32 C
Mumbai
Tuesday, November 14, 2023
घरमहाराष्ट्रविधान परिषद गाठणार शंभरी! आजी माजी सदस्यांसाठी होणार खास कार्यक्रम

विधान परिषद गाठणार शंभरी! आजी माजी सदस्यांसाठी होणार खास कार्यक्रम

महाराष्ट्र विधान परिषदेचे शतक महोत्सवी वर्ष पूर्ण होणार असून त्यासाठी आयोजित कार्यक्रमांसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. विधानपरिषदेच्या विद्यमान सदस्य आणि माजी सदस्यांसाठी शतक महोत्सवी वर्षानिमित्त स्नेहमेळावा आणि परिसंवाद आयोजित करण्यात येणार आहे. यानिमित्तानेच, महाराष्ट्र विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक पार पडली असून या बैठकीत विधानपरिषदेतील गटनेते आणि सदस्य उपस्थित होते. यावेळी, विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमातील स्नेहमेळावा आणि परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्ऱ्यांच्या उपस्थितीत करण्याचे निश्चित करण्यात आले. याशिवाय, विधानपरिषदेतील गेल्या शंभर वर्षातील महत्वाच्या घटनांसंबंधित पाच खास ग्रंथदेखील उपलब्ध होणार असल्याचे या बैठकीतून निष्पन्न झाले आहे.

विधानपरिषद शतक महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या या बैठकीत प्रकाशित करण्यात येणाऱ्या संदर्भसमृद्ध ग्रंथांच्या कामाचा आढावा यावेळी घेण्यात आला. विधानपरिषद सभागृहाचे महत्व आणि वैशिष्ट्य, विधानपरिषदेतील मागील शंभर वर्षातील महत्वपूर्ण विधेयके आणि ठराव, महत्वाच्या प्रश्नांवर आणि विषयांवर विधानपरिषदेमध्ये झालेल्या चर्चा, शंभर वर्षे शंभर भाषणे आणि छायाचित्रांचे संकलन असलेले कॉफी टेबल बुक अशी पाच पुस्तके प्रकाशने प्रस्तावित असून त्यात कोणकोणते महत्वाचे संदर्भ समाविष्ट करण्यात यावेत यावर उपस्थित मान्यवरांनी महत्वपूर्ण सूचना या बैठकीत केल्या.


यावेळी, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी एक विशेष आवाहन केले आहे. प्रकाशित करण्यात येणाऱ्या पुस्तकांबद्दल तसेच परिसंवाद कार्यक्रमाबद्दल ज्येष्ठ विद्यमान आणि माजी सदस्य, ज्येष्ठ पत्रकार, राजकीय अभ्यासक यांना काही सूचना करावयाच्या असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात आपले मत विधानमंडळाकडे अवश्य कळवावे असे आवाहन त्यांनी केले आहे.

‘हा परिसंवाद आणि स्नेहमेळावा सर्वांनी मिळून यशस्वी करावा आणि ज्येष्ठांचे सभागृह असा लौकिक प्राप्त झालेल्या विधानपरिषदेच्या शतक महोत्सव सुवर्णक्षणांचे साक्षीदार व्हावे,’ असे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

याबैठकीस माजी मंत्री आणि सदस्य ऍड. विधानपरिषद सदस्य अनिल परब, विधानपरिषद सदस्य कपिल पाटील, विधानपरिषद सदस्य सत्यजित तांबे, विधानमंडळ सचिवलायचे सचिव विलास आठवले आणि इतर सदस्य उपस्थित होते.

हे ही वाचा 

दीपक केसरकर यांनी थाटले मुंबई महापालिकेत कार्यालय !

हसन मुश्रीफ, तानाजी सावंत यांचा राजीनामा घेण्याची कॉँग्रेस शिष्टमंडळाची राज्यपालांना विनंती

पीक विमा भरपाई करा नाहीतर… कृषिमंत्री धनंजय मुंडेंनी दिला सूचक इशारा

जुलै १९३७ मध्ये मुंबई कायदेमंडळाचे विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन सभागृहे अस्तित्वात आली. स्वातंत्र्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर घटनेतील तरतुदींच्या अनुषंगाने १९५६ मध्ये भाषावार प्रांतरचनेनुसार द्वैभाषिक मुंबई राज्य विधानमंडळ अस्तित्वात आले. पुढे १ मे १९६० रोजी ‘महाराष्ट्र राज्य स्थापन झाल्यानंतर ‘महाराष्ट्र विधानमंडळ’ अस्तित्वात आले.

राज्यात विधानपरिषदेला वरिष्ठ सभागृह (Upper House) तर विधानसभेला खालचे सभागृह (Lower House) असे म्हंटले जाते. विधान सभेमध्ये थेट सार्वत्रिक मतदानाद्वारे निवडून येणारे २८८ आणि एक अँग्लो-इंडियन प्रतिनिधी अशी एकूण २८९ इतकी सदस्य संख्या आहे. विधान परिषदेच्या सदस्यांची संख्या ७८ इतकी असून राज्याच्या विविध विभागातून शिक्षक पदवीधर, स्थानिक प्राधिकारी संस्था, विधानसभा सदस्य आणि राज्यपालांकडून विधान परिषदेसाठी राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक, कला, साहित्य, सांस्कृतिक व क्रीडा या क्षेत्रामधून निवडण्यात आलेले सदस्य यांचा समावेश असतो.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी