32 C
Mumbai
Saturday, May 13, 2023
घरमहाराष्ट्रसरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!

कांदा दारात मोठी घसरण झाल्याने जिल्ह्यातील बळीराजा मोठ्या चिंतेत आहे. सरकारने नाफेडकडून कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी त्याबाबत शेतकरी समाधानी नाही. परिणामी शेतकऱ्यांचा केंद्र आणि राज्य सरकारांवर रोष आहे. याच पार्श्वभूमीवर कांदा दरांतील सततच्या घसरणीला वैतागून येवला तालुक्यातील मतुलठाण येथील शेतकऱ्याने होळीच्या मुहूर्तावर मोठे पाऊल उचलले आहे.

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील मातुलठाण गावातील कांदा उत्पादक शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी कांद्याला भाव मिळत नसल्याने उद्विग्न होऊन आपल्या शेतात कांद्याची होळी केली. तळहातावरील फोडाप्रमाणे कांदा पीक जपलं, वाढवलं आज त्याच हातांनी शेतकऱ्याने काल दीड एकरवरील कांदा पिकाची होळी करुन सरकारच्या निषेधार्थ अग्निडाग आंदोलन केले. (Farmer)

कांद्याचे भाव घसरल्याने शेतकरी संकटात सापडलेला असल्याने ठिकठिकाणी कांदा उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरला आहे, आंदोलन करत आहेत. या अनुषंगाने कांद्याची होळी करण्यासाठी आणि यातून सरकारविरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी निम्याहून अधिक गाव लोटला होता. प्रत्येकाच्या भावना एकसारख्या होत्या, त्यामुळे लहान मुले, बाया बापडे सारेच मनावर दगड ठेवून कांद्याला अग्नी देत होते. जणू घरातली एखाद्या व्यक्तीचे निधन झाले आशा भावनेने एकीकडे डोळ्यांतून अश्रूंना वेगळी वाट करुन देत होते. विशेषतः नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी शेतकऱ्यांच्या भल्यासाठी होत आहे हा विश्वास निर्माण करण्यात सरकारला अपयश आलं आहे. त्यामुळे नाफेडसह केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध केला जात आहे. त्याचबरोबर कांद्याला हमीभाव द्या आणि नुकसान भरुन काढण्यासाठी अनुदान द्या ही मागणी केली जात आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून दिले आहे. शेतकऱ्यांचे जगणे सरकारला मान्य नाही. उत्पादकांनी कष्टाने पिकवलेला कांदा जाळू टाकला आहे. आजचा दिवस काळा दिवस आहे. शेतकरी जगला काय आणि मेला काय सरकारला देणे-घेणे नाही, अशा भावना मतुलठान येथील शेतकरी कृष्णा डोंगरे यांनी व्यक्त केल्या.

दरम्यान सरकारने कांद्याचा हमीभाव, निर्यात धोरण बदलावे ही मागणी घेऊन अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी संघटना आणि शेतकरी विकास मंडळाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टामार्फत कांदे भेट म्हणून पाठवले आहेत. दरम्यान गळ्यात कांद्याच्या माळा घालून शेतकऱ्यांनी निदर्शने केली आहे. सोबतच जर शासनाला कांद्याला भाव देता येत नसेल ते शेतकऱ्यांना रोटाव्हेटर घेण्यासाठी अनुदान द्यावं अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. दरम्यान परिस्थिती एवढी गंभीर झाली आहे की, शेतकऱ्याला एक रुपयापासून सहा रुपयांपर्यंत कांदा विकावा लागत आहे.

सरकारच्या निषेधार्थ बळीराजाने केली कांद्याची होळी..!
फोटो सौजन्न-गुगल : नगरमधील शेतकऱ्यांनी पंतप्रधान मोदींना पोस्टाद्वारे कांदे भेट म्हणून पाठवले

हे सुद्धा वाचा :

विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचा राडा; कांदा-लसणाच्या माळा घालून केलं आंदोलन

संतापजनक: १० पोती कांद्याच्या बदल्यात शेतकऱ्याला फक्त २ रुपयांचा चेक!

स्वयंपाकाचा गॅस 50 रुपयांनी वाढला, महागाईचा भडका

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी