36 C
Mumbai
Monday, November 13, 2023
घरमहाराष्ट्रजरांगे-पाटील आज महाविराट सभेत कोणता निर्णय घेणार?

जरांगे-पाटील आज महाविराट सभेत कोणता निर्णय घेणार?

मराठा आरक्षणासाठी मराठा समाजाला मनोज जरांगे-पाटील हा नव्या दमाचा रांगडा नेता लाभला आहे. याच जरांगे-पाटील यांची आज महाविराट सभा आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली गावात जरांगे-पाटील यांची ही सभा आहे. जरांगे-पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला 40 दिवसांची दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत 24 ऑक्टोबर रोजी संपणार आहे. तोपर्यंत सरकारने मराठा आरक्षणबाबत सकारात्मक कार्यवाही न केल्यास कोणता निर्णय घेणार, याबाबत महत्त्वाची घोषणा जरांगे-पाटील या महाविराट सभेत करण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध ठिकाणी मराठा आरक्षणासाठी जाहीर सभा घेतल्यानंतर जरांगे-पाटील यांची अंतरवाली सराटी गावात ही सभा होणार आहे. या सभेला लाखोंच्या संख्येने मराठा समाज बांधव येणार असल्याने जंगी तयारी करण्यात आली आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी गावात 29 ऑगस्टपासून उपोषण सुरू केले होते. पण 1 सप्टेंबर रोजी पोलिसांनी उपोषणकर्त्यांवर लाठीमार केला. या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्राला अंतरवाली सराटी या गावाची ओळख झाली. तर मनोज जरांगे-पाटील नावाचा कार्यकर्ता मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाला बसल्याचेही कळले. लाठीमारानंतर जरांगे-पाटील एकदम प्रकाशझोतात आले. आणि मराठा आरक्षण मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.


अखेर त्यांच्या उपोषणाची दखल मुख्यमंत्र्यांना घ्यावी लागली आणि 14 सप्टेंबरला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत जरांगे-पाटील यांनी उपोषण मागे घेतले मात्र आंदोलन सुरूच ठेवले. मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्र्यांनी एक महिन्याची मुदत मागितली. जरांगेंनी त्यात आणखी 10 दिवस वाढवून दिले आणि एकूण 40 दिवसांची सरकारला मुदत दिली. मराठा समाजाला ओबीसींमधून आरक्षण मिळावे आणि मराठ्यांना सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र द्यावे, अशी जरांगे-पाटील यांची आग्रही मागणी आहे.

हे ही वाचा 

मराठ्यांच्या मराठवाड्यातील महाविराट सभेत काय घडणार?

राज ठाकरेंच्या निवासस्थानी निर्णय घेणे ही सरकारची घटनाबाह्य कृती, अतुल लोंढे यांचा आरोप

मेट्रो कारडेपो कांजूरमार्गमध्येच, मग आम्हाला विरोध का केला? आदित्य ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांना सवाल

उपोषण मागे घेतल्यानंतर जरांगे-पाटील यांनी राज्यात सभा घेऊन शेवटची सभा अंतरवाली सराटी घेणार असल्याचे आधीच जाहीर केले होते. त्याप्रमाणे आज ही सभा होत आहे. तब्बल 160 एकर जागेवर ही सभा होत असून राज्यभरातील मराठा समाज या निमित्ताने एकवटणार आहे.

मराठा आरक्षण देण्यासाठी सरकारला दिलेली मुदत आणखी 10 दिवसांत म्हणजे 24 ऑक्टोबरला संपणार, याचीच या सभेत सरकारला आठवण करून दिली जाणार आहे. तसेच राज्य सरकार मराठ्यांना आरक्षण देण्यास अपयशी ठरले किंवा पुन्हा काही चालढकल केली तर कोणती भूमिका घ्यावी, याबाबत जरांगे-पाटील निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरांगे-पाटील यांच्या सभेकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी