29 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात मद्यविक्री वाढली; सरकारच्या तिजोरीत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा

राज्यात मद्यविक्री वाढली; सरकारच्या तिजोरीत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा

राज्यातील मद्यपींकडून मद्याच्या खरेदीत वाढ झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कमाई वाढली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात नोव्हेंबर अखेरीपर्यंत ३२.८६ टक्के वाढ झाली आहे.

राज्यातील मद्यविक्रीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे सरकारच्या तिजोरीत भर पडली आहे. राज्यातील मद्यपींकडून मद्याच्या खरेदीत वाढ झाल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाची कमाई वाढली आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात नोव्हेंबर अखेरीपर्यंत ३२.८६ टक्के वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात नोव्हेंबर अखेरपर्यंत १२ हजार ९५२.८२ कोटी रूपयांचा महसूल जमा झाला आहे.

विभागाने सन 2021-22 च्या एप्रिल ते नोव्हेंबर अखेरपर्यंत 9748.96 कोटी रूपयांचा महसूल जमा केला होता. सन 2021-22 च्या तुलनेत यावर्षी महसूलात 32.86 टक्के वाढ झाली आहे. राज्यात एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022 या कालावधीत 34 हजार 164 गुन्हे नोंदवण्यात आले. त्यामध्ये 28 हजार 66 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 106.15 कोटी रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, विभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर व नुकतेच निवृत्त झालेले उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमाप यांच्या मार्गदर्शनाखाली विभागाने केली आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे राज्यात मद्य निर्मिती, घाऊक विक्री, किरकोळ विक्री, अनुज्ञप्त्या देणे व त्यांची तपासणी करुन नियमन करणे, मद्यावरील कर गोळा करणे आदी कामे केली जातात. तसेच राज्यातील अवैध मद्य निर्मिती विक्री, वाहतूक, बनावट मद्य, परराज्यातून होणारी अवैध मद्याची तस्करी इ. विरुध्द सज्ज राहून महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 अन्वये फौजदारी गुन्हे दाखल करुन त्याचे उच्चाटन व नियंत्रणाचे कामकाज केले जाते. परवानगी नसताना मद्य विक्री करणाऱ्यांविरोधात विभागातर्फे कारवाई केली जाते.

हे सुध्दा वाचा

युट्यूबवरच्या अश्लील जाहिरातीमुळे नापास झालो, आता ७५ लाख रुपये द्या, भरपाईची मागणी करणाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठावला दंड

सामाजिक न्याय विभागात लबाडीला ऊत; 100 रुपयांच्या कवितेचे पुस्तक 684 रुपयात, तरतूद नसताना 36 कोटींची खरेदी!

IAS भाग्यश्री बानायत यांची नाशिक अतिरिक्त विभागीय आयुक्तपदी नियुक्ती

अवैध मद्यनिर्मिती, वाहतूक व विक्री विरुद्ध तक्रार स्वीकारण्याकरिता राज्य उत्पादन शुल्क विभागाचा नियंत्रण कक्ष 24 तास कार्यरत असून तक्रारदार तक्रार नोंदवू शकतात. तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येते. नागरिक तक्रार नोंदविण्यासाठी 18002339999 हा टोल फ्री क्रमांक, 022-22660152 या दूरध्वनी क्रमांकावर अथवा 8422001133 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर संपर्क साधू शकतील.

त्याचप्रमाणे [email protected] या ईमेलवर संपर्क करुन तक्रार किंवा माहिती देता येईल, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिली आहे. जर कुणाला अनधिकृत मद्य निर्मिती, मद्य विक्री व इतर बाबींची माहिती द्यायची असेल तर या ठिकाणी माहिती द्यावी, असे आवाहन उत्पादन शुल्क विभागाने केले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी