना समान वेतन मिळावे
- सर्व रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी
- बिनशर्त अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करावी
- सेवानिवृत्तीचे वय ६० वर्षे ठेवावे
- नवीन शैक्षणिक धोरण संपुष्टात आणावे
- आरोग्य कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर लक्ष द्यावे
हे सुद्धा वाचा :
18 लाख सरकारी कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर; सरकारी विभागांचे कामकाज ठप्प
PHOTO: राज्यात लाखो सरकारी कर्मचाऱ्यांनी दिली बेमुदत संपाची हाक
दरम्यान, राजपत्रित अधिकारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत सोमवार मुख्य सचिव श्रीवास्तव दुपारी 12 वाजता चर्चा करणार आहेत. सध्या अधिवेशन सुरू असल्यामुळे राजपत्रित अधिकारी महासंघ 28 मार्चपासून संपात सहभागी होणार असल्याचे घोषित केले आहे.