विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे गुरूवारी (27 ऑक्टोबर) नाशिक आणि पुणे दौऱ्यावर येत आहेत. नाशिक आणि पुणे जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांची पाहणी करून ते शेतकऱ्यांशी संवाद देखील साधणार आहेत. तसेच पुणे जिल्ह्यातील वडगाव (ता. जुन्नर) येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांची देखील ते भेट घेणार आहेत.
राज्यात यंदा अतिवृष्टीने खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झाले, त्यातून जी काही पिके वाचली त्या पिकांचे आता परतीच्या पावसामुळे मोठे नुकसान झाले असून यंदा शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या बाधित झालेल्या पिकांसाठी सरकारने अनुदान द्यावे, पीक विम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळावेत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सध्या आक्रमक झाली आहे. नुकताच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली, तसेच तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर उस्मानाबादमध्ये देखील कालपरवा आमदार कैलास पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषण केले. शेतकऱ्यांना अनुदान मिळावे, पीक विम्याचे पैसे मिळावेत, नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे व्हावेत अशा अनेक मागण्यांसाठी सध्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकऱे) आक्रमक झाली आहे.
हे सुद्धा वाचा :
Siddhu Moose Wala Murder Case : सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणात जोडले गेले प्रसिद्ध गायिकेचे नाव
IPS : आयपीएस रश्मी शुक्ला यांच्यासाठी आता दिल्लीतून हालचाली?; वाचा काय आहे कारण…
दरम्यान उद्या विधानपरिषद विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे नाशिक आणि पुणे जिल्ह्याचा दौरा करणार असून, अतिवृष्टीने बाधित झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत. तसेच ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडीअडचणी देखील समजून घेणार आहेत. अंबादास दानवे उद्या सकाळी मुंबईहून नाशिककडे निघणार असून नाशिक जिल्ह्यातील सोनारी (ता. सिन्नर) येथे अतिवृष्टीमुळे बाधित, नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करणार आहेत. त्यानंतर ते पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यातील वडगाव, आळेफाटा येथे येणार असून वडगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकऱी दशरथ केदार यांच्या कुटुंबियांची भेट घेणार आहेत. त्यानंतर शिरूर तालुक्यातील मलठण येथील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करणार असून येथे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर शिरूर तालुक्यातील वाबळे, वरुडे या गावांतील शेतकऱ्यांच्या बाधित, नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करुन ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.