महाराष्ट्रातील सर्वात भयंकर नैसर्गिक आपत्ती म्हणून आजही लातूर जिल्ह्यातील किल्लारी भूकंपाचं नाव घेतलं जातं. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या ९ हजार ७४८ लोकांचा बळी गेला. काही समजण्याच्या आतच जमीन फुटून हजारो लोक मृत्यूच्या कुशीत कायमचे झोपले तर ३० हजाराहून अधिक जण जखमी झाले. या भयावह भूकंपाच्या खुणा आजही लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील लोकांच्या मनावर कोरलेल्या आहेत. जमीन खचल्यानं एक लाखाहून अधिक जणांना बेघर व्हावं लागलं. समस्त लातूरकरांना आजही ३० सप्टेंबर ही तारीखही कानावर पडली तरीही काळजाचा ठोका चुकतो. ३० सप्टेंबर १९९३ ची ती पहाट. गणेशोत्सव विसर्जनाचा दिवस. मात्र समस्त भारतीयांची पहाट एका हृदयद्रावक बातमीनं झाली.
तब्बल ५२ गावांना बेचिराख करणाऱ्या लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात याच दिवशी तीस वर्षांपूर्वी अतितीव्र भूकंपाचा धक्का बसला. अन् क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं. मध्यरात्री तीनच्या सुमारास लातूर आणि उस्मानाबाद जिल्ह्यात ६.२ मेग्नीट्यूटचा भूकंपाचा धक्का बसला. लातूरमधील किल्लारी भूकंपाचं केंद्रस्थान होतं. या भूकंपाचा फटका राज्यातील अकरा जिल्ह्यांना बसला, परिणामी अकराशे कोटी रुपयाच्या मालमत्तेचे नुकसान झाले.१३ जिल्ह्यांतील २ लाख ११ हजार घरांना तडे गेले. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा व लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यांना भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला.
३० वर्षांपूर्वीच्या या घटनेनं ५२ गावांचं नकाशातून अस्तित्वच मिटवलं. या भूकंपानंतर समोर आलेल्या छायाचित्रांनी संपूर्ण जगाचं या ५२ गावांकडे लक्ष वेधलं. जगभरातून मदतीचा ओघ सुरु झाला. किल्लारी भूकंपाच्या वेळेस ज्येष्ठ राजकीय नेते शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. भूकंपाची माहिती मिळताच ते तत्काळ किल्लारी येथे दाखल झाले. ५२ पीडित गावातील लोकांच्या मदतीसाठी त्यांनी सर्वतोपरी मदत केली. अनेक वेळेस ते जाऊन आले आहेत. अनेक लोकांचा थेट शरद पवार यांच्याशी संपर्क आजही आहे. एवढ्या मोठया संख्येने पुनर्वसन करण्याचा देशातील या पहिल्या प्रकल्पाला सर्व यंत्रणा कामाला लागल्या.
हे ही वाचा
बाबासाहेबांना छळणारे हिंदू, पारसी माफी मागतील का – जितेंद्र आव्हाड यांचा सवाल
यंदा शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार?
…तर गालावर वळ उठतील, राज ठाकरेंचा इशारा, जव्हारमध्येही परप्रांतीयाची मुजोरी
५२ गावांचे स्थालांतर आणि पुर्नवसन करणं केंद्र आणि राज्य सरकारसाठी मोठं आव्हान होतं. २३ हजार नवीन घरं बांधणं , तीस हजाराच्या आसपास आहेत त्या जागीच घर दुरुस्त करणं किंवा नव्यानं बांधून देणं, विविध संस्था आणि देणगीदार यांच्या सहकार्यातून साडेपाच हजार घरं बांधून घेणं तसेच १३ जिल्ह्यातील अडीच हजार गावातील दोन लाखांपेक्षा जास्त घरांची दुरुस्ती करणं इत्यादी कामं सरकारी यंत्रणांनी हाती घेतली. मराठवाड्यातील या भयाववह भूकंपनंतर स्थानिकांचे पुनर्वसन झाले खरे परंतु आजही अनेक उणिवा राहिल्या आहेत. अनेकांच्या मनावरील भूकंपाची जखम आजही ताजी आहे.