29 C
Mumbai
Saturday, April 20, 2024
Homeमहाराष्ट्रJaykumar Gore : जयकुमार गोरे होणार जलसंपदा खात्याचे मंत्री!

Jaykumar Gore : जयकुमार गोरे होणार जलसंपदा खात्याचे मंत्री!

जयकुमार गोरे ही व्यक्ती किती गुणउधळी आहे, याची माण – खटाव तालुक्याला ओळख आहे. परंतु ही ओळख महाराष्ट्राला सुद्धा होणे गरजेचे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपद द्यायलाच हवे. मंत्रीपद दिले की, सभ्य लोकांना वटणीवर आणण्याचा परवाना गोरे यांना मिळेल.

भाजपचे वादग्रस्त आमदार जयकुमार गोरे यांना दणकट खाते मिळणार आहे. त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागणार असून जलसंपदा हे खाते मिळणार आहे. गोरे यांना हे खाते देण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः उत्सुक आहेत. फडणवीस यांनी गोरे यांना तसा शब्दही दिला असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘लय भारी’ला दिली. राज्यात भाजपप्रणीत एकनाथ शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर जयकुमार गोरे यांनी आपल्या माण या मतदारसंघात हैदोस घालायला सुरूवात केली आहे. भविष्यात जर गोरे यांना जलसंपदा खाते मिळाले तर मतदारसंघातील राजकीय विरोधक, सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते, उच्च विद्याविभूषीत मंडळी यांच्या विरोधात उत्तम प्रकारे सूड उगविण्यासाठी ते आणखी जोमाने कामाला लागतील.

जयकुमार गोरे यांना जलसंपदासारखे बलदंड खाते मिळाल्यानंतर राज्याचे काय भले होईल माहित नाही. परंतु माण – खटाव मतदारसंघातील गावावरून ओवाळून टाकलेल्या उडाणटप्पूंना मात्र मोकळे रान मिळेल. सरळमार्गी व लोकहिताची कामे करणाऱ्या एकेकाचा काटा काढण्यासाठी जयकुमार गोरे आणि त्यांची गॅंग कामाला लागेल. अशी कामे करण्यासाठी जयकुमार गोरे यांच्या हातात आतापर्यंत फक्त आमदारकीच होती. मंत्रीपद मिळाल्यानंतर महसूल व पोलीस यंत्रणेला स्वतःच्या तालावर नाचवता येईल. गावगुंड, वाळू माफिया यांना पोलीस व महसूल खात्याचे इमाने इतबारे संरक्षण देता येईल.

जयकुमार गोरे यांच्या हातून असे महत्कार्य आणखी वाढीस लागावे यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी गोरे यांना लवकर मंत्रीपद द्यायला हवे, अशी तमाम माण व खटावमधील टोळभैरवांची इच्छा आहे. राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर जयकुमार गोरे यांनी पहिला दणका तहसिलदारांना दिला. जयकुमार गोरे यांच्या खास मर्जीतील वाळू चोर, ताटखालचे मांजर झालेले तलाठी यांना गुडघ्यावर आणणाऱ्या तहसिलदारांचे निलंबन करून घेतले.

हे सुद्धा वाचा…

Moonlighting And Market: कर्मचाऱ्याने एकाच वेळी दोन संस्थांमध्ये काम करणे हे नैतिकतेला धरून नाही

Maharashtra project : महाराष्ट्राचा दुसरा प्रकल्प गुजरातने पळवला !

Eknath Shinde : शिवडी-न्हावाशेवा सागरी मार्ग लवकर मार्गस्थ होणार, एकनाथ शिंदेंची घोषणा

माण – खटावमध्ये ‘बंगळुरू – मुंबई कॉरिडॉर औद्योगिक प्रकल्पा’चा मुद्दा जोरदार तापलेला आहे. ‘महाविकास आघाडी सरकार’च्या काळात माजी IAS अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी हा प्रकल्प मंजूर करून आणला होता. तब्बल २ लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक क्षमता असलेल्या या प्रकल्पाचा माणदेशी जनतेसाठी मोठा फायदा होणार होता. परंतु हा प्रकल्प रामराजे नाईक – निंबाळकर व महेश शिंदे या दोन नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या मदतीने पळवून नेला. त्यामुळे सध्या माणदेशी जनता खवळून उठलेली आहे.

राज्यात नवे सरकार आल्यानंतर एकेकाला टिपून त्यांचे काटे काढण्यात व्यस्त असलेल्या जयकुमार गोरेंना हे माहितच नव्हते. अशातच खोट्या स्वाक्षरी करून मयत झालेल्या दलित व्यक्तीची जमीन हडपल्याने जयकुमार गोरे यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे ते बराच काळ फरार झाले होते. ज्यावेळी आमदार जयकुमार गोरे ‘लंपास’ झाले होते, त्यावेळी माणदेशी जनतेमध्ये मात्र औद्योगिक प्रकल्पावरून चळवळ आकार घेत होती. जनतेमधून नव्या सरकारबद्दल रोष वाढू लागल्यानंतर जयकुमार गोरे यांना औद्योगिक प्रकल्पाचे महत्व लक्षात आले. हा प्रकल्प परत मिळावा यासाठी आता ते एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागले आहेत.

उच्च विद्याविभूषीत लोकांविषयी गोरे यांना आकस

माणदेश हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. माण – खटाव या दोन्ही तालुक्यांमध्ये रोजगाराच्या व रोजीरोटीच्या संधी कमी आहेत. त्यामुळे येथील तरूण वर्ग परिस्थितीशी चिकाटीने झुंज देतो. या तालुक्यांमधील अनेक रत्ने मुंबई व अगदी जगभरात विखुरलेली आहेत. सनदी सेवेमध्ये, महाराष्ट्र नागरी सेवेमध्ये मोठ्या संख्येने अधिकारी आहेत. देशात व परदेशात उद्योजक आहेत. देशपातळीवर संशोधन क्षेत्रात नामवंत मंडळी कार्यरत आहेत. आपल्याच मातीतील अशा लोकांबद्दल जयकुमार गोरे यांना प्रचंड आकस आहे.

गावकऱ्यांनी अशा सुपुत्राचा सत्कार जरी केला तरी जयकुमार गोरे यांचे पित्त खवळते. गावा गावांमध्ये उडाणटप्पू व बिनडोक लोकांचेच वर्चस्व राहिले पाहीजे. हुशार व अभ्यासू मंडळी गावांमध्ये आली तर आपले राजकारण धोक्यात येईल, अशी अत्यंत कोती मनोवृत्ती जयकुमार गोरे यांची आहे. त्यामुळे माण – खटाव मतदारसंघातील कोणताही सभ्य, सुसंस्कृत व स्वाभिमानी माणूस जयकुमार गोरे यांच्या जवळपास सुद्धा फिरकत नाही.

जयकुमार गोरेंना मंत्रीपद द्यायलाच हवे

जयकुमार गोरे ही व्यक्ती किती गुणउधळी आहे, याची माण – खटाव तालुक्याला ओळख आहे. परंतु ही ओळख महाराष्ट्राला सुद्धा होणे गरजेचे आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना मंत्रीपद द्यायलाच हवे. मंत्रीपद दिले की, सभ्य लोकांना वटणीवर आणण्याचा परवाना गोरे यांना मिळेल. माण – खटाव तालुक्यांतील उडाणटप्पू, गोरे यांचे बगलबच्चे यांची सुद्धा हीच इच्छा आहे. त्यामुळे फडणवीस यांनी गोरे यांच्यासाठी खास नरेंद्र मोदी व अमित शाह यांच्याकडे आग्रही शिफारस करून मंत्रीपद मिळवून द्यायला हवे, अशी भावना व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी