31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
Homeमहाराष्ट्रशिंदे सरकार झोपेत; मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर पडतोय दिल्लीचा हातोडा!

शिंदे सरकार झोपेत; मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर पडतोय दिल्लीचा हातोडा!

भारतातील आकाशवाणीच्या 400 हून अधिक केंद्रात वेगळा ठसा उमटवून असलेले आणि अनेकदा सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरविल्या गेलेल्या मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर सध्या दिल्लीचा हातोडा पडतोय. मराठी माणसाच्या हक्क, अस्मितेसाठी गदर वैगेरे गप्पा हाणणारे शिंदे सरकार मात्र झोपेत आहे. आकाशवाणी मुंबईचा पाचवा मजला रिकामा केला जात आहे. तिथे सध्या पाडकाम सुरू आहे. याच मजल्यावर प्रादेशिक वृत्तविभाग म्हणजेच आकाशवाणीच्या मराठी केंद्राचे कामकाज चालते. इथले सामान सध्या हलविले जात आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भेटीनंतर या सर्व घडामोडी सुरू झाल्या आहेत.

भारतातील आकाशवाणीच्या 400 हून अधिक केंद्रात वेगळा ठसा उमटवून असलेले आणि अनेकदा सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरविल्या गेलेल्या मुंबई आकाशवाणीच्या मराठी प्रादेशिक वृत्तविभागावर सध्या दिल्लीचा हातोडा पडतोय. (Mumbai Aakashwani) मराठी माणसाच्या हक्क, अस्मितेसाठी गदर वैगेरे गप्पा हाणणारे शिंदे सरकार मात्र झोपेत आहे. आकाशवाणी मुंबईचा पाचवा मजला रिकामा केला जात आहे. तिथे सध्या पाडकाम सुरू आहे. याच मजल्यावर प्रादेशिक वृत्तविभाग म्हणजेच आकाशवाणीच्या मराठी केंद्राचे कामकाज चालते. इथले सामान सध्या हलविले जात आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भेटीनंतर या सर्व घडामोडी सुरू झाल्या आहेत.

प्रसारभारतीतर्फे सर्वोत्कृष्ट केंद्र म्हणून गौरविले जाणारे मराठी अस्मितेचे केंद्र उद्ध्वस्त करण्याचे काम दिल्लीकडून सुरू आहे. मराठीची गळचेपी होऊ देणार नाही, म्हणून दिखाऊ गळे काढणारे दिल्लीच्या गळ्यात गळे घालून महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाचा सुवर्ण साक्षीदार असलेल्या संस्थेवर हातोडा पडत असताना तोंडाला कुलूप लावून बसलेले आहेत. राज्यातील शिंदे सरकारने यापूर्वीच राज्यातील अनेक संस्थांचा नजराणा दिल्लीश्वरांच्या आणि गुजरातच्या खिदमतीत पेश केला आहे. सीमाप्रश्नावर महाराष्ट्राला खुले आव्हान दिले जात असताना महाराष्ट्राचे कारभारी थंड आहेत. साधारणत: 100 वर्षांपूर्वी, 23 जुलै 2027 रोजी जिथून देशातील आकाशवाणीची मुहूर्तमेढ रोवली गेली, त्या मुंबई आकाशवाणीचाच गळा आता घोटला जात आहे. शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी दोन वर्षांपूर्वीच तत्कालीन माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र पाठवून मुंबई आकाशवाणीवरील मराठीची गळचेपी थांबविण्याची विनंती केली होती. पुणे प्रादेशिक विभागातील वृत्त संपादक आणि उपसंचालक ही दोन्ही पदेही यापूर्वी अशाच पद्धतीने अनुक्रमे कोलकाता आणि श्रीनगरला हलविली गेली. तेव्हाही पुण्याचे खासदार अनिल शिरोळे यांनी व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मराठी आकाशवाणीवर होत असलेला अन्याय थांबविण्याची विनंती केली होती. मनसेनेही तेव्हा मराठीच्या गळचेपीविरोधात निदर्शने केली होती. आता तर महाराष्ट्राचे मुख्यालय असलेल्या मुंबईतच मराठी बेदखल करण्याची तयारी सुरू झाली आहे.

केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर हे नुकतेच काही दिवसांपूर्वी दोन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी मुंबई आकाशवाणीला भेट दिली होती. या भेटीत बराच वेळ त्यांनी मराठीचे कामकाज चालणाऱ्या, पाचव्या मजल्यावरील प्रादेशिक वृत्त विभागाच्या पाहणीत घालवला होता. ठाकूर यांच्या या भेटीनंतर, आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे कामकाज ज्या पाचव्या मजल्यावर चालते तिथे वेगळ्याच हालचाली सुरू झाल्या. आता तर अचानक तिथला सगळा मजला रिकामा केला जात आहे. वृत्तविभागाच्या आसपास असलेल्या सगळ्या केबिन पाडून टाकण्यात आल्या आहेत. ठाकूर यांच्या भेटीनंतर जेमतेम महिनाभरात त्या केबिन भुईसपाट झाल्या आहेत. ठाकूर यांनीच मुंबई भेटीत पाचव्या मजल्यावर पाडकाम करण्याचे आदेश दिल्याचे चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. गेली 30 वर्षे मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाचे कामकाज जिथून चालते, तो संपूर्ण वृत्तविभागाचा सेटअपच हलवून अडगळीत कुठेतरी टाकण्याच्या सूचना दिल्या गेल्याचे सांगण्यात येत आहे

प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई AIR Mumbai 1
आकाशवाणी मुंबईच्या पाचव्या मजल्यावरील सर्व केबिन उखडून टाकल्या आहेत.
प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई AIR Mumbai 2
आकाशवाणीच्या ऐतिहासिक आणि गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या खिडक्याच उद्ध्वस्त केल्या जात आहेत.

आकाशवाणी मुंबईचा वृत्त विभाग हे आकाशवाणीच्या मराठी बातम्यांचे मुख्यालय आहे. एकेकाळी दर्जेदार बातम्या देणारा हा विभाग सध्या अनेक अडचणींनी ग्रस्त आहे. 2017 मधे हंगामी वृत्तनिवेदक आणि भाषांतरकारांनी केलेल्या मोठ्या संपापासून या वृत्तविभागाच्या अडचणींत वाढ झालेली आहे. त्यातच सध्याच्या घाडामोडी पाहता अख्खा विभाग रातोरात हलवला जाण्याची नामुष्की ओढवली जाण्याची चिन्हे दिसत आहेत. प्रादेशिक वृत्त विभागाचे कामकाज चालते तिथून स्टुडिओकडे जाणेही सोपे आहे. आता काही दिवसातच हा अख्खा सेट अप हलवून प्रादेशिक वृत्तविभागच पाचव्या मजल्यावरून हलवण्याची सूचना दिल्यानंतरही प्रादेशिक वृत्तविभागाच्या सहसंचालक श्रीमती सरस्वती कुवळेकर शांत आहेत. मुंबई आकाशवाणीच्या पाचव्या मजल्यावर पाडकाम आणि सामानाची हलवाहलव सुरू असूनही कायम किंवा हंगामी कर्मचाऱ्यांना कुठलीही कल्पना देण्यात आलेली नाही. ही मंडळी या सगळ्या घडामोडींनी कमालीची अस्वस्थ झाली आहे. या सर्वांना, “अब इधरसे जाने के लिये तय्यार हो जाओ,” असे तोंडी निरोप पोहोचवले जात आहेत. श्रीमती कुवळेकर हाताची घडी तोंडावर बोट घालून गप्प आहेत.

मुंबईतल्या आमदार निवासाच्या समोरच्या इमारतीत आकाशवाणी मुंबईचे 6 मजले आहेत. तिथे 1,200 हून अधिक कायम कर्मचारी, शिवाय शेकडो हंगामी कामगार आहेत. आकाशवाणी मुंबईच्या प्रोग्रामिंग विभागापेक्षा मुंबईच्या बातम्यांना सर्वाधिक श्रोतावर्ग आणि जाहिराती मिळत असल्याचे सांगितले जाते. अजूनही खाजगी रेडिओ वाहिन्यांना बातम्या प्रसारित करायची परवानगी सरकारने दिलेली नाही. त्यामुळेच रेडिओच्या बातम्या या फक्त आकाशवाणीच देते. अशा परिस्थितीत वृत्तविभागाला अधिकाधिक पायाभूत सुविधा देऊन मजबूत करण्याऐवजी मुंबईतूनच मराठी वृत्तविभागाला विस्थापित करण्याचे षडयंत्र आखले गेळे की काय, अशी शंका येण्यासारखी स्थिती आहे. कुणाला पूर्वकल्पना दिली गेली नाही, विश्वासात घेऊन सांगितले जात नाही, त्यामुळे अफवा आणि चर्चा यांना उत आला आहे. केंद्र सरकार पेडर रोडवरील फिल्म डिव्हीजनची जागा खासगी विकसकाला देणार असून तो विभाग आकाशवाणीच्या पाचव्या मजल्यावर आणणार आहे, असा काहींचा दावा आहे. काहींच्या मते सरकारी वृत्तविभागाची जागाच खाजगी विकासकांना भाड्याने देण्याची सरकारची योजना आहे. केंद्र सरकारच्या जवळच्या आणि खास मर्जीतील दोघा उद्योजकांचा पेडर रोडवरील फिल्म डिव्हीजन आणि मुंबई आकाशवाणीच्या जागेवर डोळा असल्याचे सांगितले जाते. हे दोघेही उद्योजक यापूर्वीच माध्यम क्षेत्रात उतरले आहेत. सरकारी संस्था कमकुवत करून सरकार मुंबईतील मध्यवर्ती जागा त्यांच्या घशात घालणार का, असा सवाल आकाशवाणी कर्मचारी उपस्थित करत आहेत.

प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई AIR Mumbai 3
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या भेटीनंतर आकाशवाणीच्या मराठी विभागवार हातोडा चालवला जात आहे.
प्रादेशिक वृत्त विभाग आकाशवाणी मुंबई AIR Mumbai 4
मराठी प्रादेशिक वृत्त विभागाला कुलूप घालण्यात आले असून आतील कॉम्प्युटर वैगेरे निम्मे अधिक सामान रातोरात हालविले गेळे आहे.

जागतिक मराठी अकादमीने यापूर्वीच प्रसारभारतीकडून प्रादेशिक भाषेचा आवाज दाबला जात असल्याचा आरोप केला आहे. कादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे यांनी तर प्रसारभारती ताबडतोब बरखास्त करावी, अशी मागणीही केली आहे. प्रसारभारतीने गेल्या काही दिवसात स्थानिक कार्यक्रमांची निर्मिती बंद केली आहे. लोकसंस्कृती आणि प्रादेशिक भाषांचा आवाज त्यामुळे दाबला जात आहे. आकाशवाणीने यापूर्वीच महाराष्ट्राच्या खेडय़ापाडय़ातील हजारो विद्यार्थ्यांना उपयोगी पडणारे शैक्षणिक कार्यक्रम बंद केले आहेत. लोकनाटय़े, लोकसंगीताचे कार्यक्रम काही वर्षांपूर्वीच बंद केले आहेत. महाराष्ट्रातील आठ प्रमुख आकाशवाणी केंद्रांवर आता मुंबईचे कार्यक्रम सहक्षेपित केले जात आहेत. स्थानिक निर्मिती बंद केली गेली आहे. त्यामुळे यापूर्वीच स्थानिक कलाकार, शेतकरी, कामगार, साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांना आपले म्हणणे मांडण्याची, आपली कला सादर करण्याची संधी संपुष्टात आणली गेली आहे. राज्यभरात आकाशवाणी विस्कळीत केल्यानंतर आता मुंबईच्या प्रादेशिक विभागावरच प्रहार केला जात आहे. गेल्या काही दिवसांत मुंबई प्रादेशिक वृत्तविभागासाठी आलेला निधी न वापरताच दिल्लीला परत पाठविण्यात आला आहे. कोविड काळात दूरदर्शन आणि आकाशवाणीवरील वार्तापत्रांची संख्या कमी केली गेली. अस्मिता आणि विविधभारतीवरील कार्यक्रम सहक्षेपित केले गेले. मुंबई केंद्रावरून प्रसारित होणारी तीन राष्ट्रीय वार्तापत्रे बंद केली गेली. मुंबई केंद्रावरून दिल्या जाणार्‍या एफएम वाहिनीवरील दोन मिनिटांच्या ठळक बातम्या बंद केल्या गेल्या. पुण्यातील बातम्या घटविल्या गेल्या. यापूर्वी स्मृति इराणी या माहिती व प्रसारण मंत्री असताना कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले गेले होते. 32 वर्षे चालणारी राष्ट्रीय आकाशवाणी वाहिनी बंद केली गेली होती.

हे सुद्धा वाचा :

मुंबईतील रेडिओ वरील कार्यक्रमात मराठी भाषेचा वापर वाढवावा – सुभाष देसाई

धारावीचं घबाड अदानीच्या घशात!

रेमडेसिविर इंजक्शेनच्या राजकीय वादावादीच्या बातम्या बघून मला कंटाळा आला; गुलाबराव पाटीलांचा फडणवीसांना टोला…

मुंबई आकाशवाणी ही श्रीकांत मोघे, रत्नाकर मतकरी, अमोल पालेकर, सदाशिव अमरापूरकर, विश्वास पाटील, नीना कुलकर्णी, गिरीश ओक, सयाजी शिंदे , अतुल कुलकर्णी, जयंत सावरकर, गणेश यादव अमृता सुभाष, सुषमा सावरकर अशा अनेकांचा आवाज झाली. पुण्यातल्या आकाशवाणीने भालचंद्र जोशी,सुधीर गाडगीळ, सुधा नरवणे अशा अनेकांचा आवाज ऐकविला. अशी ही महाराष्ट्राच्या माणसाच्या मनामनातील आकाशवाणी मुंबई, प्रादेशिक वृत्तविभाग तरी किमान शिंदे सरकारने वाचवावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातून यापूर्वी सहजासहजी बाहेर जाऊ दिलेल्या संस्थासारखी आकाशवाणी मुंबईची गत होऊ नये, हीच सर्वसामान्य श्रोत्यांचीही अपेक्षा आहे.

Mumbai Aakashwani, Shinde Sarkar Sleeping, Anurag Thakur, Pradeshik VruttaVibhag, आकाशवाणी मुंबई

 

संबंधित

फोटो गॅलरी

व्हिडीओ गॅलरी