कुणबी जोडो अभियानातून रायगडमध्ये कुणबी समाज एकटवला आहे. (Kunbi Jodo Abhiyan) स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 75 वर्षे होऊनही कोकणातील कुणबी समाज उपेक्षितच आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित मागण्यांच्या पाठपुराव्यासाठी तसेच समाज संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने आता कुणबी जोडो अभियानाला सुरुवात झाली आहे. महाड तालुक्यात काल हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकत्र आले.
डिसेंबर 2022 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यातून कोकणातील कुणबी जोडो अभियानाची सुरुवात झाली आहे. मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघ या शतकोत्तरी वाटचाल केलेल्या मातृसंस्थेच्या वतीने, 8 जानेवारी रोजी महाड पोलादपूर तालुक्यातील बारा ते पंधरा हजार कुणबी समाजबांधव एकत्र आले होते. महाड तालुक्यातील पाचाड गावी राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्यास अभिवादन करून रॅली काढली गेली. लोकनेते माजी आमदार स्व. शांताराम फिलसे यांच्या जन्मभूमी चिंभावे गावी तालुकास्तरीय कुणबी जोडो अभियान रॅलीचा समारोप झाला.
कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली, कुणबी राजकीय संघटन समिती अध्यक्ष अशोक वालम यांच्या प्रयत्नातून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, मुंबई नवी मुंबई, मुंबई उपनगर क्षेत्रात कुणबी जोडो अभियान राबविले जात आहे. महाड-पोलादपूर तालुकाध्यक्ष अनंत गवळकर यांच्या पुढाकाराने 8 जानेवारी रोजी तालुक्यातील 9 गट आणि हजारोंच्या संख्येने कुणबी समाज बांधव-भगिनी अभियानात सहभागी झाले. कुणबी समाजोन्नती मंडळ महाड-पोलादपूर मध्यवर्ती अध्यक्ष प्रदीप लोखंडे, सरचिटणीस प्रकाश तरळ, कोषाध्यक्ष संभाजी काजरेकर, कुणबी युवा संघाचे सहसचिव मिलिंद चिबडे आदींनी या अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

कुणबी समाजोन्नती संघातर्फे रायगड़ ज़िल्ह्यातील सर्व तालुका शाखांच्या कुणबी जोडो अभियानाचा कार्यक्रम 15 जानेवारीपर्यंत सुरू राहणार आहे. पुढील कार्यक्रम असा : 10 जानेवारी – म्हसळा, 11 जानेवारी – श्रीवर्धन, 12 जानेवारी – तळा, 13 जानेवारी – रोहा, 14 जानेवारी – मुरुड, अलिबाग, 15 जानेवारी – पेण, उरण, कर्जत, खालापूर, पाली आणि संध्याकाळी पनवेल येथे समारोप.
हे सुद्धा वाचा :
छत्रपती शिवाजी महाराज कुणबी समाजाचे; नाना पटोले यांचे वक्तव्य
सारथी संस्थेच्या उभारणीसाठी नवी मुंबई खारघर येथील भूखंड देण्याचा मुख्यमंत्र्याचा निर्णय
संभाजी महाराजांना दुर्लक्षित करणाऱ्या कालनिर्णयला उशिराने सुचले शहाणपण !