मा. सुधीर भाऊ मुनगंटीवार
जय श्रीराम
आठ वर्षे झाली. मे महिना आला, की मला आपल्या एका आश्वासक विधानाची, घोषणेची आठवण अस्वस्थ करते. सरकार कुणाचेही असो, माफियांचा यंत्रणेवरील प्रभाव वेदना देतो. बघा अजूनही काही करता येईल. गोवा, सिक्कीम, मिझोराम अशा काही परराज्यातील ऑनलाईन लॉटरी महाराष्ट्रात चालविणाऱ्या कंपन्यांनी राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला आहे. यात माध्यम व राजकारणी घराण्यातील काही बडेही आहेत. युतीच्या आधी आघाडीचे अर्थमंत्री होते, ते असतानाही हा लुटीचा खेळ सुरू होता. तुमचे सरकार आल्यावरही तो ‘चालूच’ होता. अधिक खोलात गेलो तेव्हा हे सर्रास फसवणुकीचे तंत्र कळू लागले.
सूर्योदय ते रात्री उशिरापर्यंत गुड मॉर्निंग ते गुड नाईट नावाने अर्धा अर्धा तासाला या लॉटरीच्या सोडती जाहीर होतात. घरुन कामावर निघालेला दिवसभर घामाची कमाई या माफियांच्या घशात घालून कामावर गैरहजेरी लावून घरी येतो. अनेकांनी घर, नोकऱ्या गमावल्या. काही संसार उद्ध्वस्त झाले काहींनी जीवही गमावले. राज्यभरातील सर्व विक्रेत्यांचे व कंपनीच्या सोडतीचे संगणक लॉटरी संचालनालयाच्या सर्वरला जोडणे बंधनकारक होते. ते कधीच झाले नाही. विदारक आहे हे.
भाऊ, आपण अर्थमंत्री झाल्यावर काही घडेल, या आशेने काहींनी या प्रश्नी आपल्याकडे दाद मागितली. मराठीतील आघाडीच्या दैनिकांत काम करताना मी काही बातम्या प्रसिद्ध करुन हा गोरखधंदा उजेडात आणला. लॉटरी चालक व ग्राहकांचे हित लक्षात घेऊन मराठवाडा लॉटरी चालक संघटनेचे अध्यक्ष गणेश म्हैसमाळे यांनी अर्ज, विनंत्या, माहिती अधिकार या मार्गाने पाठपुरावा केला.
योगायोगाने आपण आठ वर्षांपूर्वी २०१५ मध्ये छत्रपती संभाजी नगर / औरंगाबाद/ खडकी / देवगिरी जिल्हा.. ( काहीही म्हणा पण प्रश्न सोडवा.) या शहरातील एका दैनिकाच्या कार्यालयात आला होतात. संपादकीय सहकाऱ्यांशी संवादात आपल्या समोर या घोटाळ्याची माहिती, काही पुरावे ठेवले. बातम्यांची कात्रणे सादर केली. तेव्हा आपण म्हणाला होतात, की चौकशी करून बुडवलेला कर वसूल करण्यात येईल, दोषींवर कारवाई करण्यात येईल. गुन्हे दाखल करू. बहुतेक तो २०१५ मधील मे महिना होता. आपल्या बातमीची दखल घेतली गेली याचा आनंद होता. कोट्यवधीची बुडवलेली रक्कम सरकारी तिजोरीत जमा होईल, नागरिक, ग्राहकांची फसवणूक थांबेल या आशेने ही बातमी ठळक, हेडलाईन प्रसिद्ध केली. नंतर आपल्याकडे पाठपुरावा केला. चौकशी झाली की नाही, ते करोडो रुपये सरकारी तिजोरीत जमा झाले की नाही, ते काही आठ वर्षे कळले नाही.
हे सुद्धा वाचा
शहा यांनी गोंजारताच अजित पवार लागले कामाला; एकाच दिवसात घेतल्या दोन मॅरेथॉन बैठका
राज्यात लवकरच पाळणाघरे; नोकरदार, कामानिमित्त बाहेर असणाऱ्या पालकांची चिंता मिटणार!
इंडिया आघाडी बैठकीच्या तयारीसाठी नेत्यांची लगबग वाढली; ग्रँड हयातला भेट देऊन केली पाहणी
भाऊ, अर्थमंत्री नसलात तरी आजही आपण मंत्रिमंडळात आहात. आजही आपण ती लूट परत आणू शकता.
ता. क. या लॉटरी चालवणाऱ्या कंपन्यांनी एक एनजीओ स्थापन केली आहे. ‘ सहानुभूती’ अर्थाचे नाव असलेल्या या एनजीओने नेते, मंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त, विशेष दिनानिमित्त आरोग्य शिबिरे, मोफत काही गोष्टींचे वाटप केले. सगळेच ‘लाभार्थी’ या सहानुभूतीने खुश झाले. आपला कारवाईचा इशारा बातमी म्हणून प्रसिद्ध होताच या एनजीओने मलाही सहानुभूतीची गरज आहे का, असे प्रेमाने विचारले. मी नम्र नकार देताच, चौकशी, कारवाई विसरून जा, असा सल्ला त्यांनी मला दिला. पाउण तपानंतर त्यात काही अर्थ होता हे कळले.
ताजाकलम ……..
अर्थमंत्री असताना आपल्या नावाने व सहीने व्हायरल झालेल्या त्या बनावट पत्राचे गुढ अजून सुटलेच नाही का? औरंगाबाद पोलिसांनी काय कारवाई केली, तेही कळले नाही.
कळावे लोभ असावा.
आपलाच अपेक्षार्थी
देवेंद्र इनामदार