28 C
Mumbai
Saturday, August 6, 2022
घरमहाराष्ट्रनंदुरबारमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे लाखो रुपयांचे साहित्य भंगारात

नंदुरबारमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे लाखो रुपयांचे साहित्य भंगारात

टीम लय भारी

नंदुरबार : नंदुरबार जिह्याला दरवर्षी पावसाचा तडाखा बसतो. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने लाखो रुपयांचे आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य आणून ठेवले आहे. पण हे लाखो रुपयांचे साहित्य आता एका खोलीत धूळखात पडले आहे. त्यामुळे इतके मोलामहागाचे साहित्य नेमके आणले कशाला होते? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

नंदुरबार जिल्ह्यातून तापी आणि नर्मदा अशा दोन महत्वाच्या नद्या वाहतात. या नद्या मुसळधार पाऊस झाल्यानंतर धोक्याची पातळी सुद्धा ओलांडतात. त्यामुळे याचा फटका नदीकाठच्या गावांना अधिक बसतो. नदीकाठी गावे असणाऱ्या लोकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठीच जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचे हे साहित्य आणून ठेवण्यात आले आहे. याबाबतचे प्रशिक्षण सुद्धा या जिल्ह्यात असलेल्या गावातील लोकांना देण्यात आले आहे. पण ज्या लोकांना याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे, त्यांना त्यांच्या कामाचे वेतन मिळालेले नसल्याने त्यांनी सुद्धा हे काम करण्यास असमर्थता दर्शविली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापनेच्या या भोंगळ कारभारामुळे नागरिकांमध्ये देखील नाराजी पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांपासून आपत्ती व्यवस्थापनेचे हे साहित्य एका बंद खोलीत धूळखात पडले आहे. तापी नदीच्या किनारी असलेल्या प्रकाशा या गावात लाखो रुपयांचे आपत्ती व्यवस्थापनाचे सामान जिल्हा प्रशासनाकडून आणून ठेवण्यात आले आहे. यामध्ये लाईफ सेव्हिंग जॅकेट, बोटी आणि अत्याधुनिक बोटीचा समावेश आहे.

नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून राज्यात पावसाळ्यात येणाऱ्या आपत्तींबाबत जागरूक राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. परंतु जर लाखो रुपयांचे साहित्यचं काही कामाचे नसेल तर आपत्तीमध्ये मदत कशी करायची असा पण प्रश्न निर्माण होतो. या साहित्यामध्ये असलेली स्पीड बोट वर्षभरापासून बंद असल्याने खराब झाली होती. पण काही दिवसांपूर्वी ही बोट दुरुस्त करून आणण्यात आली. परंतु ही बोट चालू आहे कि बंद हे सुद्धा पाहण्यात आले नाही.

जिल्ह्यातील १२ जणांच्या टीमला पुण्यात नेऊन आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले होते. ही १२ जणांची टीम आपत्तीच्या काळात लोकांची मदत तर करतेच परंतु कधी कधी नद्यांमध्ये आत्महत्या करणाऱ्या लोकांचे मृतदेह शोधून ते बाहेर काढण्याचे पण काम करते. पण प्रशासनाचे हे काम करून सुद्धा त्या टीमला आपले वेतन मिळत नसल्याने या टीमने हे काम करण्यास देखील आता असमर्थता दर्शिविली आहे.

दरम्यान, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा आणि नवापूर तालुक्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पण या तालुक्यांमध्ये जिल्हा प्रशासनाचे हे साहित्य पोहोचू शकले नाही. तर ते आजही एका बंद खोलीत पडून असल्याने हे लाखो रुपयांचे सामान नेमक्या काय उपयोगाचे असे जनतेकडून विचारण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा :

‘लायकीपेक्षा जास्त बोलू नका’, निलेश राणे यांचा केसरकरांना सल्ला

मुख्यमंत्री कार्यालयातील सहसचिव अरुण बेळगुद्री यांचे निधन

VIDEO : बीएमसीच्या कोट्यावधी रुपयांच्या कामाची पावसाने दिली पोचपावती

संबंधित

सर्वात लोकप्रिय

व्हिडीओ गॅलरी

error: Content is protected !!